Thackeray Brother : ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचे काँग्रेसच्या मोठ्या नेत्याने केले स्वागत; मराठीबाबतच्या भूमिकेचेही केले समर्थन!

Digvijay Singh Statement : ज्या प्रदेशाची मातृभाषा आहे, तिला महत्व मिळायला पाहिजे. मातृभाषेतच मुलांचे प्राथमिक शिक्षण व्हायला पाहिजे. हिंदी राष्ट्रभाषा आहे, असे आपण मानतो. पण आपल्या प्रदेशाची जी मातृभाषा आहे, तिचा सन्मान झालाच पाहिजे.
Digvijay Singh
Digvijay SinghSarkarnama
Published on
Updated on

Dharashiv, 06 July : मुलांना प्राथमिक शिक्षण मातृभाषेत मिळायला पाहिजे, पहिलीपासून हिंदीची आवश्यकता नाही. ज्या राज्याची मातृभाषा आहे, त्या भाषेला सन्मान मिळालाच पाहिजे, ही विधाने कोणा शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांची नाही तर ती चक्क काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि मध्य प्रदेशाचे अनेक वर्षे मुख्यमंत्री राहिलेले दिग्विजय सिंह यांची आहेत. हे सांगताना त्यांनी राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याचे स्वागतही केले.

आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठलाच्या दर्शनासाठी काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह (Digvijay Singh) पंढरपूरला आले होते. तत्पूर्वी त्यांनी शनिवारी तुळजापुरात जाऊन तुळजा भवानीचे दर्शन घेतले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी मातृभाषा आणि ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबाबत भाष्य केले. तुळजा भवानीच्या दर्शनानंतर दिग्विजय सिंह यांनी आज पंढरपुरात विठ्ठलाचे दर्शन घेतले.

ते म्हणाले, महाराष्ट्रातील (Maharashtra) कामगार आणि शेतकरी हे दोघेही हैराण आहेत. जो शेतकरी धन्य पिकवतो, त्याच्या शेतमालाची किमत त्याला मिळत नाही. अनेक वर्षांपासून ती तेवढीच मिळत आहे. शेतीमालाला किमान आधारभूत किमत देण्याचा शब्द देण्यात आला होता, मात्र अजूनही पूर्ण केलेला नाही.

शेतीमालावर प्रक्रिया करून तयार करण्यात येणाऱ्या उत्पादनाच्या किमती मात्र वाढत आहेत. गव्हाचा बाजारभाव आजही तेवढाच आहे, पण त्यापासून बनविण्यात येणाऱ्या आट्याचे भाव दिवसेंदिवस वाढत आहेत. तुरीचे बाजारभाव तेवढाच आहे, पण डाळीचे भाव वाढले आहेत. तेलबियांचे बाजारभाव आजही जुनेच आहेत, पण तेलाचे भाव वाढत आहेत. म्हणजेच शेतकऱ्यांच्या कष्टाला त्याचा मोबादला मिळत नाही. पण, उद्योगपतींना फायदा होत आहे, असेही त्यांनी नमूद केले.

Digvijay Singh
Ashadhi Mahapooja : मुख्यमंत्री असूनही 'या' तिघांना आषाढीला विठ्ठलाची महापुजा करता आली नव्हती...!

राज ठाकरे (Raj Thackeray) यांची परप्रांतियाबाबतची भूमिका टोकाचा विरोध करणारी आहे, त्यामुळे ते महाविकास आघाडीत आले तर काँग्रेस पक्ष त्या आघाडीसोबत राहणार का, या प्रश्नावर दिग्विजय सिंहांनी ‘मी महाराष्ट्राचा काँग्रेस पार्टीचा प्रभारी नाही, त्यामुळे त्याबाबत मी बोलू शकणार नाही. पण, मी एवढं सांगू इच्छितो की, हा देश सर्वांचा आहे. सर्वांचा समान हक्क या देशावर आहे,’ असे स्पष्ट केले.

प्रत्येक प्रदेशाची आपली इच्छा असते, ज्या प्रदेशाची मातृभाषा आहे, तिला महत्व मिळायला पाहिजे. मातृभाषेतच मुलांचे प्राथमिक शिक्षण व्हायला पाहिजे. हिंदी राष्ट्रभाषा आहे, असे आपण मानतो. पण आपल्या प्रदेशाची जी मातृभाषा आहे, तिचा सन्मान झालाच पाहिजे. त्याचा शैक्षणिक धोरणातही उल्लेख आहे. मुलांचे प्राथमिक शिक्षण हे संबंधित प्रांताच्या मातृभाषेतच व्हायला पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Digvijay Singh
Ajit Pawar : अजितदादांनी शब्द खरा केला; ‘माळेगाव’च्या चेअरमनपदाची धुरा स्वीकारली, उपाध्यक्षपदी महिलेला संधी!

नव्या शैक्षिणक धोरणात त्रिभाषा सुत्राचा अंतर्भाव आहे. पण, तो पहिल्यापासूनच आहे. मात्र, पहिलीपासून हिंदी शिकविण्याची आवश्यकता (सक्ती) नाही. मराठीच्या मुद्यावर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले, ही चांगली गोष्टी आहे. पण राज ठाकरेंसोबत काँग्रेस पक्ष जाणार की नाही, हा प्रश्न तुम्ही महाराष्ट्राच्या काँग्रेस पक्षाच्या प्रभारींना विचारला पाहिजे, तेच तुम्हाला याबाबत सांगू शकतील, सांगून राज ठाकरेंच्या प्रश्नावर बोलणे टाळले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com