

Mumbai News : मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया परिसरातील रेडिओ क्लब प्रवासी जेट्टी प्रकल्पाचे कंत्राट माजी आयएएस अधिकारी राधेश्याम मोपलवार यांच्या कंपनीला मिळाले आहे. 200 कोटी रुपयांच्या या प्रकल्पांतर्गत प्रवासी जेट्टी, टर्मिनल आणि आधुनिक सुविधा उभारल्या जाणार आहेत. हायकोर्टाने याचिका फेटाळून या कामास हिरवा कंदील दर्शवल्यानंतर या प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे. काम पूर्ण करण्याची सुधारित मुदत 2028 अखेरपर्यंत निश्चित केली आहे. त्यामुळे आता प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात होण्याची शक्यता आहे.
गेटवे ऑफ इंडिया येथे होणारी पर्यटकांची आणि प्रवाशांची प्रचंड गर्दी लक्षात घेता, रेडिओ क्लबजवळ आधुनिक प्रवासी जेट्टी उभारली जात आहे. या जेट्टीमुळे मांडवा, एलिफंट आणि अलिबागकडे जाणाऱ्या जलवाहतूक प्रवाशांना मोठी सुविधा मिळणार आहे. रेडिओ क्लब प्रवासी जेट्टी प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबईतील सागरी वाहतूक अधिक सक्षम होण्यास मदत होणार असून, गेटवे ऑफ इंडिया परिसरातील प्रवाशांना आधुनिक सुविधा उपलब्ध होतील.
पर्यटनाला चालना मिळण्याबरोबरच मुंबईच्या किनारी वाहतूक व्यवस्थेलाही मोठा हातभार लागणार असल्याचे मानले जात आहे. राज्य सरकारने या महत्त्वाच्या प्रकल्पासाठी यापूर्वीच 229 कोटी रुपयांच्या खर्चास मंजुरी दिली आहे. नव्या कंत्राटदाराच्या नियुक्तीनंतर सुधारित वेळापत्रकानुसार हा प्रकल्प 2028 अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
गेटवे ऑफ इंडिया परिसरातील महत्त्वाकांक्षी रेडिओ क्लब प्रवासी जेट्टी प्रकल्पाला अखेर गती मिळाली आहे. महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाने या प्रकल्पासाठी माजी आयएएस अधिकारी राधेश्याम मोपलवार अध्यक्ष आणि गैरकार्यकारी अधिकारी असलेल्या मॉडर्न इंजिनिअरिंग अँड प्रोजेक्ट्स लिमिटेड या कंपनीला सुमारे 200 कोटी रुपयांचे कंत्राट दिले आहे.
यापूर्वी हा प्रकल्प आरकेसी प्रोजेक्ट्स या कंपनीकडे होता. मात्र, कामाच्या गतीबाबत समाधानकारक प्रगती न झाल्याने आणि विलंब झाल्यामुळे महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाने मार्च महिन्यात तो करार रद्द केला. त्यानंतर नव्याने निविदा प्रक्रिया राबवून मोपलवार यांच्या कंपनीची निवड करण्यात आली. दरम्यान, या प्रकल्पाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात तीन वेगवेगळ्या याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. न्यायालयाने या तिन्ही याचिका फेटाळून लावल्यानंतर प्रकल्पाच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला आहे.
अत्याधुनिक सुविधा उभारल्या जाणार
या प्रकल्पांतर्गत रेडिओ क्लब परिसरात आधुनिक प्रवासी जेट्टी उभारण्यात येणार असून, सागरी वाहतुकीला चालना देण्यासाठी आवश्यक असलेल्या अनेक सुविधा विकसित केल्या जाणार आहेत. यामध्ये नवीन प्रवासी टर्मिनल, 80 मीटर बाय 80 मीटरचा प्लॅटफॉर्म, 10 बर्थिंग जेट्ट्या आणि 12 मीटर रुंदीचा प्रवेशमार्ग उभारण्यात येणार आहेत. याशिवाय प्रवाशांच्या सोयीसाठी पार्किंग, शौचालये, पिण्याच्या पाण्याची सुविधा, सुसज्ज प्रतीक्षागृह, अत्याधुनिक सुरक्षा व्यवस्था, अग्निशमन सुविधा तसेच परिसराचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.