Chhatrapati Sambhajinagar News : कुठल्याही शहराची दशा आणि दिशा ही त्या शहराच्या विकास आराखड्यावरून ठरत असते. छत्रपती संभाजीनगरच्या सर्वांगीण विकासासाठीचा आराखडा गेल्या 33 वर्षापासून रखडलेला होता. न्यायालयीन प्रकरण आता निकाली निघाले आहे. त्यामुळे नियोजित विकास आराखड्यानूसार या शहराचा विकास होऊन नागरिकांना एक चांगले जीवनमान देण्याचा आमचा प्रयत्न आहे. छत्रपती संभाजीनगर आता थांबणार नाही, असा विश्वास महापालिका आयुक्त जी. श्रीकांत यांनी व्यक्त केला.
सकाळ माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत जी.श्रीकांत यांनी शहराच्या सर्वांगीण विकासाची ब्लू प्रिंटच मांडली. शैक्षणिक, औद्योगिक, सांस्कृतिक, पर्यटन अशा सगळ्याच क्षेत्रात छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) आता कसे थांबणार नाही? हे आयुक्तांनी सविस्तरपणे सांगीतले. शहराचा विकास साधतांना प्रशासक म्हणून माझी मोठी जबाबदारी असली तरी लोकप्रतिनिधी, मंत्री, पदाधिकारी आणि नागरिकांची मोठी साथ मिळते.
33 वर्षापासून थांबलेला डीपी प्लान आता पुढे जाणार आहे. अनेक वर्ष कोर्टात हे प्रकरण होते. गुंठेवारीमुळे या शहराचा अवास्तव विकास झाला. (Municipal Corporation) पण आता आम्ही थांबणार नाही. सुनियोजितपणे शहराचा विकास नव्या आराखड्यानूसार करणार आहे. जागतिक वारसा सांगणारी अजिंठा, वेरुळ लेण्या ही पर्यटन स्थळं आपल्या या छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत. पाणचक्की, बिबी का मकबरा, बावन्न दरवाजांच्या शहर ही आपली ओळख असल्याचे जी. श्रीकांत म्हणाले.
छत्रपती संभाजीनगर शहराचा पाणी प्रश्न कायम चर्चेत असतो. पण शहराचा पाणी प्रश्न हा नैसर्गिक नाही तर मानव निर्मित आहे. शहरापासून 40 किलोमीटर अंतरावर जायकवाडीसारखे देशातील मातीचे सर्वात मोठे धरण आहे. या धरणातून अतिरिक्त पाणी उपसा करण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या पाणीपुरवठा योजनेचे 80 टक्के काम आता पूर्ण झाले आहे. देशातील सर्वात मोठी पाणीपुरवठा योजना ही आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरात होत आहे.
दोन वर्षात 81 टक्के काम आपण पूर्ण करू शकलो. हे करताना अनेक परवानग्या आपल्याला घेण्यासाठी कसरत करावी लागली, या आधीच्या योजनांचे काय झाले यात मी जाणार नाही. आता आपण सगळे अडथळे पार करून 2740 कोटींची ही योजना टप्प्याटप्प्याने डिसेंबरपर्यंत पूर्ण करत आहोत. त्यामुळे शहराचा पाणी प्रश्न कायमचा सुटेल. यासोबतच पाण्याची बचत करण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती देखील महापालिकेच्या वतीने करण्यात येणार आहे.
आता कुठलीही फाईल गायब होणार नाही..
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंभर दिवसांचा कार्यक्रम आखून दिला. त्यात ई आॅफीसवर भर देऊन कार्यालय पेपर लेस करण्याचा निर्धार आम्ही केला आहे. महापालिकेत फाईल गायब होणे, जळून जाणे, न सापडणे असे प्रकार नेहमीच होतात. मी चार महापालिकांमध्ये आयुक्त म्हणून काम पाहिले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये आम्ही ई आॅफीसवर भर दिला आहे. मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवसाच्या कार्यक्रमात हा महत्वाचा भाग आहे. आता कोणती फाईल कुठे आहे हे लगेच समजेल. लोकांची कामे थांबणार नाहीत, असा विश्वासही जी. श्रीकांत यांनी व्यक्त केला.
पर्यटन उद्योग वाढीसाठी प्रयत्न..
