

Baramati News: कवी मनाचे नेते आणि शिवछत्रपतींचे वैचारिक वारसदार अभिजीत बिचुकले हे राष्ट्रपती पदापासून ते सरपंचपदापर्यंतच्या प्रत्येक निवडणूक लढवण्यास इच्छुक असतात. आता बिचुकलेंनी थेट बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत उडी घेतली आहे. त्यांनी बारामती पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळं रिक्त झालेल्या बारामती मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे.या निवडणुकीसाठी येत्या 23 एप्रिलला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी अभिजीत बिचुकले यांनी शनिवारी (ता.4एप्रिल) उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अभिजीत बिचुकले यांनी त्यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
एकीकडे बारामतीची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सत्ताधारी महायुतीनं कंबर कसली आहे. मुख्यमंत्र्यांपासून ते शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतेमंडळींनीही सुनेत्रा पवारांविरोधात उमेदवार देऊ नये अशीच जोरदार भूमिका मांडली आहे.
तर दुसरीकडे विरोधकांच्या महाविकास आघाडीच्या गोटात मात्र बारामतीत उमेदवार देण्यासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत. अशातच आता अभिजित बिचुकले यांनी बारामती पोटनिवडणुकूीत शड्डू ठोकल्यानं ही लढत चुरशीची होणार असल्याचं बोललं जात आहे.
कोणतीही निवडणूक जाहीर झाली की अभिजीत बिचुकले कायमच उमेदवारी अर्ज दाखल करताना दिसून येतात. आता त्यांनी बारामती विधानसभा पोटनिवडणूकही पूर्ण ताकदीनिशी लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे.
तसेच बारामती पोटनिवडणूक लढवण्यापाठीमागची त्यांची भूमिका,अपक्षच उमेदवारी अर्ज का दाखल केला याबाबतचं स्पष्टीकरण येत्या दोन-तीन दिवसांत पत्रकार परिषद घेऊन देणार असल्याचं बिचुकले यांनी म्हटलं आहे.
बारामती पोटनिवडणुकीसाठी आतापर्यंत 12 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती समोर येत आहे. यात रघू घुटूकडे, सागर भिसे, सतिश कदम, अरुण नितुरे, अभिजीत कांबळे, दादा थोरात, संकेत गावडे,अनिल तपे, रझ्जाक उर्फ अब्दुलरौफ जफर मुलाणी,अभिजीत बिचुकले, विलास होळकर,संदीप खरात, मिथुन आटोळे, दत्तात्रय बेडरे,दिलीप अलोनी,त्रिशला कांबळे, गजानन गवळी यांचा समावेश आहे.
अभिजित बिचुकले यांचं मूळ गाव हे सातारा जिल्ह्यातल्या बिचुकले आहे. त्यांनी शिवाजी विद्यापीठातून पदवीचं शिक्षण पूर्ण केल्याचं ते नेहमी सांगतात. त्याचवेळी त्यांनी लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयातूनही शिक्षण घेतले. 1997 मध्ये कोल्हापुरच्या शिवाजी विद्यालयातून ते पदवीधर झाले.
त्यानंतर 2001 साली साताऱ्याच्या लाल बहादुर शास्त्री कॉलेजमधून त्यांनी इंग्रजी हा मुख्य विषय घेऊन ऑनर्ससह पदवी मिळविली. सातारा लोकसभा मतदारसंघातून थेट उदयनराजेंविरोधात निवडणूक लढवणारे अभिजित बिचुकले हे त्यांना एक दिवस या देशाचं पंतप्रधान आणि राष्ट्रपती व्हायचं असल्याचं सांगतात.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.