

Mumbai News : राज्यातील राज्यासभेच्या सात जागा रिक्त होणार आहेत. निवडणूक आयोगाने या रिक्त जागांसाठी निवडणुकीची घोषणा केली आहे. त्यामुळे महायुती व महाविकास आघाडीत जोरदार रस्सीखेच पाहवयास मिळत आहे. विधानसभेतील संख्याबळ पाहता महायुतीच्या वाट्याला सहा तर महाविकास आघाडीच्या वाट्याला एक जागा येण्याची शक्यता आहे. त्यामध्ये महायुतीमधील भाजपला चार तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला एक तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला एक जागा येणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षात उत्सुकता शिगेला पोहचली असताना खासदारकीची माळ कोणत्या नेत्यांच्या गळ्यात पडणार? यावरून इच्छुकांत जोरदार रस्सीखेच पाहावयास मिळत आहे.
राज्यातील सात जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्यामुळे राज्यसभेची खासदारकी मिळावी यासाठी लॉबिॅग सुरु झाले आहे. महायुतीमधील भाजपच्या'(BJP) वाट्याला आलेल्या चार जागासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे नाव जवळपास फायनल आहे. तर दुसरीकडे धैर्यशील पाटील यांना कमी कालावधी मिळाल्याने ते पुन्हा इच्छुक असल्याचे समजते तर माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड यांना पुन्हा संधी दिली जाणार का याची उत्सुकता शिगेला पोहचली असतानाच आता या पदासाठी माजी मंत्री विनोद तावडे, विनय सहस्त्रबुद्धे, सुनील देवधर, विजया रहाटकर यांच्या नावाची चर्चा जोरात सुरु आहे.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला (Shivsena) एक जागा मिळण्याची शक्यता आहे. त्या एक जागेसाठी माजी खासदार राहुल शेवाळे, माजी खासदार संजय निरुपम या दोन जणांची नावे चर्चेत असतानाच आता या पदासाठी माजी खासदार गजानन किर्तीकर हे देखील इच्छुक असल्याचे समजते. गेल्या लोकसभा निवडणुकीत वायव्य मुंबई मतदारसंघातून त्यांचे पुत्र अमोल कीर्तिकर हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतर्फे निवडणूक लढवत होते. त्यामुळे शिंदे गटाने तेथून त्यांच्याविरुद्ध रवींद्र वायकर यांना उमेदवारी दिली. त्यामुळे गजानन कीर्तिकर यांना संधी मिळाली नव्हती. त्यामुळे आता ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेणार असल्याचे समजते. त्यामुळे या तीन माजी खासदारापैकी एकाला संधी दिली जाणार आहे.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला एक जागा येणार आहे. त्यासाठी सध्या पार्थ पवार यांचे नाव चर्चेत आहे. त्यांच्याऐवजी ऐनवेळी दुसऱ्याला उमेदवारी देण्याचे ठरले तर माजी खासदार व पक्षाचे प्रवक्ते आनंद परांजपे व अविनाश आदिक यांना या पदासाठी संधी मिळू शकते.
राज्यातील 'या' खासदारची मुदत संपणार
महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते शरद पवार, डॉ. फौजिया खान, भाजपचे रामदास आठवले, डॉ. भागवत कराड, धैर्यशील पाटील, उद्धव ठाकरे यांच्या शिवसनेच्या प्रियंका चतुर्वेदी तर काँग्रेसच्या रजनी पाटील या सदस्यांची मुदत 2 एप्रिलला संपणार असल्याने निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या या सात जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. या सात जागांसाठी निवडणुकीची अधिसूचना 26 फेब्रुवारीला प्रसिद्ध करण्यात येणार असून यासाठी नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा अंतिम दिनांक 5 मार्च आहे. तर 16 मार्चला सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान आणि त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजता मतमोजणी होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.