

BJP Yuva Morcha News : भारतीय जनता पक्षाने (भाजप) आपल्या युवा शाखेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत नव्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. भारतीय जनता युवा मोर्चाच्या (BJYM) नव्या संघात महाराष्ट्रातील 3 नेत्यांना संधी मिळाली आहे. या नियुक्त्यांमुळे राज्यातील युवा नेतृत्वाला राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी मिळणार आहे. भाजपच्या युवा मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत सांगलीतील वीरेंद्र पृथ्वीराज पाटील आणि मुंबईतील गुरदित सिंह वोहरा यांचा राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.
तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील नगरसेविका सायली रघुनाथ कुलकर्णी यांची राष्ट्रीय मंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील या तिन्ही चेहऱ्यांवर आता राष्ट्रीय स्तरावरील संघटनात्मक जबाबदारी सोपवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले सांगलीतील नेते पृथ्वीराज (बाबा) पाटील यांच्या मुलाचाही राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश झाल्याने राजकीय वर्तुळात या नियुक्त्यांची चर्चा सुरू झाली आहे.
भाजपच्या युवा मोर्चाची राष्ट्रीय कार्यकारिणी देशभरातील तरुण नेतृत्वाला संघटनेत संधी देण्याच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जाते. नव्या संघात विविध राज्यांतील पदाधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला असून, संघटनात्मक कामाचा विस्तार करण्यावर भर देण्यात आला आहे.
भाजपच्या युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांचे काम केवळ पक्षाच्या कार्यक्रमांपुरते मर्यादित नसते. केंद्र सरकारच्या योजनांची माहिती युवकांपर्यंत पोहोचवणे, पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवणे, नव्या कार्यकर्त्यांना जोडणे आणि विविध उपक्रमांची अंमलबजावणी करणे, अशा जबाबदाऱ्या त्यांच्यावर असतात.
राष्ट्रीय कार्यकारिणीत महाराष्ट्रातील तिन्ही नेत्यांचा समावेश झाल्याने राज्यातील युवा नेतृत्वाला देशपातळीवर काम करण्याची संधी मिळाली आहे. विशेषतः सायली कुलकर्णी यांची राष्ट्रीय मंत्रीपदी नियुक्ती आणि वीरेंद्र पृथ्वीराज पाटील व गुरदित सिंह वोहरा यांचा कार्यकारिणीतील समावेश यामुळे महाराष्ट्राच्या प्रतिनिधित्वाकडे लक्ष वेधले गेले आहे.
आता या नव्या नियुक्त्यांनंतर महाराष्ट्रातील युवा मोर्चाचे संघटनात्मक काम राष्ट्रीय स्तरावर कशा प्रकारे पुढे जाते, तसेच नव्या पदाधिकाऱ्यांवर सोपवलेल्या जबाबदाऱ्या ते कशा पार पाडतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष असेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.