छत्रपती संभाजीनगर शहराच्या विकासात पर्यटन उद्योगाचाही मोठा हातभार आहे. ऐतिहासिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या याच शहरात दोन जागतिक वारसा सांगणाऱ्या अजिंठा, वेरुळ लेण्यांसारखी पर्यटन स्थळं आहेत. या शिवाय शहरात पाणचक्की, बिबी का मकबरा आणि 52 दरवाजे हे या शहराचे ऐतिहासिक महत्व अधोरेखित करतात. जगभरातील पर्यटकांची संख्या आणि त्यात आणखी वाढ करण्याच्या दृष्टीने पर्यटन व्यवसायात वाढ करण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत.
महापालिकेने पर्यटनवाढीसाठी आपण मोठ्या हाॅटेल व्यावसायिकांना मालमत्ता करात सूट दिली आहे. टुरिझम वाढवण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय आपण इथे करतो आहोत. डबल डेकर बस लवकरच होणार आहे. महापालिका शाळांमध्ये जपानी, जर्मनी भाषा शिकवतो आहोत. पर्यटन वाढीसाठी हे प्रयत्न सुरू असल्याचे श्रीकांत यांनी सांगीतले.
इंग्रजी शाळा सुरू, पण मराठी बंद करून नाही..
महापालिकेच्या माध्यमातून समाजातील सर्वच घटकांना विशेषतः मोलमजुरी करणारी कुटुंब, कामगार, घरकाम करणाऱ्या महिला व आर्थिक परिस्थिती चांगली नसलेल्या अनेकांच्या मुला-मुलींना उच्च दर्जाचे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण आपण देत आहोत. ते देत असताना मराठीला प्रथम प्राधान्य देत महापालिकेने जागतिक गरज म्हणून सेमी इंग्लीश, सीबीएससीच्या शाळाही सुरू केल्या आहेत. आधी आमच्याकडे केवळ मराठी, उर्दू शाळा होत्या.
इंग्रजीकडे आता ओढा वाढला आहे. पण आम्ही मातृभाषेला प्राधान्य देण्याचे आवाहन करतो. इंग्रजी जागतिक भाषा असल्याने ती आवश्यक आहेच. हे लक्षात घेत सेमी इंग्लीश आणि दोन सीबीएससीच्या शाळा सुरू केल्या आहेत. आणखी तीन शाळा आपल्याला सुरू करायच्या आहेत. चांगले शिक्षक आमच्याकडे आले तर आम्ही सेमी इंग्लीश, सीबीएससीच्या आणखी शाळा सुरु करु. पण मराठी शाळा बंद करून ते करणार नाही. सावित्री कंट्रोल रुमच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या हजेरीपासून त्यांच्या पालकांशी संपर्क साधला जातो. गरीब घरातील मुले आमच्या शाळांमध्ये शिकतात, 82 टक्के उपस्थिती आमच्या शाळांमध्ये होते. ती शंभर टक्के करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मुलींच्या गळतीचे प्रमाण रोखण्यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करतो आहोत. उपस्थिती आणि गुणवत्तेवर आम्ही भर देत आहोत, असेही श्रीकांत म्हणाले.
उद्योग शहराच्या विकासाचा पाया..
छत्रपती संभाजीनगर शहर औद्योगिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचे आहे. देश आणि जगभरातील उद्योगांना आवश्यक असे पूरक वातवरण आणि ईको सिस्टीम इथे आहे. स्कील्ड मॅन पाॅवर, उद्योगांना लागणारे मुबलक पाणी, जागा यामुळे शहराची औद्योगिक भरभराट झाली आहे. आता नव्या उद्योगांसाठी इथे जागा शिल्लक राहिलेली नाही. हे पाहता आणि आणखी उद्योगांची गरज लक्षात घेता 8 हजार हेक्टर जागा आणखी उपलब्ध करून देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी नुकतीच केली आहे. उद्योजकांच्या संघटना मसिआ, सीएमआय या सकारात्मक दृष्टीकोनातून इथे काम करतात. जेएनपीटी, एक्स्प्रेस वे मुळे विकाला अधिक गती मिळणार आहे, असा विश्वासही आयुक्त जी. श्रीकांत यांनी व्यक्त केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.