

Tamil Nadu assembly politics : बहुमताचा ११८ हा जादुई आकडा गाठण्यासाठी मुख्यमंत्री विजय यांना मागील चार दिवस बरीच धावपळ करावी लागली. अखेर त्यांनी अपेक्षेपेक्षा अधिक आमदारांचा पाठिंबा मिळवला अन् आज शपथविधीही पार पडला. पण त्यानंतर लगेचच त्यांनी दोनपैकी एका विधानसभा मतदारसंघातील आमदारपदाचा राजीनामा दिला आहे. तर दुसरीकडे विजय यांच्या एका आमदाराचे पदही धोक्यात आले आहे.
तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत विजय यांनी पेरांबूर आणि तिरुचिरापल्ली या दोन विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. दोन्ही मतदारसंघातून ते विजयी झाले होते. त्यामुळे पक्षाच्या आमदारांचा आकडा १०८ वर पोहोचला होता. पण बहुमत सिध्द करण्यासाठी विजय यांचे केवळ एकच मत ग्राह्य धरले जाणार होते. त्यामुळे त्यांनी आज तिरुचिरापल्ली मतदारसंघाच्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे.
विजय हे आता पेरांबूर या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतील. दुसरीकडे विजय यांच्या एका आमदाराचे पद धोक्यात आले आहे. तिरुप्पात्तूर मतदारसंघातून टीव्हीकेचे उमेदवार श्रीनिवास सेतुपती हे केवळ एका मताने विजयी झाले आहे. त्यांनी डीएमकेचे उमेदवार पेरीयकरुप्पन यांना पराभूत केले आहे. आता डीएमकेच्या उमेदवाराने या निकालाविरोधात थेट हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे.
डीएमके उमेदवाराच्या याचिकेवर आज कोर्टात तातडीने सुनावणी घेण्यात आली. सेतुपती यांना विश्वासदर्शक ठरावादरम्यान मतदान न करू देण्याची विनंती डीएमके उमेदवाराने याचिकेत केली आहे. या मतदारसंघातील काही टपाली मते दुसऱ्या मतदारसंघात गेली. ही मते तिरुप्पातून मतदारसंघात पाठविण्याऐवजी तिथे अवैध ठरविण्यात आली. ही टपाली मते या मतदारसंघात पाठविली असती तर निकाल वेगळा लागला असता, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे.
कोर्टाकडून याबाबत निवडणूक आयोगाकडून प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले आहे. या याचिकेवर आता सोमवारी सुनावणी होणार आहे. विधानसभेचे विशेष अधिवेशन सोमवारी (ता. ११) सुरू होत असून बुधवारी विजय यांना बहुमत सिध्द करावे लागेल. त्याआधीच कोर्टाचा या याचिकेवर निकाल येऊ शकतो. त्यामुळे या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, कोर्टाने टीव्हीके आमदाराच्या विरोधात निकाल दिला तरी विजय यांना पाठिंबा असलेल्या आमदारांची संख्या १२० वर गेली आहे. बहुमतापेक्षा हा आकडा दोनने अधिक आहे. त्यातून या आमदाराचे एक मत कमी झाले तरी हा आकडा ११९ होतो. त्यामुळे विजय हे बहुमत सिध्द करू शकतात.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.