
Mumbai News : प्रचंड बहुमतासह सत्तेत आलेल्या महायुती सरकारमधील रोज नव्या नव्या रुसवे फुगवे समोर येत आहे. एकीकडे रायगड,नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा कायम असतानाच परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अर्थखात्यावरच टीकेची झोड उठवली. आता हा मुद्दा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्रात आलेल्या गृहमंत्री अमित शाहांच्या (Amit Shah) कानावर घालत निधीवाटपावरुनची तक्रार केली आहे. याच संदर्भात आता मोठी अपडेट समोर येत आहे.
दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय गृहमंत्री व भाजप नेते अमित शाह यांच्या उपस्थितीत मुंबईत शनिवारी (ता.12) रात्री एक महत्त्वाची बैठक पार पडणार असल्याची माहिती समोर येत आहे. या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शाहांकडे अर्थखात्याबाबत केलेल्या तक्रारीवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अजित पवारांच्या अर्थखात्याकडून शिवसेनेच्या मंत्र्यांच्या फायली वेळेवर क्लिअर केल्या जात नाहीत. यामुळे शिवसेना मंत्र्यांच्या आणि आमदारांच्या विकासकामांमध्ये अडथळा येत असल्याची तक्रार शिंदेंनी अमित शुक्रवारी(ता.11)झालेल्या बैठकीत केल्याची चर्चा आहे.याचमुळे तातडीनं सह्याद्री अतिथीगृहावर अमित शाहांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार पुण्यतिथीनिमित्तच्या कार्यक्रमाला रायगडावर उपस्थिती लावली होती. खरंतर या कार्यक्रमासाठी आलेल्या अमित शाहांकडून महाराष्ट्र आणि त्यातल्या त्यात महायुतीतील अंतर्गत राजकारणाचा आढावाही घेतला जाण्याची शक्यता आहे.
अमित शाह शुक्रवारी महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतरच राजकीय घडामोडींना वेग आला होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही अमित शाह यांची पुण्यात भेट घेतल्याची माहिती समोर आली होती. दोन्ही नेत्यांची बैठक देखील झाल्याची खात्रीलायक माहिती आहे.
याचप्रमाणे आता शनिवारीही रात्री उशिरापर्यंत मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर मोठी खलबतं होण्याची शक्यता आहे. कारण अमित शाह यांची मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत सह्याद्री अतिथीगृहात बैठक होणार असल्याची माहिती आहे. याबाबत मंत्री व भाजप नेते आशिष शेलार यांनीही बैठकीचे संकेत दिले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासाठी स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं. रायगडमधील रोहा तालुक्यातील सुतारवाडी येथील सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी अमित शाह यांचा शाही पाहुणचार करण्यात आला.
सुनील तटकरे यांच्या घरी जेवण केल्यानंतर अमित शाह हे मुंबईला रवाना झाले. रायगडचा पालकमंत्रिपदासाठी शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी थेट उठावाचीच भाषा केल्यानं स्थानिक राजकारणात तणाव निर्माण झाला आहे. पण शाहांसोबतच्या या डिनर डिप्लोमसीनंतर रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा लवकरच सुटण्याची शक्यता वर्तवली जात आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.