
Ratnagiri, 02 January : बाळासाहेब ठाकरेंचा निष्ठावंत शिवसैनिक म्हणून माझी ओळख आहे. मी नाराज आहे, मी भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाच्या वाटेवर आहे, हे मला तुमच्या सर्वांच्या माध्यमातून समजतंय. पण, तसं काही नाही. माझ्या भाजप प्रवेशाच्या बातम्या ह्या निव्वळ अफवा आहेत. हा निष्ठावंत शिवसैनिक हा बाळासाहेबांचाच राहणार, याबद्दल आमच्या मनात कुठचीही शंका नाही, अशा शब्दांत भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याच्या बातम्यांचे माजी आमदार राजन साळवींनी खंडन केले.
विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले राजन साळवी (Rajan Salvi) यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली आहे, त्यावर खुद्द माजी आमदार साळवी यांनी पुढे येऊन स्पष्टीकरण दिले आहे. आपण कुठेही जाणार नाही, मी बाळासाहेबांचा शिवसैनिक राहणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
साळवी म्हणाले, विधानसभेतच्या निवडणुकीत आम्हाला पराभावाला समोरे जावे लागले. त्या पराभवाची खंत, दुःख आणि वेदना माझ्यासकट मतदारसंघातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना आणि जनतेलाही आहे. पराभावाची खंत असताना भविष्याचं शिवसेनेचे मार्गक्रमण आम्ही करीत आहोत. त्यामुळे मी भारतीय जनता पक्ष (BJP) आणि शिंदे गटाच्या वाटेवर आहे, या बातम्या अफवा आहेत.
पिकलेल्या आंब्यावर कोणतीतरी खडे मारतातच ना. तशा तऱ्हेचा प्रयत्न भाजप आणि इतरांचा असेल. तो त्यांचा प्रयत्न असेल. पक्षात येणाऱ्या प्रत्येकाचं स्वागत करणं, हे पक्षातील लोकांचं कर्तव्य असतं. त्याप्रमाणे त्यांच्या भावना असतात. कोकणात मी संघटनेच्या बाबत जे काम केले आहे, त्या कामाच्या पोचपावतीवर त्यांच्या त्या अपेक्षा असतील, असेही ठाकरेंच्या शिलेदाराने सांगितले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे काही आजी माजी आमदार हे शिंदेंच्या शिवसेनेत येणार, हे खासदार नरेश म्हस्के यांचे वैयक्तिक मत आहे. पण मी माझ्या भावना आपल्यासमोर मांडलेल्या आहेत. माझ्याबाबत अनेकदा अशा चर्चा झालेल्या आहेत, असेही राजेश साळवी यांनी स्पष्ट केले.
माजी आमदार राजन साळवी म्हणाले, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंनी पराभूत उमेदवारांची मातोश्रीवर बैठक घेतली हेाती. त्या बैठकीत पराभूत होण्यामागची कारणं जाणून घेत त्यावर आत्मचिंतन करण्यात आले. पुढील कामासंदर्भात आम्हाला सूचनाही देण्यात आलेल्या आहेत.
भारतीय जनता पक्षाकडून आतापर्यंत माझ्याशी कोणताही संपर्क झालेला नाही, असे सांगून साळवी म्हणाले अन्टी करप्शन ब्यूरोकडून माझी आणि माझ्या कुटुंबाची चौकशी सुरू होती. आम्ही त्याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतलेली आहे. उच्च न्यायालयाचा निर्णय सुटीनंतर येणे अपेक्षित आहे. त्यानंतरच्या काळात त्यांचा काय प्रयत्न असेल मला माहिती नाही. पण माझ्यावर टांगती तलवार आहे, हे मला निश्चित माहिती आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.