

Mumbai News : राज्यात पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपने विजयी घोडदोड सुरूच ठेवली आहे. राज्यात डिसेंबर महिन्यात पार पडलेल्या 188 नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक 117 ठिकाणी नगराध्यक्ष निवडून आले. त्यानंतर जानेवारी महिन्यात पार पडलेल्या 29 पैकी 20 शहरामध्ये कमळ फुलले. महापालिका निवडणुकीनंतर झेडपी व पंचायत समिती निवडणुकीत विजयाची मालिका कायम ठेवली असून फेब्रुवारी महिन्यात 34 पैकी निवडणुका झालेल्या 12 जिल्हा परिषद निवडणुकीत 8 ठिकाणी भाजपचे अध्यक्ष झाले आहेत. भाजपने पहिल्यांदाच राज्यभरात दमदार कामगिरी करीत एक हाती वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
भाजपकडून शिवसेना, राष्ट्रवादीला संभाजीनगर, परभणी, सातारा, सोलापूर झेडपीत बेदखल करण्यात आले आहे. तर दुसरीकडे रायगडमध्ये महायुती भाजपचा अध्यक्ष तर राष्ट्रवादी काँग्रेसचा उपाध्यक्षपद तर शिवसेनेचे सभापती झाले आहेत. लातूरमध्ये भाजपचा अध्यक्ष तर राष्ट्रवादीचा उपाध्यक्ष, धाराशिवमध्ये भाजपचा अध्यक्ष तर शिंदे शिवसेनेचा उपाध्यक्ष, सिंधुदुर्गमध्ये अध्यक्ष भाजपचा तर शिंदे शिवसेनेचा उपाध्यक्ष झाला आहे. कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादीचा अध्यक्ष तर भाजपचा उपाध्यक्ष आहे. पुण्यात राष्ट्रवादीचा स्वबळावर अध्यक्ष उपाध्यक्ष आहे. रत्नागिरीतर शिंदे शिवसेनेचा स्वबळावर अध्यक्ष, उपाध्यक्ष आहे. सांगलीत महाविकास आघाडीचा अध्यक्ष, उपाध्यक्ष झाला आहे.
राज्यातील 12 पैकी तब्बल 8 जिल्हा परिषदामध्ये भाजपचे अध्यक्ष झाले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे दोन ठिकाणी अध्यक्ष झाले तर एक ठिकाणी शिंदे यांच्या शिवसेनेचा अध्यक्ष झाला तर एक ठिकाणी महाविकास आघाडीतील शरद पवार पक्षाचा अध्यक्ष झाला आहे. छत्रपती संभाजीनगर, परभणी, रायगडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीने शिंदे शिवसेनेला दूर ठेवले. तर साताऱ्यामध्ये भाजपने शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवले आहे.
एकनाथ शिंदे यांच्या सेनेला धक्का
छत्रपती संभाजीनगर, रायगड व परभणी जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने एकत्र येत शिंदे यांच्या सेनेला सत्तेपासून दूर ठेवल्याने 'महायुती'मध्ये तणाव वाढला आहे. तर सातारा झेडपीमध्ये भाजपने शिंदे यांची शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का दिला आहे. अजित पवार पक्षाने ताकद असलेल्या पुणे, रायगड, कोल्हापुर आणि सांगलीत वर्चस्व सिद्ध केले आहे.
कोकणात भाजपचे वर्चस्व
कोकणतील तीन जिल्हा परिषदेपैकी दोन ठिकाणी भाजपचे अध्यक्ष झाले. त्यामुळे कोकण हा शिंदे सेनेचा नव्हे तर भाजपचा बालेकिल्ला असल्याचा संदेश दिला आहे. शिंदे सेनेला एका ठिकाणी अध्यक्ष झाला आहे. रायगड जिल्हा परिषदेत निवड बिनविरोध पार पडली. अध्यक्षपदी भाजपचे मंगेश वाकडीकर, तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर पाटील यांची निवड झाली. रत्नागिरी जिल्हा परिषदेवर निर्विवाद वर्चस्व मिळवणाऱ्या शिंदे सेनेच्या मंडणगडच्या सदस्य अस्मिता केंद्रे यांची अध्यक्षपदी तर विलास चाळके यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपचे प्रमोद कामत यांची तर उपाध्यक्षपदी शिंदे सेनेचे दादा साईल यांची वर्णी लागली आहे.
पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा दबदबा कायम
पश्चिम महाराष्ट्र हा पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणे व कोल्हापूर झेडपीवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष झाला आहे. तर सांगली जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीतील शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष तर काँग्रेसचा उपाध्यक्ष झाला.
कोल्हापूर झेडपीच्या अध्यक्षपदी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेच्या शिल्पा शशिकांत खोत यांची तर उपाध्यक्षपदी भाजपचे तानाजी पाटील यांची निवड झाली. सांगली जिल्हा परिषदेवर मविआचा झेंडा फडकला. अध्यक्षपदी शरद पवार यांच्या पक्षाच्या संगीता पाटील तर उपाध्यक्षपदी ॠषिकेश लाड यांची निवड झाली. पुणे झेडपीच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे वीरधवल जगदाळे यांची तर उपाध्यक्षपदी विवेक वळसे पाटील यांची निवड झाली. सोलापूर झेडपीच्या अध्यक्षपदी दीपक वैद्य यांची तर उपाध्यक्षपदी इंद्रजित पवार यांची बिनविरोध निवड झाली. सातारा झेडपीत अध्यक्षपदाच्या निवडणुकीत धक्कादायकरित्या भाजप उमेदवार प्रिया शिंदे यांची तर उपाध्यक्षपदी भाजपचे राजू भोसले यांची निवड झाली.
मराठवाडा झाला भाजपचा बालेकिल्ला
मराठवाड्यातील चारही जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. चार ठिकाणी भाजपचे अध्यक्ष झाले आहेत. लातूर झेडपीच्या अध्यक्षपदी भाजपच्या उषा तळेगावकर यांची निवड झाली. तर उपाध्यक्षपदावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दयानंद सुरवसे यांना संधी देण्यात आली. परभणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपच्या लता वाकळे यांची तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीकांत विटेकर यांची निवड झाली.
छत्रपती संभाजीनगर झेडपीच्या दोन्ही पदांवर भाजपने निर्विवाद विजय मिळवत सत्ता आपल्या हाती घेतली आहे. अध्यक्षपदी अविनाश गलांडे, तर उपाध्यक्षपदी जितेंद्र जैस्वाल यांची बिनविरोध निवड झाली. तर धाराशिव झेडपीचे अध्यक्षपद भाजपच्या अर्चना पाटील यांची तर उपाध्यक्षपदी शिंदे शिवसेनेच्या माजी खासदार रवींद्र गायकवाड यांच्या पत्नी उषा गायकवाड यांना संधी दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.