Loksabha Election 2024 : सुसंस्कृत, अभ्यासू आणि संधीचा फायदा करून घेणारा नेता म्हणून सुनील तटकरे यांना ओळखले जाते. सुनील तटकरे हे रायगड जिल्ह्यातील राजकीय पार्श्वभूमी असलेल्या सधन कुटुंबातून आलेले राजकारणी आहेत. कॉन्ट्रॅक्टर म्हणून स्वत:चा व्यवसाय सुरू करणाऱ्या तटकरेंनी काँग्रेसमधून आपल्या राजकीय वाटचालीस प्रारंभ केला होता. 1995 मध्ये ते पहिल्यांदा काँग्रेसच्या तिकीटावर आमदार झाले होते. पुढे काँग्रेसला रामराम ठोकत त्यांनी राष्ट्रवादीच्या माध्यमातून राजकारणात आपले स्थान मजबूत केले. ते सध्या रायगड लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. 2019 मध्ये त्यांनी शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांचा पराभव करत शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडले होते.
खासदार म्हणून निवडून येण्यापूर्वीही सुनील तटकरे राज्याच्या राजकारणात सक्रिय होते. विधानसभेत त्यांनी श्रीवर्धन मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच राज्याच्या मंत्रिमंडळात त्यांनी ऊर्जा, जलसंधारण, अर्थ व नियोजन, अन्नधान्य पुरवठा मंत्रालयांचा कार्यभार सांभाळला होता. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रीय सरचिटणीस म्हणूनही जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून ते 2023 मध्ये राष्ट्रवादीमध्ये फूट पडेपर्यंत सुनील तटकरे हे शरद पवारांच्या विश्वासू नेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जात होते. मात्र अजित पवारांनी बंड करून पक्ष फोडल्यानंतर तटकरेंनी त्यांच्या गटात जाणे पसंद केले. मुळात तटकरे यांचा देखील अजित पवार यांच्या बंडामागील घडामोडींमध्ये सक्रिय सहभाग होता. वर्तमान स्थितीत तटकरे हे अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. Raigad Lok Sabha Constituency
राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजित पवार (Ajit Pawar) यांनी महायुतीमध्ये रायगड लोकसभा मतदारसंघावर दावा सांगितला आहे. तटकरे हे रायगडचे विद्ममान खासदार आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाकडून तटकरे यांनाच उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. मात्र महायुतीमध्ये अद्याप जागावाटपाचा निर्णय झालेला नाही. भाजपकडून देखील या मतदारसंघातून धैर्यशील पाटील यांना उमेदवारी देण्याबाबत चाचपणी केली जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे तटकरेंच्या उमेदवारीचे भवितव्य जागा वाटपानंतरच निश्चित होणार आहे. अजित पवार गटाला जागा सुटल्यास सुनील तटकरे (Sunil Tatkare) हेच उमेदवार असतील, अशी शक्यता आहे.
सुनील तटकरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यास त्यांचा सामना पुन्हा एकदा अनंत गीते यांच्यासोबत होऊ शकतो. महाविकास आघाडीकडून अनंत गीते यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. आगामी निवडणूक ही सुनील तटकरे यांच्यासाठी सोपी नसल्याचे अंदाज राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केले जात आहेत. यावेळी शेकापची सुनील तटकरे यांना साथ मिळणार नाही. तसेच तटकरे यांना तिकीट मिळाल्यास धैर्यशील पाटील गटाच्या नाराजीचा फटका तटकरे यांना बसू शकतो. याशिवाय शिवसेनेचे आमदार भरत गोगावले हेही तटकरे कुटुंबावर नाराज आहेत. आदिती तटकरे यांच्यामुळे भरत गोगावले यांचे मंत्रिपद आणि पर्यायाने पालकमंत्रीपद हुकल्याने ते तटकरे कुटुबीयांवर खार खाऊन आहेत. त्यामुळे तटकरे यांचा आगामी निवडणुकीत उमेदवारीचा आणि विजयाचा मार्ग खडतर असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
सुनिल दत्तात्रय तटकरे
10 जुलै 1955
पदवीधर
सुनील तटकरे यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील कोलाड येथे राजकीय पार्श्वभूमी असलेल्या घराण्यात झाला. सुनील तटकरे यांचे वडील दत्तात्रय तटकरे हे काँग्रेस पक्षाचे नेते होते. त्यांनी सरपंचपदापासून ते रायगड जिल्हा परिषदच्या विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी सांभाळली होती. काँग्रेसमधील वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण, बॅ. ए. आर. अंतुले, शरद पवार या नेत्यांसोबत दत्ताजी तटकरे यांची राजकीय जवळीक राहिली होती. त्यामुळे तटकरे यांना राजकारणाचे धडे घरातूनच मिळाले होते. 1984 मध्ये दत्तात्रय तटकरे यांचा मृत्यू झाला. त्यानंतर सुनील तटकरे रायगड जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय झाले.
