

Raigad News : ग्रामपंचायत निवडणुकांचे पडघम वाजू लागले असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसने गावपातळीवर मोर्चेबांधणी सुरू केली आहे. रोह्यातील युवक राष्ट्रवादीच्या मेळाव्यात आदिती तटकरे यांनी बदलत्या राजकीय समीकरणांकडे लक्ष वेधत तरुण मतदारांचे वाढते महत्त्व अधोरेखित केले. “आता घरातील मतदानाचा निर्णय वडीलधारे नाही, तर मुलं ठरवतात,” असे सांगत त्यांनी युवकांना आगामी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी तयार राहण्याचा कानमंत्र दिला. तसेच जास्तीत जास्त निवडणुका बिनविरोध व्हाव्यात आणि दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या युवक संघटनेने मदतकार्यात आघाडीवर राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.
रोहा येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक आघाडीचा मेळावा पार पडला. युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष राकेश शिंदे यांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते. आगामी काळात युवकांना राष्ट्रवादी काँग्रेसशी जोडण्यासाठी तसेच पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.
या मेळाव्याला आमदार अनिकेत तटकरे, रायगड लोकसभा मतदारसंघाच्या अध्यक्षा स्नेहल जगताप, रोहा नगराध्यक्षा वनश्री शेडगे, रोहा तालुकाध्यक्ष महेंद्र पोटफोडे, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राकेश शिंदे यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आदिती तटकरे यांनी आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर युवकांना महत्त्वाचा संदेश दिला. “पूर्वी घरातील वडीलधारे व्यक्ती मतदान कोणाला करायचे हे ठरवत असत आणि त्याप्रमाणे मतदान होत असे. आता काळ बदलला आहे. घरातील मुलगा किंवा मुलगी मतदान कुठे करायचे हे सांगतात आणि त्यानंतर आई-वडीलही त्यानुसार निर्णय घेतात,” असे त्या म्हणाल्या.
राजकारण आणि समाजकारणाची पद्धत काळानुसार बदलत असल्याचेही आदिती तटकरे यांनी नमूद केले. भारत हा युवकांचा देश म्हणून ओळखला जातो. देशातील मोठा लोकसंख्यावर्ग तरुणांचा असल्याने आगामी काळात देश, राज्य आणि जिल्ह्याच्या राजकारणात युवकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढेल, असे त्यांनी सांगितले.
ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करण्याचे आवाहन
आगामी ग्रामपंचायत निवडणुकांबाबतही आदिती तटकरे यांनी भूमिका मांडली. “जितक्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध होतील, तितके चांगले होईल,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. लोकसभा, विधानसभा किंवा जिल्हा परिषद निवडणुकांच्या तुलनेत ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये गावपातळीवर अधिक त्रास आणि मतभेद निर्माण होतात. त्यामुळे सामंजस्याने निवडणुका पार पडल्यास गावातील मतभेद कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर युवकांना मैदानात उतरण्याचे आवाहन
यंदाचे वर्ष आव्हानात्मक असल्याचे सांगत आदिती तटकरे यांनी राज्यातील दुष्काळी परिस्थितीचाही उल्लेख केला. राज्यातील 358 तालुक्यांपैकी 265 तालुके दुष्काळग्रस्त जाहीर झाले आहेत, असे त्यांनी सांगितले. कोकणात पावसामुळे दुष्काळ जाहीर होण्याची परिस्थिती यापूर्वी क्वचितच पाहायला मिळाली आहे. 1970-72 आणि 2013-14 या काळातही अशा स्वरूपाची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, यावेळी पावसाच्या कमतरतेमुळे परिस्थिती अधिक गंभीर असल्याचे आदिती तटकरे म्हणाल्या.
या पार्श्वभूमीवर भविष्यात तालुक्यातील लोकप्रतिनिधी किंवा पदाधिकारी म्हणून मदतकार्य करण्याची गरज निर्माण झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसची युवक संघटना मागे हटता कामा नये, असे आवाहन त्यांनी केले. “गरज पडल्यास मदतकार्यात राष्ट्रवादीची युवक संघटना सर्वात आघाडीवर असली पाहिजे,” असा संदेश आदिती तटकरे यांनी युवक कार्यकर्त्यांना दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.