
New Delhi News : संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान मंगळवारी लोकसभेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण विरोधकांवर चांगल्याच संतापल्याचे पाहायला मिळाले. त्यासाठी निमित्त ठरले, काँग्रेस खासदार के. सी. वेणुगोपाल यांचे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्याविषयीचे एक विधान.
बँकिंग कायद्याच्या सुधारिक विधेयकावर चर्चेदरम्यान सरकार आणि विरोधकांमध्ये चांगली जुंपली. काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांनी या विधेयकावर म्हणणे मांडल्यानंतर भाजपचे खासदार संबित पात्रा बोलण्यास उभे राहिले. त्यांना बोलताना बँकिंग क्षेत्रातील एक उदाहरण देताना त्यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा उल्लेख केला. त्यावर डीएमकेचे खासदार डी. राजा आणि काँगेसचे खासदार के. सी. वेणुगोपाल यांनी आक्षेप घेतला.
संसदीय कामकाजाबाबतच्या नियम 94 चा मुद्दा उपस्थित करत वेणुगोपाल यांनी पात्रा यांच्या भाषणावर आक्षेप घेतला. या नियमानुसार विधेयकाला धरूनच म्हणणे मांडणे अपेक्षित असताना पात्रा यांनी इंदिरा गांधींचे नाव घेतल्याने वेणुगोपाल भडकले. त्यांनी बोललेले कामकाजातून काढावे, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी त्यांनी अटल बिहारी वाजपेयी इंदिरा गांधींना दुर्गा म्हणाले होते, असा सभागृहात सांगितले.
वेणुगोपाल यांचे बोलणे संपल्यानंतर निर्मला सीतारमण यांनी त्याला प्रत्युत्तर दिले. आपण सर्वजण इंदिरा गांधींचा आदर करतो, असे सांगताना त्यांनी आणीबाणीच्या मुद्द्यावरही त्यांची आठवण येते, असा टोलाही लगावला. त्यावरून काँग्रेसचे सदस्यांनी आक्षेप घेतल्यानंतर सीतारमण यांचा पारा चढला.
वेणुगोपाल यांनी वाजपेयींचे नाव घेत ते इंदिरा गांधी दुर्गा म्हटल्याचा मुद्दा वादग्रस्त आहे. त्याचा काहीही पुरावा नाही. वाजपेयी असे काही बोलले नसल्याचे अनेक लोक सांगतात. त्यामुळे वाजपेयींविषयी बोलले गेलेलेही कामकाजातून काढावे, अशी मागणी सीतारमण यांनीही केली.
त्यानंतर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही याबाबत भाष्य करताना याबाबत सत्यता जाणून घेतल्याशिवाय त्याची कामकाजात नोंद घेतली जाऊ नये, असे म्हटले. चर्चेदरम्यान राजकीय आरोप-प्रत्यारोप टाळावेत, असे आवाहनही त्यांनी सदस्यांना केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.