

Mumbai News : राज्यातील लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पार पडल्या. त्यानंतर आता सहकार क्षेत्रात महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या विविध जिल्हा बँकांच्या (DCC Bank) निवडणुकांचा गुलाल उधळला जात आहे. आतापर्यंतच्या निवडणुकीत कुठेच संधी न मिळालेल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना या निमित्ताने संधी मिळणार का ? याबाबत उत्सुकता लागून राहिली होती. मात्र, आतापर्यंत झालेल्या जिल्हा बँकांच्या निवडणुकीत कुठे मुलगा, कुठे मुलगी, कुठे पत्नी, कुठे भाऊ तर कुठे जावई... अशी नेत्यांच्या घरातल्यांचीच वर्णी लागली आहे. काही ठिकाणी बँकेचे अध्यक्षपदी वर्णी लागली आहे तर काही ठिकाणी नेत्याच्या दुसऱ्या पिढीची थेट संचालक मंडळात एंट्री झाली आहे.
सहकार क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून असलेल्या नेत्यांची अनेक वर्षापासून असलेली मक्तेदारी संपावी, या उद्देशानेच दहा वर्षांपेक्षा अधिककाळ संचालकपदावर राहता येणार नसल्याचा मुद्दा पुढे आणला होता. मात्र, या नव्या नियमावलीचा फायदा होण्याऐवजी कार्यकर्त्यांना तोटाच अधिक प्रमाणात झाला आहे. गावागावात सहकारासाठी राबणारा सामान्य कार्यकर्ता कुठे आहे? वर्षानुवर्षे सोसायट्यांमध्ये काम करणाऱ्यांना संधी मिळतेय का? की नेत्यांनी स्वतःच्या जागी घरातल्या माणसांना पुढे केलंय? दहा वर्षे संचालक राहिलात तर पुन्हा संधी नाही... पण तुमच्या जागी मुलगा, बायको, भाऊ किंवा पुतण्या आला तर चालतं? मग सहकारात घराणेशाहीला ब्रेक लागलाय की फक्त वारसदार बदललेत? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे.
राज्यातील डीसीसी बँक निवडणुकांमध्ये मात्र राजकीय नेत्यांच्या घरातल्यांचीच वर्णी लागल्याचे चित्र अनेक जिल्ह्यांत पाहायला मिळाले. राज्यातील आतापर्यंत झालेल्या सगळ्या निवडणुकांकडे एकत्रितपणे पहिले तर सांगली, सातारा, अहिल्यानगर, लातूर, परभणी-हिंगोली, नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि जालना अशा जिल्हा बँकांच्या निवडणुका पार पडल्या आहेत. काही ठिकाणी नेत्यांच्या मुलांना संधी, काही ठिकाणी पत्नी आणि सुनेला, तर काही ठिकाणी भावांना आणि पुतण्यांना संचालकपद मिळाले. तर अहिल्यानगर, परभणी-हिंगोली, नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि जालना याठिकाणी नेतेमंडळीच्या कुटुंबांतील सदस्यच अध्यक्ष झाले आहेत.
पाच जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजकीय नेत्यांचे वारसदारच
छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे (Shivsena) माजी मंत्री व खासदार संदीपान भुमरे यांचे पुत्र विलास भुमरे यांची वर्णी लागली आहे. तर जालना डीसीसी बँकेच्या अध्यक्षपदी माजी मंत्री बबनराव लोणीकर यांचे पुत्र राहुल लोणीकर यांची वर्णी लागली आहे. अहिल्यानगर डीसीसी बँकेच्या अध्यक्षपदी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय विखे पाटील, तर परभणी-हिंगोली डीसीसी बँकेच्या अध्यक्षपदी मंत्री मेघना बोर्डीकर यांचे वडील रामप्रसाद बोर्डीकर, तर नांदेड डीसीसी बँकेच्या अध्यक्षपदी भाजपचे आमदार तुषार राठोड आहेत. ते दिवंगत भाजप आमदार गोविंदराव राठोड यांचे चिरंजीव आहेत. तर उपाध्यक्षपदी डॉ. मीनल पाटील खतगावकर यांची बिनविरोध निवड झाली. त्या माजी खासदार भास्करराव पातळ खतगावकर यांच्या सूनबाई आहेत.
