

Tamil Nadu government formation 2026 : तमिळनाडूमध्ये सत्तास्थापनेसाठी मोठ्या घडामोडी घडत आहे. सुपरस्टार विजय यांच्या तमिळगा वेत्री कळघम पक्षाला सरकार स्थापनेसाठी १० जागा कमी पडत आहेत. त्यासाठी अनेक समीकरणे पुढे येत असतानाच अखेर काँग्रेसने बुधवारी अधिकृतपणे TVK ला पाठिंबा जाहीर केला आहे. तमिळनाडूसह देशाच्या राजकारणातील हे नवी समीकरण उदयाला आले आले.
विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी डीएमके-काँग्रेस आघाडीचा विजय यांनी पराभव केला आहे. विरोधी पक्ष असलेल्ये अण्णा द्रमुक हा पक्ष तिसऱ्या स्थानावर राहिला. विजय यांना १०८ जागा मिळाल्याने ते बहुमतापासून १० जागा दूर आहेत. काँग्रेसचे पाच आमदार असल्याने विजय यांनी काँग्रेसकडे पाठिंबा मागितला होता. दिल्लीसह तमिळनाडू काँग्रेसकडून त्यांना हिरवा कंदील दाखविण्यात आला आहे.
काँग्रेसचे तमिळनाडू प्रभारी गिरीश चोडणकर यांनी आज याबाबतची अधिकृत घोषणा केली. हा पाठिंबा केवळ सरकारपुरता मर्यादित राहणार नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्याचप्रमाणे लोकसभा आणि राज्यसभेच्या निवडणुकीतही टीव्हीके-काँग्रेस आघाडी कायम राहणार असल्याचे चोडणकर यांनी जाहीर केले आहे.
चोडणकर यांनी म्हटले आहे की, तमिळनाडूच्या जनतेने, विशेषतः युवकांनी, धर्मनिरपेक्ष, प्रगतिशील आणि कल्याणकारी सरकारसाठी स्पष्ट बहुमताचा कौल दिला आहे. जनेतेने विजय यांच्या नेतृत्वाखालील TVK ला पुढील सरकार स्थापन करण्यासाठी निवडले आहे. काँग्रेस हा धर्मनिरपेक्ष आणि कल्याणकारी राजकारणाचा पुरस्कर्ता आहे.
तमिळनाडूच्या जनतेच्या या जनादेशाचा आदर करणे, त्याचे पालन करणे आणि तो पूर्ण करण्यास मदत करणे ही आमची संविधानिक जबाबदारी आहे. त्यामुळे TVK ला सरकार स्थापन करण्यासाठी पूर्ण पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. संविधानावर विश्वास नसलेल्या कोणत्याही सांप्रदायिक शक्तींना दूर ठेवण्याच्या अटीवर हा पाठिंबा देण्यात आल्याचेही काँग्रेसने स्पष्ट केले आहे. काँग्रेसची ही अट भविष्यातील राजकारणासाठी गेमचेंजर ठरू शकते. टीव्हीकेला एडीएमके-भाजप आघाडीपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने हे स्पष्ट केले आहे.
ही आघाडी परस्पर आदर, योग्य वाटा आणि सामुहिक जबाबदारी यावर आधारित असेल. केवळ सरकार स्थापन करण्यापुरतीच ही आघाडी मर्यादित नसून स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा आणि राज्यसभा निवडणुकांमध्येही कायम राहील, असेही चोडणकर यांनी जाहीर केले. विजय आणि राहुल गांधी यांनी तमिळनाडूच्या जनतेच्या या ऐतिहासिक जनादेशाचा आदर करण्याची आणि विशेषतः युवकांच्या अपेक्षा व आशा पूर्ण करण्याची प्रतिज्ञा केली असल्याचे चोडणकर यांनी म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.