

New dehli News : संसदेचे पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून सुरु होणार आहे. त्यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याने राजकीय घडामोडीला वेग आला आहे. मंत्रिमंडळ विस्तारात कोणत्या नेत्याला संधी मिळणार याची उत्सुकता लागली आहे. त्यातच दोन दिवसापूर्वीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची बैठक पार पडली. यामध्ये येत्या काळात होत असलेल्या विस्ताराबाबत विस्तृतपणे चर्चा करण्यात आली. त्यासोबतच भाजपमध्ये संघटनात्मक बदल येत्या काळात करण्यात येणार आहेत. त्याविषवयी उत्सुकता लागली असतानाच आता भाजपच्या संसदीय मंडळात लवकरच फेरबदल करण्यात येणार असल्याचे समजते. त्यामध्ये महाराष्ट्रातील दोन बड्या नेत्यांना लॉटरी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
केंद्रातील नव्या टीमची आखणी करण्यासाठी 2 जुलैला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन आणि राष्ट्रीय सरचिटणीस बी एल संतोष या तिघांमध्ये तीन तास सविस्तर चर्चा झाल्याचे समजते. मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदलाची तयारी अंतिम टप्प्यात असून लवकरच यासंदर्भातील घोषणा करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ फेररचनेत काही केंद्रीय मंत्र्यांना पक्ष संघटनेत पुन्हा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या जाऊ शकतात. तर पक्षातील काही दिग्गज पदाधिकाऱ्यांना केंद्र सरकारमध्ये मंत्रीपदाची संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नितीन नबीन यांना भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर स्थान देण्यात आल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखालील टीममध्ये तरुण आणि नव्या चेहऱ्यांवर भर दिला जाणार आहे. त्याचबरोबर अनुभवी वरिष्ठ नेते आणि नव्या पिढीतील नेत्यांचा समतोल साधण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे. भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, राष्ट्रीय सरचिटणीस, राष्ट्रीय सचिव तसेच केंद्रीय मीडिया टीममधील नियुक्त्यांबाबतीत उच्चस्तरीय चर्चा सुरु आहे. पक्षाच्या नव्या टीम तयार करताना प्रादेशिक, राज्यनिहाय आणि जातीय प्रतिनिधित्वाला महत्व दिले जाणार आहे,
या संघटनात्मक फेररचनेसोबतत भाजपची निर्णयप्रक्रिया सांभाळणाऱ्या ११ सदस्यीय संसदीय मंडळातही (Parliamentary Board) मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील दोन नेत्यांची नावे चर्चेत आहेत. संसदीय मंडळात माजी मंत्री विनोद तावडे, सुनील बन्सल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांची या निर्णायक मंडळात वर्णी लागणार असल्याची चर्चा आहे.
संघटन कौशल्य, निवडणूक व्यवस्थापनातील अनुभव आणि विविध राज्यांतील राजकीय प्रभाव लक्षात घेऊन या नेत्यांना महत्त्वाची जबाबदारी दिली जाऊ शकते, अशी सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे आगामी काळात होत असेलल्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार व 11 सदस्यीय संसदीय मंडळाच्या फेरबदलात कोणाची निवड केली जाणार याबाबत उत्सुकता लागली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.