सुनील तटकरे यांच्या मातोश्रींचे नाव गीता दत्तात्रय तटकरे असे आहे. सुनील तटकरे यांचा विवाह 1981 मध्ये झाला असून त्यांच्या पत्नीचे नाव वर्दा तटकरे असे आहे. या दांपत्यास आदिती आणि अनिकेत ही दोन मुले आहेत. त्यांची दोन्ही मुले राजकारणात सक्रिय आहेत. आदिती तटकरे या श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून महाविकास आघाडी सरकार आणि आता महायुती सरकारमध्ये त्या कॅबिनेट मंत्री आहेत. अनिकेत तटकरे विधान परिषदेचे सदस्य आहेत. सुनील तटकरे यांचे भाऊ अनिल तटकरे तर पुतण्या अवधूत तटकरे हे दोघेही राजकारणात सक्रिय आहेत. दोघेही माजी आमदार आहेत. अवधूत तटकरे यांनी यापूर्वी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत आधी शिवसेनेत नंतर भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
व्यवसाय
रायगड
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)
आमदार, मंत्री, प्रदेशाध्यक्ष, खासदार अशी विविध पदे भूषवलेल्या सुनील तटकरे यांचा राजकीय प्रवास काँग्रेस पक्षातून सुरू झाला. ते 1984 पासून काँग्रेसमध्ये सक्रिय होते. सुरुवातीला काँग्रेस तालुका सरचिटणीस, तसेच रायगड जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यांनी पहिल्यांदा 1985 मध्ये माणगाव मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली होती. निळकंठ सावंत यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर काँग्रेसमध्ये पक्ष संघटनेचे काम करत त्यांनी पुढे 1995 मध्ये पुन्हा एकदा माणगाव मतदारसंघातून निवडूक लढवली. या निवडणुकीत ते पहिल्यांदा काँग्रेसच्या तिकीटावर विधानसभेवर निवडून गेले.
राज्यात शिवसेना -भाजपची लाट असतानाही सुनील तटकरे यांनी कोकणातून एकमेव काँग्रेसची जागा विजयी केली होती. त्यानंतर काँग्रेसमधून बाहेर पडत शरद पवारांनी राष्ट्रवादीची स्थापना केली. त्यावेळी तटकरे यांनीही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. पुढे ते 1999 आणि 2004 मध्ये माणगाव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकीटावर आमदार झाले. 2004 मधे सुनील तटकरे अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री झाले. 2008 मधे ते राज्याचे उर्जामंत्री झाले. 2009 मधे त्यांनी श्रीवर्धन मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि विजयी झाले. त्यावेळी त्यांना अर्थ मंत्रालयाचा कारभार देण्यात आला होता.
2014 मध्ये राष्ट्रवादीने सुनील तटकरे यांना लोकसभा निवडणुकीत उतरवले. त्यावेळी मोदी लाट असतानाही त्यांचा रायगड मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांच्याकडून केवळ 2000 मतांच्या फरकाने निसटता पराभव झाला. त्यानंतर त्यांना विधानपरिषदेवर संधी देण्यात आली. पुढे 2019 च्या लोकसभा निवडणुकीत तटकरे यांनी अनंग गीते यांचा पराभव करून संसदेत पाऊल ठवले. आता पुन्हा एकदा आगामी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी ते सज्ज आहेत.
सुनील तटकरे आणि त्यांचे कुटुंब चार दशकांपेक्षा जास्त काळापासून राजकारणात सक्रिय आहेत. त्यामुळे मतदारसंघातील अनेक विकासकामे त्यांनी केली आहेत. याशिवाय मतदारसंघातील दलित, आदिवासी, मुस्लिम, कोळी, आगरी समुदायासाठी विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत. यासोबतच मतदारसंघात शाळा, रस्ते, समाजमंदिरे, पाणीपुरवठा यासारखी विकासकामे त्यांनी केली आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र गवळी समाज संघटना स्थापन करण्यात आली आहे. तटकरे यांच्या प्रयत्नातूनच गवळी समाज भटक्या विमुक्त जातीमध्ये समाविष्ट झाल्याचे मानले जाते.
