

Mumbai News: देशात किंवा राज्यात सत्ता कोणाचीही असो पण मुंबईत ठाकरेच पाहिजे असंच गेली 25 वर्षे मराठी माणसाच्या मनातली भावना राहिल्याचं समोर अनेकदा दिसून आलं होतं. शिवसेना दुभंगल्यानंतर पहिल्यांदाच मुंबई महापालिकेच्या निवडणुकीला सामोरे जाताना हाच मुद्दा ठाकरे बंधूंनी उचलून धरला होता. मराठी माणसाच्या मुद्द्यांवर ही निवडणूक भाजपला जड जाणार असं चित्रं निर्माण करण्यात त्यांना यशही आल्याची चर्चा होती. पण मुंबईतला 'अंडर करंट' ओळखण्यात कुठेतरी ठाकरेंची शिवसेना आणिम मनसे कमी पडली.
त्याचाच परिणाम म्हणून मुंबई महापालिकेवरील शिवसेनेची तब्बल 25 वर्षांची सत्ता गमावण्याची वेळ उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) आली. मुंबई जिंकली,भाजपचा महापौर हे स्वप्नंही लवकरच पूर्ण होणार आहे. पण आता मुंबईतील पराभव ठाकरेंच्या चांगलाच जिव्हारी लागणार आहे,यात संशय नाही. आणि त्याचमुळे पराभवानं घायाळ झालेल्या ठाकरेंशी फडणवीसांच्या भाजपचा सामना असणार आहे.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजप 89 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला 29 जागांवर विजय मिळाला आहे. तसेच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 65, मनसे 06, एमआयएम 08, काँग्रेस 24,अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस 03, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस 01 जागा मिळवल्या आहेत. त्यामुळे महापौर पदासह विरोधी पक्षनेतेपदाचीही चर्चा सुरू झाली आहे.
जर मुंबई महापालिकेतील सत्तेची समीकरणं आहे तशीच राहिली तर आगामी काळात प्रमुख विरोधीपक्ष म्हणून उद्धव ठाकरेंची शिवसेना समोर येऊ शकतो. त्यांच्या जोडीला काँग्रेस आणि मनसेही असणार आहे. त्यामुळे धारावीच्या पुनर्विकासाच्या मुद्द्यांवरुन ठाकरे बंधू,महाविकास आघाडी सत्ताधारी भाजप (BJP) व एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला विविध मुद्द्यांवरुन जेरीस आणू शकतात. त्यातलाच एक प्रमुख मुद्दा म्हणजे धारावी पुनर्विकास हा आहे.
शिवसेनेचं 'मातोश्री' आणि मनसेचं आधी 'कृष्णकुंज',आता 'शिवतीर्थ' नेहमीच मुंबईसह राज्याच्या राजकारणाचं केंद्रस्थानी राहिले आहेत. हे दोन्ही बंधू एकत्र आल्यामुळे आता विभागलेली ठाकरेंची डरकाळी महापालिकेत घुमणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची संपूर्ण जडणघडण ही मुंबईत झाली आहे.
अगदी नकळत्या वयापासून मुंबई महापालिका आणि त्यामधलं राजकारण अगदी जवळून पाहिलेलं आहे. शिवसेनेची इतकी वर्षे महापालिकेत सत्ता राहिल्यानं त्यांचा प्रशासनावरचा वचक असणार यात शंका नाही. त्यामुळे भाजपला महापालिकेत काम करताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. कारण त्यांच्यासोबत युतीत असलेले एकनाथ शिंदेंनाही मुंबईतील कामाचा दांडगा अनुभव आहे. त्यामुळे भाजपला एकाचवेळी ठाकरे बंधूंच्या आव्हानासह सोबत असलेल्या शिंदेंनाही हलक्यात घेऊन चालणार नाही.
तसेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचे पक्ष वेगवेगळे असले,तरी त्यांचं राजकारण अनेकदा मुंबईला गृहित धरुनच चाललेलं दिसून आलं आहे.ठाकरे बंधूंना मुंबईकरांच्या रोजच्या आयुष्याशी निगडित शिक्षण,आरोग्य,वाहतूक,रस्ते, कचरा, ड्रेनेज,पथदिवे, पाणीपुरवठा,महिला बालकल्याण,स्वच्छता ,घरे, सार्वजनिक वाहतूक दळणवळणाची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल रेल्वे,बेस्ट यांसह विविध मुद्द्यांचा बारकाईनं अभ्यास आहे. त्यामुळे ठाकरे बंधू सत्ताधारी भाजपला मुंबईकरांच्या विविध समस्यांवरुन धारेवर धरण्याची शक्यता आहे.
यापूर्वी,मुंबई महापालिकेत भाजप सत्तेत सहभागी राहिला असला, तरी पण प्रमुख पक्ष म्हणून शिवसेनेचाच तिथे दबदबा होता. पण आता केंद्रात राज्यात आणि मुंबई महापालिकेत सत्तेत असलेल्या भाजपसमोर एक महत्त्वाचं आव्हान असणार आहे. प्रचंड विरोध होऊनही मुंबई महापालिका निवडणुकीच्या आधीपासून आणि प्रचारातही महायुती सरकारनं धारावीच्या पुनर्विकासाचा मुद्दा ठोसपणे मांडला होता.
धारावी पुनर्विकासाचं काम नेहमीच विरोधकांच्या निशाण्यावर राहिलेल्या उद्योगपती गौतम अदानींना देण्यात आले आहेत. त्याला उद्धव ठाकरेंची शिवसेना,राज ठाकरेंची मनसे,आणि एकूणच महाविकास आघाडीनंही कडाडून विरोध दर्शवला आहे. पण आत्तापर्यंतच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कार्यपध्दतीच्या अंदाजानुसार ते धारावीच्या पुनर्विकासाबाबत आग्रही राहणार यात संशय नाही.
मुंबई महापालिकेतील विरोधी पक्ष म्हणून उद्धव ठाकरेंची शिवसेना इतक्या वर्षांच्या दांडग्या अनुभवाच्या जोरावर सत्ताधारी भाजपला अडचणीत आणण्याची शक्यता आहे. पारदर्शी कामकाजाची ग्वाही दिलेल्या भाजपवर ठाकरे बंधूंचे '71' नगरसेवक 'वॉच' ठेवून असणार आहे. त्यांच्या जोडीला काँग्रेस आणि एमआयएमचे आठ नगरसेवकही सोबतीला असणार आहे.त्यामुळे पुढच्या पाच वर्षांची सत्ताधारी म्हणून वाटचाल भाजपसाठी आव्हानात्मक असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.