BJP-Shivsena Clash : भाजप-शिवसेनेतील वाद चिघळला! ‘दोस्तीत कुस्ती’ सुरू असतानाच कदमांचा बन यांना टोला; फटकारतं म्हणाले, 'आपले सिनियर...'

Yogesh Kadam Slams BJP Spokesperson Navnath Ban : विधानपरिषद निवडणुकीतील पराभवानंतर भाजप आणि शिवसेनेतील नेत्यांच्या शाब्दिक संघर्षाने तणाव निर्माण झाला असून मित्रपक्षांतील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.
BJP-Shivsena Clash; Devendra Fadnavis, Eknath Shinde, Navnath Ban And Yogesh Kadam
BJP-Shivsena Clash; Devendra Fadnavis, Eknath Shinde, Navnath Ban And Yogesh Kadam
Published on: 
Updated on: 

Ratnagiri News : विधानपरिषद निवडणुकीतील पराभवानंतर भाजप आणि शिवसेनेमध्ये सुरू झालेला आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा अद्यापही कायम आहे. काल सुरू झालेली चिखलफेक थांबण्याचे नाव घेत नसून, भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांच्या टीकेला शिवसेनेचे आमदार नीलेश राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले होते. ‘तुझी लायकी किती, तू बोलतो किती!’ अशा शब्दांत त्यांनी बन यांना फटकारले होते.

त्यानंतर नीलेश राणे यांची लायकी काढणाऱ्या बन यांनी नारायण राणे यांच्यासोबतचा फोटो शेअर करत पलटवार केला. यामुळे भाजप आणि शिवसेनेतील नेत्यांमधील शाब्दिक संघर्ष अधिकच तीव्र झाला असून, महायुतीतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. दरम्यान, या वादावरून शिवसेनेचे नेते आणि राज्यमंत्री योगेश कदम यांनी नवनाथ बन यांना फटकारत सबुरीचा सल्ला दिला आहे.

विधानपरिषद निवडणुकीतील पराभवावरून वाद

विधानपरिषद निवडणुकीतील पराभवानंतर भाजपकडून शिवसेनेतील नेत्यांवर पराभवाचे खापर फोडण्यात आले. माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधी भूमिकेवर बोट ठेवत भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी टीका केली होती. तसेच, या नेत्यांनी घेतलेल्या भूमिकेला शिवसेनेची संमती होती का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला होता. याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट उत्तर द्यावे, अशी मागणी बन यांनी केली होती.

BJP-Shivsena Clash; Devendra Fadnavis, Eknath Shinde, Navnath Ban And Yogesh Kadam
BJP-Shivsena clash : सत्तेत दोस्ती, महासभेत कुस्ती! शिवसेनेच्या महापौरांकडून भाजप नगरसेवकाच्या निलंबनाचे आदेश

याच मागणीवरून महायुतीत मिठाचा खडा पडला असून, भाजप आणि शिवसेनेतील वादाला सुरुवात झाली आहे. एका प्रवक्त्याने थेट पक्षाच्या प्रमुखांना जाब विचारल्याने शिवसेनेत संतापाची लाट उसळली. यावरूनच नीलेश राणे यांनी आक्रमक भूमिका घेत पत्रकार परिषदेत नवनाथ बन यांना चांगलेच झापले होते.

‘एकनाथ शिंदे यांच्यावर बोलण्याचा अधिकार नवनाथ बन यांना नाही. आम्ही कधीही भाजपच्या नेत्याला कोणत्याही निवडणुकीतील पराभवासाठी जबाबदार धरलेले नाही. आमचे नेते एकनाथ शिंदे यांची मूक संमती आहे का, असा सवाल विचारणारा तू कोण?’ अशा शब्दांत नीलेश राणे यांनी बन यांच्यावर निशाणा साधला होता. ‘नवनाथ बन माझा मित्रबित्र नाही, तो माझा ज्युनिअर आहे. मी २००९ साली खासदार झालो, तेव्हा तो चड्डीत होता. मी ऐऱ्यागैऱ्यांना मित्र बनवत नसतो,’ असे म्हणत त्यांनी बन यांच्यावर टीका केली होती. सोशल मीडियावरूनही त्यांनी बन यांना लक्ष्य केले होते.