2019 च्या निवडणुकीत सुनील तटकरे हे दुसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात उतरले होते. या निवडणुकीत त्यांनी शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार अनंत गीते यांचा पराभव केला होता. अनंत गीते हे सहा वेळा खासदार म्हणून विजयी झाले होते. त्यांच्या विजयाचा वारू रोखत तटकरे यांनी शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडले होते. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे यांना 4 लाख 86 हजार 968, तर गीते यांना 4 लाख 55 हजार 530 मते मिळाली होती.
या निवडणुकीत तत्कालीन परिस्थितीत मतदारसंघातील बदलेल्या राजकीय समीकरणांचा तटकरे यांना मोठा फायदा झाला होता. 2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळी शेतकरी कामगार पक्षाने काँग्रेससोबत असलेले वैर बाजूला ठेवत आघाडीचा उमेदवार म्हणून राष्ट्रवादीचे तटकरे यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे तटकरे यांना शेकापच्या मतांचा मोठा आधार मिळाला. त्यातच शिवसेना -भाजप युतीमध्ये केंद्रात मंत्री म्हणून कार्यरत असताना अनंत गीते यांना मतदारसंघात कोणतेही प्रभावी विकासकाम करता आले नव्हते. त्यामुळे गीते यांच्यावर मतदार नाराज होते. मतदारांना बदल अपेक्षित होता. तोच मुद्दा हेरून तटकरे यांनी प्रचाराची रणनीती आखली होती. त्याचा फायदा तटकरे यांना झाला.
सुनील तटकरे हे मुळातच राजकीय कुटुंबातून आलेले आहेत. रायगड जिल्ह्यातील पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद, विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघात तटकरे कुटुंबीयांचे वर्चस्व आहे. त्यामुळे त्यांचा मतदारसंघातील जनसंपर्क प्रभावी आहे. स्वत: तटकरे, त्यांच्या कन्या आदिती, पुत्र अनिकेत हे तिघेही राजकारणात सक्रिय आहेत. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांचे जाळे मतदारसंघात विस्तारलेले आहे. त्या माध्यमातून ते जनतेशी जोडले जातात. याशिवाय मतदारसंघात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनाही ते नियमित हजेरी लावतात. भेटायला येणाऱ्या नागरिकांच्या समस्या समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी त्यांची आग्रही आणि सहकार्याची भूमिका राहिली आहे. त्यामुळे त्यांचा जनसंपर्क प्रभावी आहे.
सुनील तटकरे यांच्याकडून सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. राजकीय घडामोडींबाबत आपली मते ते सोशल मीडियावरून व्यक्त करतात. मतदारसंघातील प्रश्न, विकासकामे, केंद्र सरकारची ध्येयधोरणे, यासह आता राष्ट्रवादी फुटीनंतर अजित पवार गटाची भूमिका ते आपल्या ट्विटर, फेसबूक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून स्पष्ट करतात. सोशल मीडियावर त्यांना फॉलो करणाऱ्यांची संख्याही हजारोंच्या घरात आहे.
सुनील तटकरे यांनी अलिकडेच राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अनेक महत्वाची विधाने केली आहेत. त्यामध्ये त्यांनी शरद पवार हे पक्षात हुकूमशहा असून त्यांनी पक्षाची घटना पायदळी तुडवल्याचा आरोप केला होता. शरद पवार यांनी मला आणि अजित पवारांना 2017 मध्ये भाजपसोबत सत्तेत सहभागी होण्यास सांगितले होते, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला होता. सुप्रिया सुळे यांनी सुनील तटकरे यांच्यावर बोलताना त्यांच्या नावाचा उल्लेख न करता आरोप आणि टीका केल्या होत्या. त्यावर मी शूद्र असल्यामुळे सुप्रिया सुळे माझे नाव घेत नसतील, असा आरोप त्यांनी केला होता.
