
Shivsena News : 'मीच पालकमंत्री होणार'हा मंत्री संजय शिरसाट यांचा दावा अखेर खरा ठरला. छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री होण्याची शिरसाट यांची बऱ्याच वर्षापासूनची इच्छा अखेर पूर्ण झाली. महायुतीतील रस्सीखेच पाहता मराठवाड्याची राजधानी असलेल्या संभाजीनगरचे पालकमंत्री पद भाजप आपल्याकडे ठेवणार, अशी चर्चा होती. परंतु जिल्ह्यातील नऊ पैकी सहा आमदार शिवसेना शिंदे गटाचे असल्याने त्यांचा दावा सरस ठरला आणि शिरसाट एकदाचे पालकमंत्री झाले.
एकीकडे जिल्ह्याचे पालकत्व मिळाल्याचा आनंद तर दुसरीकडे जबाबदारीचे ओझे अशी दुहेरी कसरत शिरसाट (Sanjay Shirsat) यांना करावी लागणार आहे. एका अर्थाने पालकमंत्री पद त्यांच्यासाठी काटेरी मुकुटच ठरणार, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. सलग चार वेळा आमदार झाल्यामुळे संजय शिरसाट यांचा मंत्री अन् पालकमंत्री पदाचा दावा नाकारण्याचे काही कारणच नव्हते. एकनाथ शिंदे यांच्या मंत्रीमंडळात ऐनवेळी शिरसाट यांचे मंत्रीपद हुकले. पण कोणतीही नाराजी व्यक्त न करता त्यांनी शिंदेंचा शब्द अंतिम मानला.
श्रद्धा आणि सबुरीचे फळ अखेर त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात का होईना मिळाले. माजी मंत्री अब्दुल सत्तार यांचा विरोध, (Shivsena) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दोन्ही नेते चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे यांना शह देत शिरसाट यांना पालकमंत्री म्हणून जिल्ह्याचा कारभार करावा लागणार आहे. राज्यात महायुती असताना आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा देणारा भारतीय जनता पक्ष, जिल्ह्यातील दुसरे वजनदार आणि मुख्यमंत्र्यांचे विश्वासू मंत्री अतुल सावे आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन चालण्याचे मोठे आव्हान संजय शिरसाट यांच्यासमोर असणार आहे.
2024 च्या लोकसभा निवडणुकीत लढण्याची संपूर्ण तयारी झालेली असताना जागा शिवसेनेला सोडावी लागली,याची सल अजूनही भाजपच्या स्थानिक नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या मनात आहे. लोकसभेला माघार घ्यावी लागल्यामुळे विधानसभा निवडणुकीत कुठलीच तडजोड न करण्याची भूमिका भाजपने घेतली होती. यातूनच जिल्ह्याचे पालकमंत्री पद भाजपला म्हणजेच अतुल सावे यांना द्यावे, अशी मागणी वरिष्ठ नेत्यांकडे करण्यात आली होती.
परंतु जिल्ह्यात शिवसेना शिंदे गट मोठ्या भावाच्या भूमिकेत असल्याने ते कुठल्याही परिस्थितीत पालकमंत्री पद सोडणार नाही, याची जाणीव भाजपच्या नेत्यांना होती. त्यामुळे जास्त न ताणता संजय शिरसाट यांच्या नावावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्कामोर्तब केले.त्यामुळे भाजपच्या स्थानिक नेते, पदाधिकाऱ्यांकडून संजय शिरसाट यांना किती सहकार्य मिळेल, याबद्दल शंकाच आहे.
उद्धवसेना टार्गेट करणार
संजय शिरसाट यांनी गद्दारी केल्याचा राग मनात धरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते त्यांना टार्गेट करतील हे निश्चित. चंद्रकांत खैर, अंबादास दानवे यांच्या अनेक समर्थकांना शिरसाट यांनी शिवसेनेत प्रवेश देत त्यांना दणका दिला आहे. महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरसाट पालकमंत्री झाल्यानंतर उद्धवसेनेला खिंडार पाडण्याच्या मोहिमेला ते अधिक गती देण्याची शक्यता आहे. अशावेळी शिरसाट यांना रोखण्यासाठी खैरे-दानवे स्वतंत्रपणे त्यांच्यावर तुटून पडतील. याला तोंड देत शिरसाट यांना पालकमंत्री म्हणून काम करावे लागणार आहे.
महापालिकेत नंबर वन ठरण्याचे आव्हान
आधी मंत्री आणि आता पालकमंत्री पद देऊन उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी संजय शिरसाट यांचे हात बळकट केले आहे. आता आगामी महापालिका आणि त्यानंतर होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत पक्षाला नंबर एक करण्याचे आव्हान शिरसाट यांना असणार आहे. संघटनात्मक बांधणी करत पदाधिकारी, कार्यकर्त्यांना कामाला लावणे, पक्षांतर्गत कुरबुरीवर मात करत पुढे जाणे संजय शिरसाट यांच्यासाठी सोपे असणार नाही. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्या कार्यपद्धतीवर जिल्ह्यातील आमदारांची नाराजी शिरसाट यांना दूर करावी लागणार आहे.
सत्तार-इम्तियाज देणार टक्कर
शिवसेनेचे माजी मंत्री अब्दुल सत्तार आणि पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम विधानसभा मतदारसंघात शिरसाट यांची कोंडी करण्यासाठीच अब्दुल सत्तार यांनी इम्तियाज जलील यांना हातीशी धरून एमआयएमचा उमेदवार दिला नव्हता, असा आरोप केला गेला. याशिवाय एकनाथ शिंदे यांच्या मंत्रीमंडळात संधी न मिळण्याला देखील सत्तार हेच कारणीभूत होते हे आता लपून राहिलेले नाही.
सत्तार यांच्याकडे जेव्हा दोन महिन्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री पद होते तेव्हा शिरसाट यांनी त्यांच्या उपस्थितीत झालेल्या एकाही बैठकीला हजेरी लावली नव्हती. एवढेच नाही तर त्यांनी घेतलेले निर्णय बदलणार, असेही शिरसाट यांनी मंत्री झाल्यावर जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर डीपीडीसीमध्ये सत्तार विरुद्ध शिरसाट संघर्ष भडकल्याशिवाय राहणार नाही. इम्तियाज जलील हे आता आमदार, खासदार नसले तरी त्यांचा पक्ष आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सत्ताधारी शिवसेना आणि महायुतीला जेरीस आणण्यात कोणतीही कसर सोडणार नाही, एवढे मात्र निश्चित. अशावेळी संजय शिरसाट यांचा कस लागणार आहे. ही सगळी अडथळ्यांची शर्यत पालकमंत्री म्हणून शिरसाट कशी पार पाडतात? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.