CJP Parliament march : मागील काही दिवसांपासून दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर कॉकरोच जनता पार्टीकडून आंदोलन सुरू आहे. नीट परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे.
सीजेपीचे प्रमुख अभिजित दीपके यांच्या मार्गदर्शनाखाली आज २० जुलै रोजी संसदेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. मात्र, या मोर्चाला दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारल्याची माहिती समोर आली आहे. अशातच आता या संसदेवरील मोर्चापूर्वीच सध्या सफदरगंज रुग्णालयात असलेल्या सोनम वांगचूक यांनी एक ट्विट करत आपण आंदोलन मागे घेण्यासाठी तयार असल्याचं म्हटलं आहे.
मात्र, यासाठी त्यांनी सरकारसमोर काही अटी ठेवल्या आहेत. सरकारने आपल्या अटी मान्य केल्यास आमरण उपोषण मागे घेऊ अशी तयारी वांगचुक यांनी दर्शवली आहे. त्यामुळे जर सरकार या अटी मान्य करणार का याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.
एकीकडे आज अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वाखाली संसदेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. मात्र, दिल्ली पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली आहे. आजपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेतल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तर दुसरीकडे या मोर्चाला अवघे काही तास उरले असताना सोनम वांगचुक यांनी पहाटे सातच्या सुमारास एक ट्विट करत आमरण उपोषण मागे घेण्याची तयारी दर्शविली आहे. वांगचूक यांनी केंद्र सरकारसमोर काही अटी ठेवल्या आहेत. त्या मान्य केल्यास आपण उपोषण मागे घेऊ असं म्हटलं आहे. त्यामुळे आता पोलिसांनी नाकारलेली परवानगी आणि वांगचुक यांनी केलेलं ट्विट पाहता आता सीजेपीचा मोर्चा संसदेवर धडकणार की नाही? हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
वांगचुक यांची पोस्ट नेमकी काय?
सोनम वांगचुक यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये त्यांनी लिहिलं की, 'मी आज म्हणजेच २० जुलैला माझं उपोषण सोडायला तयार आहे. पण माझ्या तीन अटी आहेत.
१) शिक्षण व्यवस्थेतील कमतरता, जसे की पेपर फुटणं, पेपर लीक होणं, विक्री होणं याची जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे.
२) मी आणि सीजेपीचे नेतृत्व करणारे अभिजीत दीपके हे जर संसदेपर्यंत मोर्चा घेऊन पोहचलो तर विविध पक्षांच्या खासदारांनी आम्हाला हे आश्वासन द्यावं की विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर आम्ही संसदेतल्या पावसाळी अधिवेशनात आवाज उठवू.
३) माझी प्रकृती खालावली आहे. त्यामुळे मला जर संसदेत जायची संमती दिली गेली नाही तर विविध पक्षांचे खासदार मला हे आश्वासन देऊ इच्छित असतील की मी केलेल्या दोन अटींबाबत ते आवाज उठवीतल तर मी उपोषण मागे घ्यायला तयार आहे, असं वांगचुक यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
त्यामुळे आता सोनम वांगचूक यांच्या मागण्या मान्य केल्या जाणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, आज कॉकरोच जनता पार्टीकडून जो संसदेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि शरद पवारांची राष्ट्रवादीचे नेते सहभागी होणार आहेत. मात्र, दिल्ली पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारल्यामुळे दीपके आणि त्यांचे सहकारी नेमका काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.