

CPWD expenditure news : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळातील मंत्र्यांसाठीच्या अधिकृत निवासस्थानांच्या नुतणीकरणाचा खर्च वर्षागणिक वाढत चालला आहे. मागील १२ वर्षांत हा खर्च तब्बल तिपटीने वाढल्याचे माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीतून समोर आले आहे. हा खर्च २०२५-२६ मध्ये विक्रमी ९२ कोटी ३५ लाखांवर पोहोचला आहे.
दिल्लीतील लुटियन्स झोनमध्ये केंद्रीय मंत्र्यांचे बंगले आहेत. या बंगल्यांच्या दुरुस्ती, सजावट, नूतनीकरण आणि देखभालीवरील खर्चामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. PTI ने आरटीआयअंतर्गत विचारलेल्या प्रश्नावर ही माहिती समोर आली आहे. आर्थिक वर्ष २०१४-१५ मध्ये २७.४७ कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून ही कामे केली जातात.
आर्थिक वर्ष २०१४-१५ ते २०२५-२६ या कालावधीत संबंधित कामांवर एकूण ५४७ कोटी ६८ लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. बंगल्यांची दुरुस्ती, नूतनीकरण आणि देखभालीची कामे या खर्चातून केली जातात. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, एका अधिकाऱ्याने सांगितले की, जुन्या वास्तूंच्या देखभालीचा खर्च वाढत चालला आहे. तसेच त्यात महागाईचीही भर पडत आहे.
लुटियन्स झोनमध्ये ब्रिटिश काळात निवासस्थाने उभारण्यात आली होती. त्यामुळे त्याच्या दुरुस्तीवर प्रचंड खर्च होत असल्याचा दावा केला जात आहेत. बंगल्यांमध्ये पाणी झिरपणे, वाळवी, अत्यंत जुनाट विद्युत व्यवस्था आणि जुन्या पाइपलाईन यासाठी वारंवार खर्च करावा लागत आहे. बहुतेक बंगले ८० ते १०० वर्षे जुने आहेत. काही बंगल्यांचे बांधकाम धोकादायक बनल्याने त्याचे नुतणीकरण गरजेचे होते, असेही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
केंद्रीय मंत्र्यांप्रमाणेच खासदार, न्यायाधीश, वरिष्ठ अधिकाऱ्यांचेही या भागात निवासस्थान आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, २०१४ ते २०१९ या काळात केंद्रीय मंत्र्यांच्या बंगल्यांवर विविध कारणांसाठी दरवर्षी सरासरी २६ कोटी ७८ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. हा खर्च २०१९ ते २०२४ या कालावधीत ५० कोटींवर गेला. तर २०२४-२५ मध्ये ७१ कोटी ९८ लाख आणि २०२५-२६ मध्ये ९२ कोटी ३५ लाख एवढा विक्रमी झाला आहे. हा खर्च केवळ केंद्रीय मंत्र्यांच्या बंगल्यावर करण्यात आलेला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.