ChandraPur News : चंद्रपूर महापालिका निवडणुकीत मोठा ट्विस्ट पाहवयास मिळत आहे. येथील महापौर निवडीसाठी 10 फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. महापौर पदासाठी भाजप, काँग्रेस व उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे या निवडीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. विशेषतः या महापालिका निवडणुकीत या ठिकाणच्या जनतेने त्रिशंकू कौल दिला आहे. त्यामुळे पहिल्या दिवसापासूनच काँग्रेस व भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु आहे. विशेषतः या ठिकाणच्या सत्तेची चावी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या हाती असून ते ज्या बाजूने जातील त्यांची सत्ता येणार असल्याने या ठिकाणी मोठा ट्विस्ट पाहवयास मिळत आहे.
त्यातच आता काँग्रेसला सत्तेपासून रोखण्यासाठी भाजपने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सव्वा वर्ष महापौरपदाची ऑफर दिली असल्याचे समजते. त्यामुळे आता येत्या काळात याठिकाणी य युती होणार की 'गेम' फिरणार? याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी 10 फेब्रुवारी 2026 रोजी विशेष सभा बोलावण्यात आली असून, याच दिवशी मतदान आणि निकाल जाहीर होणार आहे. महापौर निवडीसाठी दोन दिवसाचा अवधी शिल्लक आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातच आता भाजपने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला नवी ऑफर दिली आहे. त्यानुसार भाजपने ठाकरेंच्या सेनेला सव्वा वर्ष महापौर पद त्यासोबतच दोन वर्ष स्थायी समितीचे सभापती पदाची ऑफर दिली आहे.
दुसरीकडे भाजपने ही ऑफर दिली असली तरी पहिल्या सव्वा वर्षासाठी भाजपचा की ठाकरेंच्या शिवसेनेचा महापौर असणार यावरून एकमत झालेले नाही. त्यामुळे पडद्यामागे राजकीय हालचाली सुरु आहेत. त्यामुळे ही युती अद्याप महापौर पदावरून अडली असून आता भाजप हा तिढा कशाप्रकारे सोडविणार याकडे लक्ष लागले आहे.
चंद्रपूर महापौर निवडीचा तिढा काँग्रेसमधील अंतर्गत वादामुळे दिल्ली दरबारी जाऊन आलेला आहे. याठिकाणी काँग्रेसच्या पक्ष श्रेष्ठीने माजी मंत्री विजय वडेट्टीवार व खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातील वादावर दिल्ली दरबारी तोडगा काढला होता. त्यानंतर आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत काँग्रेस जुळवून घेणार का याकडे लक्ष लागले असतानाच आता भाजपने मोठा डाव टाकला असल्याची चर्चा आहे.
चंद्रपूर महापालिकेत एकूण 66 नगरसेवक आहेत. याठिकाणी बहुमताचा आकडा गाठण्यासाठी 34 नगरसेवकांची गरज आहे. काँग्रेसकडे 27 नगरसेवक आहेत तर भाजपकडे 23 नगरसेवक आहेत. भाजप आणि काँग्रेसला (Congress) सत्तेत येण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या सहा नगरसेवकांची गरज भासणार आहे. शिवसेनेसोबत वंचित आघाडीचे दोन तर अपक्ष दोन नगरसेवक असे 10 नगरसेवक एकत्र आहेत. त्यामुळे कोणाचा महापौर होणार याबाबत सस्पेन्स कायम आहे.
भाजपकडून संगीता खांडेकर या भाजपच्या (BJP) महापौर पदाच्या अधिकृत उमेदवार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यानंतरही भाजपच्या सारिका संदुरकरांनी गुरुवारी महापौर पदाच्या उमेदवारीचा अर्ज भरला आहे. त्यामुळे भाजपमधील दोन नेत्यांमधील वाद या निमित्ताने चव्हाट्यावर आला आहे. या दोन नेत्याने एकमेकांवर टीका केली असल्याने वातावरण चांगलेच तापले आहे.
चंद्रपुरातील सत्तास्थापनेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या ठिकाणी गेल्या काह दिवसापासून मोठ्या घडामोडी घडत आहेत. काँग्रेसमधील दोन गटातील वाद दिल्लीदरबारी पोहचला होता. तर चंद्रपूर महापौर पदाच्या निवडणुकीत आता ट्विस्ट पाहावयास मिळत आहे. किंगमेकर असलेल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवाराने महापौर पदासाठी उमेदवार रिंगणात उतरवला असल्याने प्रस्थापितांची झोप उडाली आहे. तर दुसरीकडे भाजपचा उमेदवार जाहीर होताच मुनगंटीवार, जोरगेवार हे आमने-सामने आले आहेत. त्यामुळे सर्वांचे महापौर निवडीकडे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.