

Beed, 29 March : राजकारणात जय-पराजय होत राहतो. मीही निवडणुकीत पडले. पण, माझ्याविरोधात कारस्थान केलेला कोणताही माणूस दाखवा आज कुठाय ते? माझ्याविरोधात ज्यांनी हे कारस्थान केलंय, ते पुन्हा नकाशावरून गायब होतात, हे लक्षात ठेवा. त्यासाठी मला काहीच करावं लागत नाही. काय करायचं, तो निसर्ग करतो, असे सूचक विधान भाजप नेत्या तथा पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी केले.
बीड (Beed) जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे पंकजा मुंडे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. त्या कार्यक्रमात पंकजा मनमोकळेपणाने बोलल्या. बीड जिल्ह्यात शतप्रतिशत भाजप करण्याचा निर्धारही त्यांनी या वेळी केला.
पंकजा मुंडे (Pankaja Munde ) म्हणाल्या, राजकारणात काही लोकं चांगली, तर काही लोकं बदमाशही असतात. काही लोकं आपल्याला सोडून गेले, काही लोकं आपल्याला वापरून निवडून येऊन दुसऱ्यांशी संधान साधून गडबड करायला लागले आहेत. पण, त्यांना काही करायचे ते करू द्या. माझ्याविरोधात कारस्थान केलेला कोणताही माणूस दाखवा आज कुठंय ते. कारण माझ्या हृदयात पाप नाही तर साक्षात देवाचा आशीर्वाद आहे.
राजकारणात जय-पराजय होत असतो. मीही पडले. पण, ज्यांनी हे केलंय, ते पुन्हा नकाशावरून गायब होतात, हे लक्षात ठेवा. त्यासाठी मला काहीच करावं लागत नाही. निसर्ग करतो, काय करायचं ते. चांगलं काम करणाऱ्या माणसाच्या पाठीशी सगळ्या शक्ती येतात. त्यामुळे तुम्ही (सर्वसामान्य जनता) माझी शक्ती आहात, असेही पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.
शिवसेना-राष्ट्रवादीला उघड इशारा
आपल्याविरोधात कटकारस्थान करणाऱ्याविरोधात सूचकपणे बोलणाऱ्या पंकजा मुंडे यांनी महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला उघडपणे इशारा दिला आहे.
बीड जिल्ह्यात सहाही आमदार आणि खासदार हा भारतीय जनता पक्षाचा असावा, यासाठीच्या रणनीतीची सुरुवात आम्ही आज योगेश्वरी देवीच्या साक्षीने करत आहोत. यश येईल, अपयश येईल, हे तुमच्यावर आणि ईश्वरावर अवलंबून आहे. पण माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजपासून मी सुरुवात करत आहे, अशी घोषणाही पंकजा मुंडे यांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.