New Delhi News : उत्तर प्रदेशातील दोन लोकसभा मतदारसंघांकडे (Lok Sabha Election 2024 ) देशातील जनतेचे लक्ष लागले आहे. ते म्हणजे, गांधी घराण्याचे पारंपरिक मतदारसंघ म्हणून ओळखले जाणारे अमेठी आणि रायबरेली. सध्या अमेठीच्या विद्यमान खासदार आहेत स्मृती इराणी. मागील निवडणुकीत त्यांनी राहुल गांधींचा पराभव केला होता, तर रायबरेलीच्या खासदार आहेत सोनिया गांधी. पण या वेळी त्या काँग्रेसच्या उमेदवार नसतील. त्यामुळे दोन्ही मतदारसंघांत काँग्रेसचे उमेदवार कोण असणार, याची उत्सुकता शिगेला पोहाेचली.
राहुल गांधींनी (Rahul Gandhi) काही दिवसांपूर्वीच सध्या ते प्रतिनिधित्व करत असलेल्या केरळातील वायनाड मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पण ते अमेठी (Amethi) किंवा रायबरेलीतूनही (Raebareli) उभे राहणार का, याबाबत अजूनही काँग्रेसकडून (Congress) काहीच संकेत देण्यात आलेले नाहीत. याबाबत आज राहुल गांधींना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी थेट उत्तर देण्याचे टाळले.
रायबरेली किंवा अमेठीतून निवडणूक लढणार का, या प्रश्नावर उत्तर देताना राहुल म्हणाले, ‘काँग्रेस निवडणूक समिती आणि काँग्रेसचे अध्यक्ष जे मला सांगतील ते मी करेन. असे निर्णय आमच्या निवडणूक समितीमध्ये होतात.’ राहुल यांच्या या उत्तरामुळे दोन्ही मतदारसंघांतून सस्पेन्स पुन्हा वाढला आहे. मागील निवडणुकीत इराणींनी राहुल यांचा 55 हजार मतांनी पराभव केला होता.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दरम्यान, राहुल यांनी आज समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासोबत एकत्रित पत्रकार परिषद घेतली. या वेळी त्यांनी इंडिया आघाडीला मोठी संधी असल्याचे सांगत भाजप केवळ 150 जागांपर्यंतच विजय मिळवू शकेल, असा दावा केला. मागील 15 ते 20 दिवसांपर्यंत मला वाटत होते की, भाजपला 180 च्या जवळपास जागा मिळतील. पण आता 150 जागा मिळू शकतील, असे वाटते. उत्तर प्रदेशातही आमची कामगिरी चांगली राहील, असा विश्वास राहुल यांनी व्यक्त केला.
चॅम्पियन ऑफ करप्शन
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना राहुल यांनी त्यांचा उल्लेख चॅम्पियन ऑफ करप्शन असा केला. इलेक्टाेराल बॉण्ड योजना जगातील सर्वात मोठी खंडणी योजना असल्याची टीकाही त्यांनी केली. पारदर्शकतेसाठी ही योजना आणल्याचे पंतप्रधान मोदी सांगतात. मग भाजपला कुणी निधी दिला, कोणत्या तारखेला दिला ही माहिती का लपवली जात आहे, असा सवालही राहुल यांनी केला.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.