

Bharat Gogawale Vs Sanjay Raut Political War News : राज्यात एकीकडे एकनाथ शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा सुरू असतानाच मंत्री भरत गोगावले यांनी केलेल्या सूचक विधानांमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. यानंतर आता त्यांनी थेट सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर भाष्य करत उद्धव ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. राऊत यांचा उल्लेख दुर्योधन असा करत, जे बोलतात त्याच्या उलटच घडतं, असा टोला लगावला आहे.
राज्यात सध्या ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा सुरू असून, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे अनेक नेते यावर भाष्य करत आहेत. मंत्री गुलाबराव पाटील आणि उदय सामंत यांनीदेखील यावर विधान करत वातावरण तापवले होते. यानंतर मंत्री भरत गोगावले यांनीदेखील त्यावर संकेत देत, ‘लवकरच राज्यात दुसरे एक ऑपरेशन होणार आहे. आता सांगत नाही, नाहीतर मीडिया बातम्या करेल,’ असे म्हटले होते. त्यांच्या या सूचक विधानांची राज्यात चांगलीच चर्चा झाली.
आता या गोष्टीला दोन-एक दिवस होत नाही तोच त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर भाष्य केले आहे. तसेच खासदार संजय राऊत यांच्यावरदेखील तोफ डागली आहे. राऊत यांनीच ठाकरेंना राजकीयदृष्ट्या संपवण्याचे काम सुरू केले असून, तसा विडाच राऊतांनी उचलला आहे.
सध्या शिवसेना संपवण्याचे काम ते अत्यंत प्रामाणिकपणे करत असून, जसा दिवा विझण्याच्या आधी मोठा होतो, तशीच अवस्था राऊत यांची झाली आहे. कारण ते जे बोलतात, त्याच्या अगदी विरुद्ध होतं. यामुळे ते जे निकालाबाबत दावा करत असले, तरी तसे काही होणार नाही. निकाल हा आमच्याच बाजूने लागेल, असा दावा गोगावले यांनी केला आहे.
त्यांच्या दिवसाची सुरुवातच वेगळ्या आणि वादग्रस्त विधानातून होत असते. ते राजकारणातील दुर्योधन असून, सध्या तशीच भूमिका पार पाडत आहेत. तर ज्याप्रमाणे दुर्योधनाच्या हट्ट आणि भूमिकेमुळेच १०० कौरवांचा नाश झाला, त्याच पद्धतीने मूळ शिवसेना संपवण्यासाठी राऊत कारणीभूत आहेत. यामुळे राजकारणातील कंस कोण आणि दुर्योधन कोण, हे राज्याच्या जनतेला चांगलेच माहीत असल्याचेही गोगावले यांनी म्हटले आहे.
गोगावले यांनी निकाल आपल्याच बाजूने लागेल, असा दावा करताना, ‘आम्ही पूर्णपणे गुणवत्तेवर आहोत. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि सुनेत्रा पवार हे आमचे नेते आहेत. ते जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असून, त्याप्रमाणे प्रामाणिकपणे आम्ही काम करत राहू,’ असे म्हटले आहे. तर संयमाने थांबल्यानेच पावणेदोन वर्षांनंतर पालकमंत्रीपद मिळाल्याचेही गोगावले यांनी म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.