सांगली जिल्हा बँकेत नातलगांची मांदियाळी
सांगली जिल्हा बँकेत घराणेशाही कायम आहे. याठिकाणी खासदार विशाल पाटील यांच्या पत्नी पूजा पाटील, आमदार सुहास बाबर यांचे बंधू अमोल बाबर, माजी आमदार मानसिंगराव नाईक यांचे पुत्र विराज नाईक, माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांचे पुत्र रणधीर नाईक, आमदार विश्वजित कदम यांचे मेव्हणे महेंद्र लाड, आमदार जयंत पाटील यांचे पुतणे देवराज पाटील, संग्राम देशमुख यांच्या पत्नी अपर्णा देशमुख, माजी आमदार विक्रम सावंत यांच्या पत्नी वर्षा सावंत, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांचे बंधू सतीश देशमुख असे दहा जण संचालक झाले आहेत.
अहिल्यानगर जिल्हा बँकेत घराणेशाही
अहिल्यानगर जिल्हा बँकेत पाच जण राजकीय घराण्यातून आलेले आहेत. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय विखे पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे जावई रणजितसिंह देशमुख, ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांचे पुत्र शंकरराव गडाख , दिवंगत नेते जयंत ससाणे यांचे पुत्र करण ससाणे, बँकेचे माजी अध्यक्ष सीताराम गायकर यांच्या कन्या संजीवनी शिंदे-गायकर हे संचालक म्हणून विजयी झाले आहेत. येथील निवडणुकीनंतर डॉ. सुजय विखे पाटील थेट अध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. त्यामुळे जिल्हा बँकेच्या सत्तेत राजकीय कुटुंबांचा प्रभाव अधिक असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
परभणी-हिंगोली जिल्हा बँकेवर नातलगच
परभणी-हिंगोली जिल्हा बँक निवडणुकीत मंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचे वडील रामप्रसाद बोर्डीकर, माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या कन्या भावना बोर्डीकर, सुरेश वरपूडकर माजी आमदार, सुरेश वरपूडकर यांच्या सूनबाई प्रेरणा वरपूडकर, आमदार तानाजी मुटकुळे यांच्या कुटुंबातील सदस्य राजामती मुटकुळे, याशिवाय भैय्या पाटील गोरेगावकर यांच्या कुटुंबातील तीन सदस्यही संचालक मंडळात निवडून आले आहेत. विशेष म्हणजे रामप्रसाद बोर्डीकर यांची बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. म्हणजे बँकेच्या संचालक मंडळात कुटुंबीय आणि अध्यक्षपदही त्याच कुटुंबाकडे आहे.
नांदेडमध्येही नेत्यांच्या वारसदारांची एन्ट्री
नांदेड जिल्हा बँक निवडणुकीत 11 जागा बिनविरोध झाल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या कन्या प्रणिता देवरे-चिखलीकर, माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांच्या सूनबाई डॉ. मीनल पाटील खतगावकर, आमदार राजेश पवार यांच्या पत्नी पूनम राजेश पवार यांची संचालकपद निवड झाली आहे. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनेलने 23 पैकी 21 जागांवर विजय मिळवला. अध्यक्षपदी आमदार डॉ. तुषार राठोड, तर उपाध्यक्षपदी डॉ. मीनल पाटील खतगावकर यांची बिनविरोध निवड झाली.
लातूरमध्येही राजकीय घराण्यांचा प्रभाव
लातूर जिल्हा बँक निवडणुकीत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र आणि आमदार अमित देशमुख यांचे बंधू धीरज देशमुख, आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांचे बंधू अरविंद पाटील निलंगेकर, आमदार रमेश कराड यांचे पुत्र ऋषिकेश कराड, आमदार अभिमन्यू पवार यांच्या पत्नी शोभा पवार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांचे जावई हेमंत जाधव, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांचे पुतणे अविनाश जाधव, दिवंगत माजी आमदार चंद्रशेखर भोसले यांच्या कन्या प्रीती भोसले यांची संचालकपदी वर्णी लागली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.