

Keralam Congress: केरळमचे मुख्य निवडणूक अधिकारी (CEO) रतन यू. केळकर यांची मुख्यमंत्री व्ही. डी. सतीशन यांचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याद्वारे काँग्रेसनं भाजपच्या पावलावर पाऊल टाकत भाजपचा पश्चिम बंगाल पॅटर्न रिपीट केला आहे. त्यामुळं यापूर्वी भाजपवर टीका करणाऱ्या राहुल गांधींना आता भाजपनं धारेवर धरलं आहे.
"डॉ. रतन यू. केळकर (IAS, केरळ संवर्ग २००३) जे केरळचे मुख्य निवडणूक अधिकारी आणि निवडणूक विभागाचे सचिव आहेत, यांची बदली करण्यात आली असून त्यांची नियुक्ती मुख्यमंत्री यांचे सचिव म्हणून करण्यात आली आहे," असं केरळम सरकारच्या एका आदेशात नमूद करण्यात आलं आहे. यावरुन भारतीय जनता पक्षाने शनिवारी केरळममधील नव्याने सत्तेवर आलेल्या काँग्रेसप्रणीत 'संयुक्त लोकशाही आघाडी'च्या (UDF) सरकारवर टीका केली.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांचे कामकाज पाहणारे मनोज अग्रवाल यांची, निवडणुकीनंतर स्थापन झालेल्या भाजपच्या सुवेंदू अधिकारी यांच्या सरकारमध्ये मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. यावरुन राहुल गांधी यांनी भाजपवर सडकून टीका केली होती. त्यामुळं हाच प्रकार आता काँग्रेसनं केरळममध्ये रिपीट केल्यानं या निर्णयावर प्रतिक्रिया देताना, भाजपच्या केरळम शाखेने फेसबुकवर एक पोस्ट लिहिली आहे. यात म्हटलं की, "केरळचे माजी मुख्य निवडणूक अधिकारी रतन केळकर यांची मुख्यमंत्री व्ही. डी. सतीशन यांचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या तर्कानुसार, रतन केळकर यांची ही नियुक्ती म्हणजे केरळममध्ये काँग्रेसला मिळालेल्या प्रचंड विजयाचे बक्षीस म्हणून पाहिली गेली पाहिजे. काँग्रेसने लोकांची दिशाभूल करणारे अशा प्रकारचे राजकारण थांबवले पाहिजे"
मालवीय यांनी ट्वीट करत म्हटलं की, "राहुल गांधी यांचा 'निवडक संताप' (selective outrage) पुन्हा एकदा उघड झाला आहे. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी मनोज अग्रवाल यांची मुख्य सचिव म्हणून नियुक्ती केल्याबद्दल त्यांनी टीका केली होती. परंतु, ममता बॅनर्जी यांच्याप्रमाणे ज्यांनी आपल्या निष्ठावानांना झुकते माप देण्यासाठी डझनभर IAS अधिकाऱ्यांना डावलून (superseding) नोकरशाहीला वारंवार कमकुवत केलं होतं. पश्चिम बंगालमधील भाजप सरकारने राज्यातील सर्वात वरिष्ठ IAS अधिकाऱ्याची नियुक्ती केली होती आणि तीही प्रस्थापित निकष व सेवा नियमांनुसार काटेकोरपणे करण्यात आली होती"
"आता याची तुलना काँग्रेसशासित केरळमशी करा. २००३ च्या केरळ संवर्गातील IAS अधिकारी रतन यू. केळकर, जे राज्यातील सर्वात वरिष्ठ अधिकारीही नाहीत, त्यांची नियुक्ती मुख्यमंत्री व्ही. डी. सतीशन यांचे सचिव म्हणून केली जात आहे. विशेष म्हणजे, केरळमचे मुख्य निवडणूक अधिकारी हे पदही त्यांच्याकडे कायम ठेवण्यात आले आहे. हे पद संस्थात्मक तटस्थता आणि स्वातंत्र्याची मागणी करणारे आहे. मग आता राहुल गांधी यांचे 'संस्थात्मक औचित्या'वरील प्रवचन कुठे गेले? की त्यांचा संताप पूर्णपणे कोणत्या पक्षाची सत्ता आहे, यावर अवलंबून असतो?" असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.