

Ratnagiri News : राज्य संरक्षित स्मारक अशी अधिकृत नोंद असूनही, ऐतिहासिक ‘गोपाळगड’ किल्ल्याच्या सातबाऱ्यावर काही खासगी व्यक्तींची नावे आल्यामुळे ‘गोपाळगड’ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तर काही व्यक्तींनी ‘आम्हीच गडाचे मालक आहोत’ असे म्हणत पर्यटकांना हुसकावून लावल्याचा प्रकारही उघडकीस आला आहे. या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर आणि प्रसारमाध्यमांमध्ये व्हायरल झाला. ज्यानंतर आता गोपाळगड किल्ला नेमका कुणाचा? शासनाचा की खासगी? असे प्रश्न उपस्थित केले जात असून पुन्हा वाद पेटला आहे. तर याच वादावरून ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यात जोरदार राजकीय वाद सुरू झाला आहे.
मे महिन्याच्या सुट्यांमुळे गुहागरात पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. बदलापूर येथील पर्यटक आपल्या कुटुंबासह २६ मे रोजी गोपाळगड किल्ल्यावर गेले होते. किल्ला पाहताना त्यांनी तिथल्या आमराईत जमिनीवर पडलेले काही आंबे उचलले. त्या वेळी एका स्थानिक व्यक्तीने त्यांना हटकले आणि ‘हा गड आमच्या मालकीचा आहे,’ असे सांगत वाद घातला. या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर आणि प्रसारमाध्यमांमध्ये व्हायरल झाला आहे. याबाबत दुर्गप्रेमींमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
दरम्यान आता गोपाळगड किल्ला तातडीने पूर्णपणे शासनाच्या ताब्यात घ्यावा, अशी मागणी गुहागर पंचायत समितीचे उपसभापती नीलेश सुर्वे, आमदार प्रमोद जठार यांनी लावून धरली असून शिवसेना (उद्धव ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांनी आक्रमक भूमिका घेत, स्थानिक नेत्यांवर आणि राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच त्यांनी किल्ल्याच्या शासकीय मालकी हक्कावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित करत, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. तर हा किल्ला शासनाने पुन्हा ताब्यात घ्यावा अशी मागणी केली आहे.
तर गुहागर येथील राज्य संरक्षित गोपाळगड शासनाच्या ताब्यात देण्यासाठी लवकरच कार्यवाही केली जाईल. विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून बैठक घेऊन हा गड शासनाच्या ताब्यात घेतला जाईल, अशी माहिती उद्योगमंत्री व पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. सामंत यांनी आचारसंहिता संपल्यानंतर गुहागर येथील वादग्रस्त गोपाळगडाच्या मालकीबाबत तातडीने निर्णय घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना बैठक घेण्याचे सूचीत केल्याचे म्हटलं आहे.
या प्रकरणानंतर आता पुरातत्त्व विभागाचेही स्पष्टीकरण समोर आले असून पुरातत्त्व विभागाचे अधिकारी विलास वहाणे यांनी याबाबत माहिती दिली आहे. १९६५ मध्ये लिलावाद्वारे ही जागा तेथील काही लोकांना मिळाली आहे. लिलावात जागा घेतली तेव्हा जे गट नंबर मिळाले त्यावर किल्ला होता. तेव्हापासून आजपर्यंत ती जागा खासगी मालकीची आहे.
यासाठी आम्ही १० वर्षे न्यायालयात लढा देत आहोत. २०१६ मध्ये हा किल्ला राज्य संरक्षित झाला. त्यामुळे किल्ला सुरक्षित आहे. किल्ल्यावर आंब्याची कलमे आहेत, त्याचे उत्पादन ती लोक घेतात. भूसंपादनासाठी ते तयार आहेत. भूसंपादन झाले की योग्य मोबदला घेऊन ते बाहेर पडतील, असे विभागाचे म्हणणे आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.