दत्तात्रय तटकरे आणि शरद पवार
सुनील तटकरे हे एक मुत्सदी आणि संधीचा फायदा घेणारे राजकारणी आहेत. मतदारसंघात त्यांचा प्रभावी जनसंपर्क आहे. याशिवाय मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थावर तटकरे कुटंबाचे वर्चस्व आहे. या त्यांच्यासाठी जमेच्या बाजू मानल्या जातात. सद्यस्थितीत अजित पवार गटात सहभागी झाल्यामुळे आगामी काळात पुन्हा लोकसभेची उमेदवारी मिळाल्यास त्यांना भाजपच्या ताकदीचा फायदा करून घेता येणार आहे.
तटकरे यांच्या घराणेशाहीचा मुद्दा हा सगळ्यात मोठा नकारात्मक मुद्दा मानला जातो. तटकरे यांची मुलगी, मुलगा आणि स्वत: तटकरे हे विद्यमान लोकप्रतिनिधी आहेत. त्यामुळे तटकरे यांच्या कुटुंबाबद्दल मतदारसंघात नाराजी व्यक्त केली जात आहे. पंतप्रधान मोदी यांनी अनेकवेळा घराणेशाहीच्या विरोधात मत व्यक्त केले आहे. विरोधकांकडून यांच्या घराणेशाहीचा मुद्दा पुढे केल्यास तटकरे यांना तिकीट देण्यास विरोध होऊ शकतो. या खेरीज राष्ट्रवादीमध्ये असताना शरद पवारांनी सुनील तटकरे यांना मंत्री पदे, पक्षाचे प्रदेशाध्यपद अशा महत्वाच्या संधी दिल्या आहेत. तरीही त्यांनी पक्ष फोडण्यामध्ये सहभाग नोंदवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यांनी शरद पवारांवरही गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे तटकरे यांना शरद पवार यांना मानणाऱ्या मतदारांकडून फटका बसू शकतो. याशिवाय यावेळी शेकाप हा पक्ष तटकरे यांच्यासोबत नसून भाजपकडून त्यांना उमेदवारी देण्यास अडथळे आणले जाण्याची शक्यता आहे. याशिवाय आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये अनंत गीते हे विरोधी उमेदवार राहिले तर कुणबी मतांचाही तटकरे यांना फटका बसू शकतो.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाकडून सुनील तटकरे हेच रायगडचे उमेदवार मानले जात आहेत. मात्र या वेळी तटकरे यांच्यासाठी लोकसभेची लढत खडतर मानली जात आहे. राज्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटीच्या घटनांनंतर रायगड मतदारसंघातील राजकीय समीकरणेही बदलली आहेत. अजित पवार गट हा भाजप, एकनाथ शिंदे यांच्यासह सत्तेत सहभागी झाला आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूक हे तिन्ही पक्ष एकत्र मिळून लढवणार हे निश्चित आहे. मात्र महायुतीकडून जागावाटप निश्चित झाले नाही. त्यातच रायगड मतदारसंघात भाजप आपला उमेदवार उतरवण्याच्या तयारीत आहे, तर दुसरीकडे अजित पवार गटाने रायगडची जागा आम्हीच लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
जागावाटपाचा तिढा निर्माण होऊन सुनील तटकरे यांचा पत्ता कट झाल्यास, अथवा स्वत: सुनील तटकरे यांनी लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार दिल्यास या मतदारसंघातून अजित पवार गटाकडून सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. सुनील तटकरे यांचा पत्ता कट झाल्यास ते हे आगामी विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात सक्रिय होण्यास इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. त्यातच तटकरे यांच्याबद्दल मतदारसंघात नाराजी असून शिंदे गटाकडूनही त्यांच्या उमेदवारीस विरोध केला जात आहे.भरत गोगावले हे तटकरे कुटुंबावर नाराज आहेत. भाजपला काहीही करून महायुतीच्या माध्यमातून रायगडची जागा सोडायची नाही. ती राष्ट्रवादीच्या वाट्याला असो किंवा भाजपच्या या ठिकाणाहून ते महायुतीचा उमेदवार विजयी करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करतील. मात्र तटकरे यांचा पत्ता कट करून भाजपने धैर्यशील पाटील यांना उमेदवारी दिल्यास ते हमखास विजयी होणारे उमेदवार ठरतील का? हा प्रश्न अनुत्तरित आहे. त्यामुळे भाजपकडून तटकरे यांना राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून आणण्यासाठी जास्त प्रयत्न केले जातील, अशीच शक्यता आहे.
(Edited by Roshan More)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.