

FDA Commissioner Tukaram Mundhe : धडाकेबाज IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांची अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर आता राज्यभर जोरदार कारवाई केली जात आहे. त्यांनी बेकायदेशीर कामांविरोधात सुरू केलेल्या कारवाईमुळे राज्यभरातील भेसळ माफियांचे धाबे दणाणले आहेत. अशातच ठाणे जिल्ह्यातील कल्याणमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांना शिवीगाळ केल्याचे समोर आले असून पोलिसांनी एका कॅब चालकाला ताब्यात घेतले आहे.
आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासनाचा कारभार हाती घेताच कारवाईचा धडाका लावला आहे. भेसळ युक्त पदार्थ विक्रेते असो की गुटखा विक्रेते सर्वांवर तुकाराम मुंढेंनी कारवाई बडगा उगारलाय. मुंढेंच्या कारवाईमुळे राज्यभरातील भेसळ माफियांसह खाद्यपदार्थ विक्रेते, उत्पादक, औषध विक्रेते, कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत.
अनेकांनी आपले काळे धंदे बंद केले असून पान टपऱ्या देखील बंद झाल्या आहेत. कारवाईच्या धसक्याने राज्यात असे चित्र निर्माण झाले आहे. गुटखा विक्री बंदी घातल्यानं अनेकांनी पान टपऱ्या बंद केल्या असून यामुळे गुटखा खाणाऱ्याचे वांदे झाल्याचे समोर आले आहे. याचाच राग मनात धरत एका कॅब चालकाने थेट आयुक्त मुंढेंनाच शिवीगाळ केल्याचे समोर आले आहे.
या कॅब चालकाने गुटखा विक्रीविरोधातील कारवाईमुळे संतप्त होऊन मुंढेंना शिव्या हासडल्या असून मुंढेंच्याविरोधात आक्षेपार्ह व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. ज्यानंतर आता राज्यभर खळबळ उडाली आहे. तर याबाबत खडकपाडा पोलिसांनी तपास सुरू केला असून त्या कॅब चालकाला शोध पोलिसांनी घेतला आहे.
या व्यक्तीचे नाव दुर्गाप्रसाद पांडे असे असून तो कल्याण पूर्व येथील कोळसेवाडी परिसरात राहतो. धक्कादायक म्हणजे त्याच्या वडिलांची टपरी होती, जी बंद करण्यात आली आहे. त्याला गुटखा मिळत नसल्याने त्याने तुकाराम मुंढेंवर राग काढला. मुंढे यांच्याविरोधात आक्षेपार्ह भाषेत व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर प्रसारित केला.
यानंतर खडकपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मारुती आंधळे पोलीस अधिकारी भूषण देवरे यांच्या पथकाने दुर्गाप्रसाद पांडेचा शोध घेत त्याला 4 तासात ताब्यात घेतले. आता त्याच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात आली असून पुढील तपास केला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.