

Beed News : बदलीत लाभ मिळवण्यासाठी दिव्यांगत्वाची बोगस प्रमाणपत्रे सादर केल्याप्रकरणी सातारा जिल्हा परिषदेच्या 9 प्राथमिक शिक्षकांना निलंबित करण्यात आल्याची बातमी ताजी असतानाच, आता बीड जिल्ह्यातही शिक्षण विभागाने मोठी कारवाई केली आहे. बोगस शिक्षक भरती प्रकरणात प्राथमिक विभागातील 7 आणि माध्यमिक विभागातील 66 अशा एकूण 73 शिक्षकांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. खासगी अनुदानित शाळांमधील कथित बोगस पदांवर नियुक्ती झालेल्या शिक्षकांवर करण्यात आलेल्या या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
बीड जिल्ह्यातील कथित बोगस शिक्षक भरती प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते सादेक इनामदार यांनी एसआयटीकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने तपास आणि कारवाईचा पाठपुरावा करण्यात आला. त्यानंतर शिक्षण विभागाने 73 शिक्षकांची सेवा समाप्त करण्याचा निर्णय घेतला.
राज्यात 2012 पासून शिक्षक भरती बंद असतानाही बीड जिल्ह्यात काही शिक्षकांना नियुक्ती देण्यात आल्याचा आरोप आहे. न्यायालयाच्या आदेशांचा सोयीस्कर अर्थ लावून नियुक्त्या करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. काही शाळांमध्ये संच मान्यतेच्या दुरुस्तीच्या नावाखाली पदे वाढवण्यात आली, तर काही ठिकाणी बनावट विद्यार्थ्यांच्या आधारे संच मान्यता वाढवून अतिरिक्त पदे निर्माण करण्यात आल्याचा आरोप आहे.
या प्रक्रियेत अन्य बनावट कागदपत्रांचाही वापर झाल्याचा दावा तक्रारदार सादेक इनामदार यांनी केला आहे. त्यांच्या तक्रारीनंतर या कथित गैरप्रकाराचा मुद्दा समोर आला असून, 73 शिक्षकांवरील सेवा समाप्तीच्या कारवाईने जिल्ह्यातील शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे. दरम्यान, अशाच प्रकारे आणखी 2,217 बोगस पदे निर्माण करून भरती करण्यात आल्याचा दावा सादेक इनामदार यांनी केला आहे. या पदांवर नियुक्त झालेल्या शिक्षकांवरही कारवाई होण्याची शक्यता असल्याने शिक्षण क्षेत्रात चिंतेचे वातावरण आहे.
बीड जिल्ह्यात बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांच्या प्रकरणात यापूर्वीही मोठी कारवाई करण्यात आली होती. जानेवारी 2023 मध्ये बोगस दिव्यांग प्रमाणपत्रे मिळवणाऱ्या शिक्षकांच्या प्रकरणाची चौकशी करण्यात आली होती. त्यावेळी 236 शिक्षकांची अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात पुनर्तपासणी करण्यात आली होती.
या पुनर्तपासणीत 52 शिक्षकांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्रे तयार केल्याचे आढळून आले होते. त्यानंतर तत्कालीन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी संबंधित शिक्षकांची चौकशी करून दोषी आढळलेल्या शिक्षकांवर निलंबनाची कारवाई केली होती.
दरम्यान सातारा जिल्ह्यात देखील बदलीत लाभ मिळविण्यासाठी दिव्यांगत्वाची बोगस प्रमाणपत्रे सादर केल्याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी ९ प्राथमिक शिक्षकांचे निलंबित केले आहे. तसेच १३ शिक्षकांना अपात्र का करू नये, अशी नोटीस बजावण्यात आली आहे. नागराजन यांनी केलेल्या या कारवाईमुळे शिक्षण विभागात मोठी खळबळ निर्माण झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.