NCP Setback : तटकरेंच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला खिंडार : 17 वर्षानंतर बड्या नेत्याची शिवसेनेत घरवापसी; माजी नगराध्यक्षाचाही पक्षप्रवेश

Bharat Gogawale Vs Sunil Tatkare Political Rivalry In Raigad : रायगडच्या राजकारणात सुनील तटकरे आणि भरत गोगावले यांच्यातील राजकीय संघर्षाला आता अधिक धार आली असून माणगाव आणि श्रीवर्धन येथे राष्ट्रवादीला मोठे धक्के बसले आहेत.
NCP leader Darshan Vichare join Eknath Shinde Shivsena; Bharat Gogawale And MLA Mahendra Dalvi
NCP leader Darshan Vichare join Eknath Shinde Shivsena; Bharat Gogawale And MLA Mahendra DalviSarkarnama
Published on: 
Updated on: 

Raigad News : राज्याच्या सत्तेत शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष एकत्र असले, तरी कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत दोन्ही पक्षांमधील राजकीय संघर्ष सातत्याने वाढताना दिसत आहे. रायगड जिल्ह्यात मंत्री भरत गोगावले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यातील राजकीय संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत आहे. अशातच गोगावले यांनी तटकरेंच्या राजकीय प्रभावक्षेत्रातच राष्ट्रवादीला मोठे धक्के दिले आहेत. माणगाव आणि श्रीवर्धनमध्ये राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांसह सुमारे ८५० कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्याचबरोबर तटकरे कुटुंबाचे निकटवर्तीय मानले जाणारे प्रमोद म्हसकर हेदेखील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याने रायगडच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे.

राज्यात सध्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चांना जोर आला आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असतानाच रायगडमध्ये मात्र शिवसेनेने राष्ट्रवादीसमोर नवे आव्हान उभे केले आहे. तटकरे यांचा प्रभाव असलेल्या रोहा शहरात आज (ता. १६) प्रमोद म्हसकर शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. म्हसकर हे पेण विधानसभा मतदारसंघाचे कार्याध्यक्ष असून तटकरे कुटुंबाचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख आहे. मंत्री भरत गोगावले आणि आमदार महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे या प्रवेशाकडे संपूर्ण रायगड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, गोगावले यांनी माणगाव आणि श्रीवर्धनमध्ये एकाच वेळी राष्ट्रवादीला दोन मोठे धक्के दिले आहेत. माणगावचे माजी नगराध्यक्ष आनंद यादव यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांच्या समर्थकांसह पत्नी भाग्यश्री यादव, पुत्र तन्मय आणि तनिष यादव तसेच अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला. माणगाव येथील गांधी मेमोरियल हॉलमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

NCP leader Darshan Vichare join Eknath Shinde Shivsena; Bharat Gogawale And MLA Mahendra Dalvi
NCP-Shivsena UBT Setback : रायगडमध्ये उपसरपंचासह पाच सदस्य अपात्र, एकनाथ शिंदेंची शिवसेना सत्तेत

दुसरीकडे, श्रीवर्धनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष दर्शन विचारे यांनी तब्बल १७ वर्षांनंतर शिवसेनेत घरवापसी केली आहे. सोमजाई मंदिराच्या रंगमंदिरात आयोजित कार्यक्रमात विचारे यांच्यासह सुमारे ८५० कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. विचारे यांनी यापूर्वी शिवसेनेचे शहरप्रमुख म्हणून काम पाहिले होते.

त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि सुमारे १५ वर्षे तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. आता पुन्हा शिवसेनेत परतल्याने श्रीवर्धनमधील राजकीय समीकरणांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. या पक्षप्रवेश सोहळ्यादरम्यान सुशांत पाटील, माजी नगरसेवक किरण केळसक्कर आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाशी संबंधित कार्यकर्ते शादाब पटेल यांच्यासह अन्य काही जणांनीही शिवसेनेत प्रवेश केल्याचे सांगण्यात आले.

यावेळी आमदार महेंद्र दळवी यांनी तटकरे कुटुंबावर जोरदार टीका केली. रायगड जिल्ह्यातील राजकीय पदे तटकरे कुटुंबाभोवतीच केंद्रित होत असल्याचा आरोप करत त्यांनी घराणेशाहीवर निशाणा साधला. तसेच स्थानिक पातळीवरील आणेवारीच्या राजकारणावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली.

मंत्री भरत गोगावले यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमधील कथित एकाधिकारशाहीवर टीका केली. यावेळी त्यांनी राजीव साबळे यांच्यावर निशाणा साधला. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून श्रीवर्धनच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. आगामी निवडणुकीत श्रीवर्धनचा आमदार आणि रायगडचा खासदार बदलण्याची ताकद शिवसेनेत असल्याचा दावा आमदार महेंद्र दळवी यांनी केला.

NCP leader Darshan Vichare join Eknath Shinde Shivsena; Bharat Gogawale And MLA Mahendra Dalvi
Congress -NCP Setback : काँग्रेस आणि राष्ट्रवादीला धक्का, नगरसेविकेसह विरोधात लढलेल्या NCP च्या उदेवाराचे जात प्रमाणपत्र अवैध

एकीकडे राज्यात महायुतीतील घटक पक्ष एकत्रितपणे सत्तेत असताना दुसरीकडे रायगडमध्ये मात्र त्यांच्यातील राजकीय संघर्ष उघडपणे समोर येत आहे. माणगाव, श्रीवर्धन आणि आता रोहा येथे होत असलेल्या पक्षप्रवेशांमुळे राष्ट्रवादी काँग्रेससमोरील आव्हान वाढले आहे. शिवसेनेने केलेले हे शक्तिप्रदर्शन म्हणजे सुनील तटकरे यांच्या राजकीय वर्चस्वाला दिलेले थेट आव्हान मानले जात आहे. त्यामुळे आगामी काळात रायगडमधील महायुतीचे राजकीय समीकरण कोणते वळण घेणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.