Tamil Nadu Politics : तमिळनाडूच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय हालचालींना वेग आला असून राजकीय भूकंपाची शक्यता आहे. तर पुढच्या काहीच आठवड्यांत राज्यात भाजपच्या ऑपरेशन लोटसप्रमाणेच ऑपरेशन 'L' होण्याचे संकेत मिळत आहेत. येथे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्या नेतृत्वाखालील तमिळगा वेत्री कळघम (TVK) पक्षाकडून विरोधी पक्ष असणाऱ्या AIADMK मध्ये मोठी फूट पाडण्याची रणनीती आखली जात असल्याचा आरोप आता विरोधकांकडून केला जात आहे. तर हा आरोप AIADMK चे सुमारे 10 आमदार 15 ऑगस्टपूर्वी TVK मध्ये प्रवेश करू शकतात, अशा शक्यतेवरून केला जात आहे. मात्र, हे सर्व आरोप TVK ने फेटाळून लावले आहेत.
महाराष्ट्रातील राजकारणात ज्याप्रमाणे सध्या खासदार विरोधी पक्षातून फुटून सत्ताधारी पक्षात प्रवेश करत आहेत, त्याच पद्धतीने दक्षिणेतील तमिळनाडू राज्यातदेखील राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. द इंडियन एक्सप्रेसमध्ये आलेल्या वृत्तानुसार, मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्या नेतृत्वाखालील 'तमिळगा वेत्री कळघम' (TVK) पक्ष मजबुतीकडे वाटचाल करत आहे.
AIADMK चे आणखी 10 आमदार फुटण्याची शक्यता आहे. हे सर्व आमदार आपल्या पदाचा राजीनामा देऊन अधिकृतपणे सत्ताधारी 'TVK' पक्षात सामील होण्याची शक्यता आहे. हे सर्व आमदार 15 ऑगस्टपूर्वी पक्षप्रवेश करतील, असे सांगितले जात असून याला 'ऑपरेशन L' असे आता नाव दिले जात आहे.
दरम्यान, आता 'ऑपरेशन L'ची संपूर्ण तयारी झाली असून या आमदारांच्या राजकीय भवितव्याबाबत रणनीती तयार करण्यात आली आहे. निवडणूक आयोग लवकरच विधानसभेच्या पोटनिवडणुकांची घोषणा करणार आहे. त्याआधी राजीनामा आणि पक्षबदलाची संपूर्ण प्रक्रिया स्वातंत्र्यदिनापूर्वी पूर्ण केली जाईल. आणि पोटनिवडणुकांची घोषणा झाल्यानंतर हे सर्व नेते TVK च्या तिकिटावर पुन्हा निवडणूक लढवतील, असे सांगितले जात आहे.
राजीनाम्यांची मालिका अशीच सुरू असून मे महिन्यात पक्षादेश झुगारून AIADMK च्या 25 आमदारांपैकी जवळपास निम्मे आमदार विजय यांच्या सरकार स्थापनेच्या वेळीच गेले होते. तर आता काही आमदार येत्या काही दिवसांत TVK मध्ये सामील होण्याची शक्यता आहे. तमिळनाडू विधानसभा 234 सदस्यांची असून सध्या सात जागा रिक्त आहेत. TVK कडे सध्या 107 आमदार आहेत. दरम्यान, पोटनिवडणुकांमध्ये TVK ला यश मिळाल्यास पक्षाच्या जागा वाढणार आहेत.
दरम्यान, या सर्व घडामोडींवर विरोधी पक्षांनी गंभीर आक्षेप घेत आरोप केले आहेत. आमदारांना पक्ष बदलण्यासाठी राजकीय तसेच आर्थिक प्रलोभने दिली जात असल्याचा आरोप करण्यात आला असून TVK हे 'पॉलिटिकल वॉशिंग मशीन' असल्याची टीका केली जात आहे. तर आता हे सर्व आरोप TVK ने फेटाळले असून कोणत्याही नेत्याला कायदेशीर कारवाईपासून संरक्षण दिले जाणार नाही. राज्यात मजबूत आणि स्थिर सरकार उभारण्याचा हा पक्षाचा उद्देश असल्याचा दावा TVK ने केला आहे. तसेच, कायदा आपले काम करत राहील, असेही TVK ने म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.