

Shiv Sena UBT: मागील काही दिवसांपुर्वी (२१ जून) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन टायगर राबवत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ६ खासदारांना शिवसेनेत सामील करून घेतले. या फुटीनंतर डॅमेज कंट्रोल करण्यासाठी उद्धव ठाकरे या फुटीर खासदारांच्या मतदारसंघांच्या दौऱ्यावर आहेत. ठाकरे या धक्क्यातून सावरतात तोपर्यंत आता एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना अजुन एक धक्का दिला आहे. शिंदे यांनी थेट आदित्य ठाकरेंचे एकनिष्ठ समजले जाणारे आमदार सचिन अहिर यांनाच विधान परिषदेच्या उपाध्यक्ष पदाची उमेदवारी दिली आहे. अहिर यांनी आता शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावर दुखावलेल्या आदित्य ठाकरेंनी सचिन अहिर यांना काय-काय दिलं ते सांगितलं आहे.
गेले चार वर्ष आम्ही पाहतोय जे जवळचे लोक आहेत ज्यांना सगळं काही मिळतं हेच स्वत:च्या स्वार्थासाठी जे निघून जातात. याच्यात काही नवीन नाही. धक्का बसण्यासारखं काही नाही. तसं पाहिलं तर वरळी असेल पूर्ण शिवडी वगैरे हा पूर्ण पट्टा हा बालेकिल्ला होता आणि अजूनही आहे. आमचं तिकडचं काम बोलतं म्हणून कोणी येण्याने कोणी जाण्यानी धक्का काही बसत नाही.
पण एकच दुर्दैवाच आहे की ज्यांना आम्ही सगळं काही दिलं, जवळ होते तेच निघून जात आहेत. बर ही व्यक्ती अशी नाही की आदित्य ठाकरे भेटतच नाही, हे ते बोलूच शकत नाहीत. कारण परवा पण आम्ही पुण्यातून एकत्र आलो. हे सगळं खरं असलं तरी प्रश्न हाच येतो की अजून काय पाहिजे तुम्हाला? अजून किती ओरबडणार? म्हणजे स्वतः आमदार आहेत, मी त्यांच्याच मुलीला प्रभाग समिती दिलेली आहे, भावाला आम्ही बीएससीची समिती दिलेली आहे, भारतीय कामगार सेनेत पद आहे, शिवसेनेत उपनेता पद आहे, बेस्टचे युनियनचे अध्यक्ष आहेत.
एवढं सगळं होऊन देखील मग अजून तुम्हाला काय पाहिजे? हा एक प्रश्न पडतोच. म्हणजे आम्ही काही कमी दिलं का? तसं नाही. जे काही इतर बोंबलत असतात की भेटत नव्हतो, भेटत नव्हतो, तस होतं का? रोज तुमचे माझ्यासोबत फोटो आहेत, रोज येताना-जाताना भेटता, मग अजून काय करायचं तुमच्यासाठी? रोज तुमच्या आरत्या करायच्या का? त्यामुळे कोणी येण्याने कोणी जाण्याने काही फरक पडत नाही. जो बालेकिल्ला आहे तो तसाच राहणार.
आदित्य ठाकरेंचे जवळचे समजले जाणारे सचिन अहिर यांनीच साथ सोडल्याने हा ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे. अहिर यांच्या पाठोपाठ आता विधान परिषदेचे आमदार सुद्धा ठाकरेंची साथ सोडणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.