नारायण राणेंसोबतचा फोटो शेअर करत बन यांचा पलटवार

नीलेश राणे यांच्या टीकेनंतर नवनाथ बन यांनीही प्रत्युत्तर दिले. त्यांनी नीलेश राणे यांचे वडील आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोखाली ‘ज्युनिअर नवनाथ बन विथ सिनिअर राणेसाहेब’ असे कॅप्शन दिले. ‘ज्युनिअर’ या शब्दाचा वापर करत बन यांनी नीलेश राणे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिल्याचे दिसून आले. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेतील हा वाद आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

‘समन्वय समितीत चर्चा करा’; योगेश कदमांचा सल्ला

दरम्यान, या वादावर शिवसेनेचे नेते आणि राज्यमंत्री योगेश कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकार परिषद घेऊन आरोप-प्रत्यारोप करण्याऐवजी हा विषय समन्वय समितीमध्ये मांडावा, असे त्यांनी नवनाथ बन यांना सुचवले. ‘पत्रकार परिषद घेऊन बोलण्यापेक्षा समन्वय समितीमध्ये हा विषय घ्या. आपले वरिष्ठ त्यावर चर्चा करून मार्ग काढतील. जाहीर पत्रकार परिषद घेऊन आपले म्हणणे मांडून काही साध्य होणार नाही. वरिष्ठांशी चर्चा करून बोलला असता, तर आणखी उत्तम झाले असते,’ असा सल्ला योगेश कदम यांनी दिला.

तसेच, गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्रात अनेक निवडणुका झाल्या आहेत. स्थानिक पातळीवरील निवडणुकांमध्ये जे काही राजकारण घडते, त्याचा परिणाम संपूर्ण राज्याच्या राजकारणावर होऊ नये, याची खबरदारी सर्वांनीच घेतली पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले. ‘कोणी कोणाच्या विरोधात काम केले, हेच आपण काढत बसलो, तर एकत्र काम करू शकणार नाही,’ असे म्हणत योगेश कदम यांनी भाजप आणि शिवसेनेतील नेत्यांना सबुरीचा सल्ला दिला.

‘दोस्तीत कुस्ती नको’; आनंद परांजपे यांचे आवाहन

दरम्यान, महायुतीतील मित्रपक्षांच्या प्रवक्त्यांनी आणि नेत्यांनी शिवसेनेच्या नेत्यांवर आरोप करणे टाळावे, असे आवाहन शिवसेनेचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी केले आहे. भाजपच्या प्रवक्त्यांनी वापरलेली भाषा अयोग्य होती. त्यांनी भाषेची मर्यादा पाळायला हवी, असे परांजपे यांनी म्हटले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या नेत्यांना आणि प्रवक्त्यांना मित्रपक्षांवर टीका करू नये, असे निर्देश दिले आहेत. तसेच, ‘दोस्तीत कुस्ती नको,’ असेही आदेश दिल्याचे आनंद परांजपे यांनी सांगितले.

BJP-Shivsena Clash; Devendra Fadnavis, Eknath Shinde, Navnath Ban And Yogesh Kadam
BJP Shivsena Clash: शिंदेंच्या बालेकिल्ल्यात पुन्हा कमळ विरुद्ध धनुष्यबाण संघर्ष पेटला; सरनाईकांनी अचानक टाकलेल्या बॉम्बनं ठाण्यात भाजप संतापली

विधानपरिषद निवडणुकीतील पराभवावरून सुरू झालेला हा वाद आता भाजप आणि शिवसेनेतील वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुतीतील समन्वय आणि मित्रपक्षांमधील संबंध यावर आगामी काळात काय भूमिका घेतली जाते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.