New Delhi : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाने अनेक दिग्गजांना धक्के दिले आहेत. महायुतीच्या त्सुनामीपुढे महाविकास आघाडी वाहून गेली. महायुतीने सव्वा दोनशेहून अधिक जागा मिळवल्या असून आघाडीला 50 जागाही मिळताना दिसत नाही. आघाडीतील तीनही पक्षांचा सुपडा साफ झाला आहे. या दारूण पराभवानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचा आतापर्यंतचा सर्वात मोठा पराभव झाला असला तरी झारखंडमध्ये इंडिया आघाडीची सत्ता आली आहे. हा एकमेव दिलासा काँग्रेसला मिळाला आहे. आजच्या दोन राज्यांतील निकालानंतर राहुल गांधींनी सोशल मीडियातून प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्रातील निकाल अनपेक्षित असल्याचे राहुल गांधींनी म्हटले आहे. तसेच या निकालाचे विस्तृतपणे विश्लेषण केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. महाराष्ट्रातील सर्व मतदार आणि कार्यकर्त्यांचेही त्यांनी आभार मानले आहेत.
झारखंडमधील विजयाबाबत राहुल यांनी म्हटले आहे की, इंडिया आघाडीला बहुमत दिल्याबद्दल झारखंडमधील लोकांचे मनापासून आभार. मुख्यमंत्री हेमंत सोरेन, काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चाच्या सर्व कार्यकर्त्यांचे विजयानिमित्त शुभेच्छा. राज्यातील आघाडीचा हा विजय संविधानाच्या विजयाबरोबरच जल-जंगल-जमीनीच्या रक्षणाचा विजय आहे, असे राहुल यांनी म्हटले आहे.
दरम्यान, राहुल गांधींनी महाराष्ट्राच्या निवडणुकीत प्रचारादरम्यान संविधान, जातनिहाय जनगणना, सोयाबीन आणि कापसाचे भाव आदी मुद्यांवर अधिक भर दिला होता. पण मतदारांनी त्यांना पूर्णपणे नाकारत मोठा झटका दिला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातील पक्षसंघटनेत मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत मुंबईतील काँग्रेसचे नेते भाई जगताप यांनीही उघडपणे तशी मागणी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.