

Opposition protest Lok Sabha : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मागील दोन दिवस सत्ताधारी विरूध्द विरोधक असा संघर्ष पेटला आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना बोलू न दिल्याबद्दल काँग्रेस खासदार आक्रमक झाले आहेत. सभागृहासह संसदेच्या आवारातही सातत्याने काँगेसकडून सरकारविरोधात घोषणाबाजी केली जात आहे. त्यामुळे सभागृहाचे कामकाज तहकुब करावे लागत आहे.
लोकसभेत बुधवारीही काही मिनिटेच कामकाज चालले. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलणार होते. नियोजनानुसार सायंकाळी पाच वाजता ते लोकसभेत आपली भूमिका मांडणार होते. त्यासाठी सरकारकडून जोरदार तयारी करण्यात आली होती. विरोधकांकडून मागील दोन दिवस सुरू असलेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर सरकारही सतर्क होते.
राहुल गांधी यांनी माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकातील काही मजकूर वाचून दाखविण्यास सुरूवात केल्यानंतर लोकसभेत वाद निर्माण झाला होता. यावेळी खुद्द पंतप्रधान सभागृहात उपस्थित होते. गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी राहुल यांना हा मजकूर वाचू देण्यास प्रखरपणे विरोध दर्शविला होता. त्यावर काँग्रेस खासदारही आक्रमक झाले होते. त्यानंतर झालेल्या गोंधळानंतर काल काँग्रेसचे आठ खासदार निलंबित करण्यात आले होते.
खासदारांच्या निलंबनानंतर आज काँग्रेस अधिक आक्रमक झाल्याचे दिसून आले. आज सभागृहाचे कामकाज काँग्रेस खासदारांच्या गोंधळामुळे सातत्याने तहकुब करावे लागले. सुरूवातील दुपारी बारा वाजेपर्यंत नंतर दोन आणि त्यानंतर पाच वाजेपर्यंत कामकाज तहकूब करण्यात आले. केवळ काही मिनिटेच कामकाज चालले. सायंकाळी पाच वाजता पंतप्रधान मोदी सभागृहात संबोधित करणार होते. त्यांच्या भाषमादरम्यान कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू होते.
विरोधी पक्षातील नेत्यांची समजूत काढण्याबाबत भाजप नेत्यांनी ओम बिर्ला यांना विनंती केली होती. पण आज भाजप खासदार निशीकांत दुबे यांनी सभागृहात पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्याविषयीच्या पुस्तकांवरून वादग्रस्त शब्दांचा वापर केल्याने काँग्रेसचे खासदार अधिक आक्रमक झाले. बिर्ला यांच्या दालनातही सत्ताधारी आणि विरोधकांमधील वाद पाहायला मिळाला.
सायंकाळी पाच वाजता सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधकांनी हातात फलक आणत जोरदार घोषणाबाजी सुरू केली. अध्यक्षांसमोरी रिकाम्या जागेत विरोधी पक्षातील खासदार जमा झाल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला. त्यामुळे सभागृहाचे कामकाज गुरूवारी सकाळी ११ वाजेपर्यंत तहकूब करावे लागले. त्यामुळे पंतप्रधान मोदींचे आजचे भाषण रद्द करावे लागले. आता पंतप्रधान गुरूवारी लोकसभेला संबोधित करण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.