

ST Employee Salary Hike : एसटी कर्मचाऱ्यांच्या वाढीव वेतनाची फाइल अर्थ मंत्रालयात धूळखात पडून आहे. एसटी महामंडळाचा निधीसाठी राज्य सरकारकडे १६ वेळा पत्रव्यवहार करूनही अर्थ खात्यातील अधिकारी या फाइलकडे लक्ष देत नाहीत, असा आरोप कर्मचारी संघटनेने केला आहे.
एसटी महामंडळातील ८६,००० कर्मचाऱ्यांना या महिन्यात वेतनवाढ फरक रक्कम हप्ता मिळाला नसल्याने त्यासाठी एसटीने राज्य सरकारकडे १९२. ४६ कोटी रुपयांची मागणी केली आहे. दर महिन्याला सरकारकडून येणाऱ्या सवलत मूल्य प्रतिपूर्ती रकमेसह एकूण ७२५.४६ कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली असताना फक्त ४०० कोटी रुपये इतकी रक्कम राज्य सरकारकडून देण्यात आल्याने एसटीचे आर्थिक गणित बिघडले आहे. या महिन्यात वेतनवाढ फरकाची वाढीव रक्कम कर्मचाऱ्यांना देण्यात आली नाही.
या संदर्भातील आंदोलन नोटीस परिवहन खात्याचे अप्पर मुख्य सचिव यांच्या मार्फत राज्य सरकारला देण्यात आली आहे. २४ फेब्रुवारीला आझाद मैदान, मुंबई येथे हे आगळे वेगळे आंदोलन करण्यात येणार आहे. एसटी महामंडळाने निधी मागणीसाठी राज्य सरकारकडे १६ वेळा पत्रव्यवहार केला आहे. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक हेसुद्धा निधी उपलब्ध करून घेण्यासाठी जातीने लक्ष देत आहेत. याशिवाय राज्य सरकारच्या परिवहन विभागानेसुद्धा अनेकवेळा पत्रव्यवहार करूनसुद्धा अर्थ खात्यातील अधिकारी या फाइलकडे लक्ष द्यायला तयार नसून ते झोपेचे सोंग घेऊन सुस्त झाले आहेत. अर्थखात्याचा प्रभार असलेले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी लक्ष घालून झोपेचे सोंग घेतलेल्या अधिकाऱ्यांची कानउघाडणी करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की, "एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना वेतनासोबत या महिन्यात वेतनवाढ फरक हप्ता मिळाला नाही. निधीच्या मागणीची फाइल अर्थखात्यात निर्णयाविना पडून आहे. हप्ता न मिळाल्याने कामगारांमध्ये असंतोष पसरला आहे. याबाबत ‘बोंब मारो’ आंदोलन करणार आहे"
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.