

Mumbai News: महाराष्ट्राला लोककलेचा समृद्ध वारसा लाभला आहे.या लोककलेचा धागा पिढ्यानं पिढ्या जपणाऱ्या अनेक कुटुंब आजही अवतीभवती पाहायला मिळतात.तसेच लोककलेचा वारसा टिकवण्यासाठी अनेक कलावंतांनी आपलं उभं आयुष्य झिजवलं आहे. यात काहींना पोटाची खळगी भरण्यासाठी प्रचंड हाल सोसावे लागले,तर काहींच्या नशिबी उपेक्षांचे चटकेही आले. कलेशी आयुष्यभर प्रामाणिक राहत यांनी आपली कला सर्वस्व मानत ती अभिमानानं खांद्यावर मिरवलीही. अशाच आयुष्य 'लावणी' साठी वाहिलेल्या 'कलासम्राज्ञी'नं जगाचा निरोप घेतला आहे.
राज्य सरकारचा'शाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कार','नाट्य गौरव पुरस्कार'यांसह 'मुंबई महापौर' अशा विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलेल्या ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी शकुंतलाताई नगरकर यांचं निधन झालं आहे. त्यांनी गेली कित्येक दशकं आपल्या भारदस्त आवाजानं आणि दिलखेचक अदाकारीनं रसिकांच्या मनावर राज्य केलं होतं.
लावणीसम्राज्ञी शकुंतलाताई नगरकर यांचे मंगळवारी (ता.22 सप्टेंबर 2026) 66 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.त्यांची कर्करोगाशी झुंज सुरू होती. अखेर त्यांनी दिलेली झुंज अपयशी ठरली. नगरकर यांच्या निधनानं महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वावर मोठी शोककळा पसरली आहे.
शकुंतलाताई नगरकर यांचा जन्म 1960 मध्ये अहिल्यानगर (अहमदनगर) येथे एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांच्या आई छबूबाई नगरकर यादेखील लावणी नृत्यांगना होत्या.त्यामुळे लावणीची कला त्यांना कुटुंबातूनच मिळाली. लहानपणापासूनच त्यांना नृत्याची आवड होती आणि त्यांनी विविध बालनृत्य स्पर्धांमध्ये सहभाग घेतला.
शकुंतलाताईंनी अवघ्या 12 व्या वर्षी कलाक्षेत्रात पाऊल ठेवले.त्यांच्या आईने त्यांना लावणीसह नृत्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी कथक गुरु गोविंदराव निकम यांच्याकडे पाठवले होते.पुढे त्यांनी पारंपरिक संगीतबारी लावणीची स्वतंत्र शैली विकसित केली.त्यांच्या सादरीकरणात अभिनय, नखरा,अदाकारी आणि भावभावना यांनी लावणी कलेला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले.
विशेष म्हणजे शंकुतलाताई नगरकर यांनी पारंपरिकतेसह 'लावणी के रंग' आणि 'लव्ह अँड लावणी'यांसारख्या कार्यक्रमांसह आधुनिकतेची जोड देत केलेले प्रयोग यशस्वी ठरले. त्यांच्या या अभिनव प्रयोगानं लावणी खऱ्या अर्थानं नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यात त्यांचा वाटा मोठा राहिला आहे.
शकुंतला नगरकर यांचा लावणी कलेचा वारसा खऱ्या अर्थानं 1974 मध्ये प्रसिद्ध लालबागच्या 'हनुमान थिएटर'मध्ये बहरला. त्यांच्या भारदस्त आवाजासह दिलखेचक अदाकारीनं रसिकांच्या मनावर कित्येक दशकं अधिराज्य गाजवलं. त्यांच्या दीर्घकाळाच्या कलासाधनेची दखल घेत त्यांना 2009 मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कारानं गौरविण्यात आले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.