

Maharashtra company closures : चाकण औद्योगिक वसाहतीतील तब्बल 20 कंपन्यांनी वाहतूक कोंडी, प्रदूषण, पाणी, वीज आणि रस्त्यांच्या समस्यांमुळे स्थलांतराचा निर्णय घेतल्याची बाब समोर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली होती. या कंपन्यांमध्ये सुमारे 2 हजारांहून अधिक कामगार कार्यरत असून, उद्योगांचे स्थलांतर झाल्यास रोजगाराच्या संधींवर परिणाम होऊ शकतो.
त्यामुळे हे उद्योग चाकणमधून बाहेर जाऊ नयेत, रोजगार टिकून राहावा आणि राज्याची औद्योगिक ताकद कायम राहावी, यासाठी राज्य सरकारने तातडीने लक्ष घालावे, असा सल्ला शरद पवार यांनी दिला होता. शरद पवार यांनी या संदर्भात सोशल मीडियावर पोस्ट केली होती. आता त्यांच्या या पोस्टला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देत राज्यातील उद्योग आणि कंपन्यांच्या आकडेवारीबाबत सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे.
संसदेच्या अधिवेशनादरम्यान खासदार राजाभाऊ वाजे यांनी राज्याच्या औद्योगिक धोरणासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा यांनी गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रातील तब्बल 36,211 खासगी कंपन्या बंद झाल्याची माहिती दिली होती. या मुद्द्यावरून शरद पवार यांनी राज्यातील उद्योगांच्या स्थितीबाबत चिंता व्यक्त केली होती.
याला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, संसदेतील खासदार राजाभाऊ वाजे यांच्या प्रश्नाला केंद्र सरकारकडून काही माहिती देण्यात आली. महाराष्ट्रातील 36,211 कंपन्या बंद झाल्याची माहिती समोर आल्यानंतर काही नवख्या नेत्यांनी त्याचा सोयीस्कर अर्थ काढून सोशल मीडियावर पोस्ट केल्या आणि काही माध्यमांनीही त्याबाबत बातम्या केल्या. मात्र, शरद पवार हे कायम महाराष्ट्रहिताचा विचार करणारे ज्येष्ठ आणि सुजाण नेते असल्याने त्यांच्या मनात कोणताही गैरसमज राहू नये, यासाठी आपण सविस्तर स्पष्टीकरण देत असल्याचे फडणवीस यांनी म्हटले.
फडणवीस यांनी सांगितले की, बंद झालेल्या कंपन्यांपैकी सुमारे 76 टक्के कंपन्या या डिफंक्ट स्वरूपाच्या आहेत. म्हणजेच या कंपन्यांपैकी अनेक कंपन्या प्रत्यक्षात कधी कार्यरतच झाल्या नाहीत किंवा निष्क्रिय अवस्थेत होत्या. संसदेतील प्रश्नोत्तरांच्या प्रक्रियेत संक्षिप्त स्वरूपात माहिती दिली जाते. मात्र, कंपन्यांबाबतचा सविस्तर तपशील कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे त्यांनी नमूद केले, आणि मला सांगताना हेही आनंद होतो की, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र क्रमांक 1 वर होता आणि कायम क्रमांक 1 वरच राहील.
माध्यमांमधील बातम्यांनी तर अनेक कंपन्या बंद झाल्या, असा आभास निर्माण झाला. त्यामुळे त्यांना हा विषय अधिक तपशीलात कळावा, म्हणून येथे काही माहिती देतो आहे, असं म्हणत त्यांनी काही आकडेवारी देखील दिली. देशातील कंपन्यांची आकडेवारी देताना फडणवीस यांनी म्हटले की, भारतात सध्या 31 लाखांहून अधिक कंपन्या नोंदणीकृत आहेत.
त्यापैकी सुमारे 21 लाख कंपन्या सक्रिय आहेत. 2015-16 मध्ये देशातील सक्रिय कंपन्यांची संख्या 6,78,768 इतकी होती. ती आता 21,17,747 इतकी झाली आहे. गेल्या दहा वर्षांत सक्रिय कंपन्यांच्या संख्येत तिपटीहून अधिक वाढ झाल्याचा दावाही त्यांनी केला. महाराष्ट्र उद्योग क्षेत्रात इतर राज्यांच्या तुलनेत आघाडीवर असल्याचे सांगतानाच फडणवीस यांनी चाकणमधील समस्यांचीही दखल घेतली. चाकण औद्योगिक परिसरात काही समस्या निश्चितपणे असल्याचे त्यांनी मान्य केले असून, याबाबत उद्योगमंत्री उदय सामंत यांना लक्ष घालण्याचे निर्देश दिल्याचे सांगितले.
चाकणमधील वाहतूक, पायाभूत सुविधा, पाणी, वीज आणि रस्त्यांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी अल्पकालीन आणि दीर्घकालीन असा आराखडा तयार करण्यात आल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. चाकणमधून एकही उद्योग बाहेर जाऊ नये, असाच सरकारचा प्रयत्न असेल, असे त्यांनी म्हटले. महाराष्ट्र हे उद्योगस्नेही राज्य असून परकीय गुंतवणुकीत राज्य सातत्याने आघाडीवर आहे आणि भविष्यातही राज्य क्रमांक एकवर राहील, असा विश्वासही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्रच सर्वांत पुढे
दरम्यान, यावेळी फडणवीसांनी देशभरातील कंपन्यांची आकडेवारी दिली. ते म्हणाले, नवीन कंपनींची नोंदणी (टॉप टेन राज्य) दरवर्षी सुमारे 1 लाख नवीन कंपनींची देशात नोंदणी होत असते. त्यात दरवर्षी महाराष्ट्र सर्वांत पुढे असतो. उदाहरणासाठी 2025-26 या वर्षांची आकडेवारी घेऊ. महाराष्ट्र : 41,525 कंपन्या, दिल्ली : 20,272 कंपन्या, उत्तरप्रदेश : 27,494 कंपन्या, कर्नाटक : 17,857 कंपन्या, तामिळनाडू : 17,024 कंपन्या, तेलगंणा : 17,300 कंपन्या, गुजरात : 14,666 कंपन्या आणि पश्चिम बंगाल : 10,598 कंपन्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.