
IPS Puran Kumar Suicide : हरयाणातील दलित समाजातील वरिष्ठ IPS अधिकारी वाय. पूरन कुमार यांच्या आत्महत्या प्रकरणानं देशात खळबळ उडवून दिली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आपला मानसिक छळ केला जात असल्याचा आरोप या अधिकाऱ्यानं आपल्या सुसाईड नोटमधून केला होता. यामध्ये थेट पोलीस महासंचालकांवर आणि रोहतकच्या माजी पोलीस अधीक्षकांवर त्यांनी गंभीर आरोप केले होते. त्यामुळं देशपातळीवर हे प्रकरण गाजत असतानाच आता यामध्ये ट्विस्ट आला आहे. या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करणारा चौकशी अधिकारी ASI संदीप कुमार यानंच स्वतःलाच गोळी मारुन घेऊन आत्महत्या केली. तसंच त्याच्या मृतदेहाजवळच एक चिठ्ठी आढळून आली असून त्यात त्यानं उलट दिवंगत IPS अधिकारी पूरन कुमार यांच्यावरच गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळं या प्रकरणात भलताच संशय व्यक्त केला जात आहे.
ASI संदीप कुमार या तपास अधिकाऱ्याचा मृतदेह रोहतक-पानीपत रोडवरील एका पाण्याच्या हातपंपाजवळ आढळून आला. त्याच्या मृतदेहाजवळच पोलिसांना तीन पानाची सुसाईड नोट आणि मोबाईलमध्ये शूट केलेला व्हिडिओ मेसेज मिळाला आहे. यांमध्ये दिवंगत IPS अधिकारी पूरन कुमार यांच्यावरच त्यानं गंभीर आरोप केले आहेत. पूरन कुमार हे भ्रष्टाचारी अधिकारी होते, जातीयवादी भूमिकेतून ते व्यवस्थेला हायजॅक करण्याचा प्रयत्न करत होते, या अधिकाऱ्याविरोधात आपल्याकडं अनेक पुरावे आहेत. उलट IPS पूरन कुमार यांनी ज्यांच्यावर छळवणुकीचे आरोप केले आहेत ते डीजीपी अर्थात पोलीस महासंचालक हे खूपच प्रामाणिक अधिकारी आहेत. मी माझं बलिदान देऊन याप्रकरणाची चौकशीची मागणी करत आहे. या भ्रष्टाचारी कुटुंबाला सोडू नका. आपल्याकडं असलेल्या चौकशी प्रकरणात आपल्यालाच अटक होईल याची भीती होती. त्यामुळं मृत्यूपूर्वी आपण या भ्रष्ट व्यवस्थेचा पर्दाफाश करु इच्छित आहोत, असं त्यानं सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे.
तर दुसऱ्या एका व्हिडिओ संदेशात संदीप कुमारनं म्हटलं की, मी संदीप कुमार तुम्हाला एका सत्याशी अवगत करु इच्छितो. सत्याची किंमत खूप मोठी असते, भगत सिंह यांनी देखील सत्यासाठी आपले प्राण दिले होते. त्यानंतर या देशात जागृती निर्माण झाली होती. IPS पूरन कुमार यांची ज्या दिवशी पोलीस स्टेशनमध्ये नियुक्ती झाली त्याच दिवशी त्यांनी कर्मचारी कुठल्या जातीचे आहेत त्याप्रमाणे त्यांना हटवण्यास सुरुवात केली. तसंच आपल्या भ्रष्ट कर्मचाऱ्यांची त्याजागी नियुक्ती केली. ज्या लोकांच्या फाईल्समध्ये चुकीच्या गोष्टी होत्या त्यांना बोलावून त्यांनी ब्लॅकमेल करायला सुरुवात केली होती. या अधिकाऱ्याविरोधात भ्रष्टाचाराची तक्रार देण्यात आली होती त्यामुळंच त्यांनी आत्महत्या केली होती. IPS पूरन कुमार यांची पत्नी IAS अधिकारी आणि मेव्हणा आमदार आहे. जर पूरन कुमार यांची भ्रष्टाचाराच्या आरोपात बदनामी झाली असती तर त्यांच्या संपूर्ण राजकीय कुटुंबाचं नुकसान झालं असतं त्यामुळंच त्यांनी आत्महत्या केली, असा गंभीर आरोप ASI संदीप कुमार यानं आपल्या व्हिडिओ संदेशात केला आहे.
व्हिडिओत संदीप कुमार म्हणतो की, डीजीपी शत्रुजीत कपूर हे अत्यंत इमानदार व्यक्ती आहेत. IAS लॉबीची ही इच्छा आहे की, हे डीजीपी इथून जावेत कारण तेव्हाच आपल्याला मलाई खाता येईल. काही लोक या प्रकरणाला जातीयवादी रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत. पण मी असं होऊ देणार नाही. यांनी चुकीच्या गोष्टी केल्यात तर त्यांना त्याचं फळ मिळणारच. बस्स इतकंच अलविदा मित्रांनो! असा व्हिडिओ संदेश या ASI संदीप कुमार यांनी मोबाईलमध्ये शूट केला आहे.
IPS पूरन कुमार यांच्या मृत्यूप्रकरणाचा तपास करणाऱ्या ASI संदीप कुमार यांचा मृतदेह अज्ञातस्थळी आढळणं त्याचबरोबर त्यांच्या मृतदेहाच्या बाजुला तीन पानी चिठ्ठी आढळणं त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक पुरावा म्हणून व्हिडिओ संदेश आढळणं विशेष म्हणजे या परिस्थितीजन्य पुराव्यातून गंभीर आरोप करणाऱ्या IPS पूरन कुमार यांच्यावरच गंभीर आरोप करणं. हे सगळं संशयास्पद असल्याची चर्चा आता सुरु झाली आहे. पण आता ASI संदीप कुमार यांनी खरोखरच आत्महत्या केली की त्यांचा खून झाला. तसंच त्यांच्या चिठ्ठीत केलेल्या आरोपांनुसार स्वतः चौकशी करत असताना त्यांनी अनेक गोष्टी समोर आणू शकला असता पण त्याचाच मृत्यू झाला त्यामुळं नेमकं खरं आणि खोटं कोण बोलतय? याचा आता पोलिसांना निष्पक्षपणे तपास करावा लागणार आहे.
IPS अधिकारी पूरन कुमार यांनी स्वतःला गोळी मारुन आत्महत्या केली होती. त्यांची IAS पत्नी अमनीत पूरन कुमार या जपानच्या सरकारी दौऱ्यावर असताना त्यांनी आत्महत्या केली. कुमार यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये डीजीपी शत्रुजीत कपूर आणइ रोहतकचे माजी एसपी नरेंद्र बिजारनिया यांच्यासह आठ वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची नावं घेतली होती. त्यांच्यावर जातीभेद, छळ तसंच वाळीत टाकण्याचा आरोप केला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.