Pramod Mhasakar join Shivsena : राष्ट्रवादीला मोठा धक्का, ठरल्याप्रमाणे तटकरेंच्या शिलेदाराचा शिवसेनेत प्रवेश; प्रवेश सोहळ्यातच तटकरेंविरोधात व्यक्त केली नाराजी

Pramod Mhasakar join Shivsena : काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदाचा राजीनामा दिलेल्या प्रमोद म्हसकर यांनी अखेर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.
Pramod Mhasakar join Shivsena
Pramod Mhasakar join ShivsenaSarkarnama
Published on: 
Updated on: 

Raigad News : रायगड जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी घडामोड घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पेण विधानसभा मतदारसंघाचे कार्याध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे प्रमोद म्हसकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. सुनील तटकरे यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या रोहा तालुक्यात झालेल्या या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला रायगडमध्ये मोठा राजकीय धक्का बसल्याचे मानले जात आहे. म्हसकर यांच्यासोबत शेकडो कार्यकर्त्यांनीही शिवसेनेचा भगवा हाती घेतला.

रोहा शहरातील बाजारपेठेत आयोजित जाहीर पक्षप्रवेश सोहळ्याला मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी, जिल्हा परिषद सदस्य विकास गोगावले, जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पक्षप्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांनी तटकरे कुटुंबाच्या कार्यपद्धतीबाबत उघडपणे नाराजी व्यक्त केली.

राष्ट्रवादीतील राजीनाम्यानंतर म्हसकरांचा शिवसेनेत प्रवेश

प्रमोद म्हसकर यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत जिल्ह्यात विविध तर्कवितर्क लढवले जात होते. अखेर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. म्हसकर हे गेल्या अनेक महिन्यांपासून 'प्रमोद म्हसकर प्रतिष्ठान'च्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात सक्रिय आहेत. रोहा, पेणसह रायगड जिल्ह्यातील विविध भागांत त्यांचा जनसंपर्क असल्याने त्यांच्या पक्षांतराचा परिणाम जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Pramod Mhasakar join Shivsena
NCP-Shivsena UBT Setback : रायगडमध्ये उपसरपंचासह पाच सदस्य अपात्र, एकनाथ शिंदेंची शिवसेना सत्तेत

तटकरे कुटुंबातील अंतर्गत वादावर सुरेश मगरांचा गंभीर आरोप

दरम्यान, रायगडमधील महायुतीतील स्थानिक संघर्षाला आणखी धार मिळाली आहे. रोहा पंचायत समितीचे सदस्य सुरेश मगर यांनी तटकरे कुटुंबातील कथित अंतर्गत वादावर थेट भाष्य करत खळबळजनक आरोप केला. मंत्री आदिती तटकरे यांना विधानसभा निवडणुकीचे तिकीट मिळू नये, यासाठी अनिकेत तटकरे यांनी मोर्चेबांधणी केल्याचा दावा मगर यांनी केला.

यावेळी कार्यकर्त्यांना उद्देशून बोलताना त्यांनी, "जे स्वतःच्या बहिणीचे होऊ शकले नाहीत, ते तुमचे-आमचे कार्यकर्त्यांचे काय होणार?" असा संतप्त सवाल उपस्थित केला. त्यांच्या या विधानामुळे रायगडमधील राजकीय चर्चांना नवे वळण मिळाले आहे. मात्र, या आरोपांवर संबंधितांची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही.

'शेकापसारखी शिवसेनेची अवस्था होऊ देऊ नका'; विकास गोगावलेंचा सल्ला

या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र आणि जिल्हा परिषद सदस्य विकास गोगावले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणावर टीका केली. शिवसेनेच्या नेते आणि पदाधिकाऱ्यांना त्यांनी रायगडच्या राजकारणातील शेतकरी कामगार पक्षाचे उदाहरण दिले. "जिल्ह्यात एकेकाळी सत्तेत असणारा शेतकरी कामगार पक्ष आज संपला आहे. शिवसेनेचीही तीच गत होऊ नये, म्हणून राष्ट्रवादीच्या नेत्यांशी असणारी मैत्री थोडी लांब ठेवा," असा थेट सल्ला विकास गोगावले यांनी व्यासपीठावरून दिला. त्यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीतील घटक पक्षांमधील स्थानिक राजकीय मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत.

रायगडमध्ये शिवसेनेची ताकद वाढवण्याची रणनीती?

रायगडच्या राजकारणात खासदार सुनील तटकरे आणि मंत्री भरत गोगावले यांच्यातील राजकीय संघर्ष नवीन नाही. राज्यात महायुतीत एकत्र असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये रायगड जिल्ह्यात मात्र स्थानिक वर्चस्वासाठी संघर्ष सुरू असल्याचे चित्र आहे. विशेषतः श्रीवर्धन, रोहा, माणगाव आणि पेण या भागांतील राजकीय घडामोडींना या संघर्षाची पार्श्वभूमी आहे.

अलीकडेच माणगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही माजी नगरसेवकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर आता रोह्यात प्रमोद म्हसकर यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केल्याने राष्ट्रवादीसमोरील संघटनात्मक आव्हान वाढण्याची शक्यता आहे.

Pramod Mhasakar join Shivsena
Congress -NCP Setback : काँग्रेस आणि राष्ट्रवादीला धक्का, नगरसेविकेसह विरोधात लढलेल्या NCP च्या उदेवाराचे जात प्रमाणपत्र अवैध

दरम्यान, प्रमोद म्हसकर यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सुरेश मगर आणि आप्पा देशमुख हेदेखील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे आगामी काळात रायगडच्या राजकारणात आणखी कोणती समीकरणे बदलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.