
Mumbai News : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात पोलीस यंत्रणेकडून तपास सुरु आहे. या प्रकरणामुळे राज्यभर वातावरण तापले आहे. या प्रकरणातील आठ आरोपीना ताब्यात घेऊन मोक्कांतर्गत कारवाई केली आहे. दुसरीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणाबाबत पोलिसांनी जवळजवळ 1500 पेक्षा जास्त पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे.
यामध्ये माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा उजवा हात असणारा वाल्मिक कराड हा आरोपी क्रमांक एक आहे. तर त्याचा मावस भाऊ विष्णू चाटेला आरोपी क्रमांक दोन केले आहे. या आरोपपत्रामधून रोज नवनवीन खुलासे होत असतानाच आता मोठी अपडेट समोर आली आहे. ज्या वॉचमनला अवादा कंपनीच्या गेटवर मारहाण झाली त्यांनी जबाब दिले आहेत. या तिघांनी आपल्या जबाबात महत्वाची माहिती दिली आहे. त्यामुळे येत्या काळात आरोपीच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अवादा एनर्जी प्रकल्पावरील तीन वॉचमनचा जबाब महत्त्वाचा ठरला आहे. मस्साजोग येथील अशोक सोनवणे, अमरदीप सोनवणे आणि भैय्यासाहेब सोनवणे हे तिघेजण आवादा एनर्जी प्रकल्पावर वॉचमन म्हणून कार्यरत होते. या ठिकाणी ड्युटीवर असताना सुदर्शन घुले त्याच्या साथीदारासह आवादा एनर्जी प्रकल्पावर आला. यावेळी सुदर्शन घुलेने या वॉचमनना मारहाण व जातीवाचक शिवीगाळ केल्याने ॲट्रॉसिटी ॲक्ट प्रमाणे गुन्हा देखील नोंद झाला आहे.
या प्रकरणात जबाब नोंदविताना या तिघांनी मिळून अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदाराने आवादा एनर्जी प्रकल्पाचे मॅनेजर शिवाजी थोपटे यांना वॉचमन समोरच दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. ही खंडणी नाही दिली तर कंपनी बंद करा? अशी धमकी देखील दिली होती.
हे भांडण सोडवण्यासाठी सरपंच संतोष देशमुख या ठिकाणी पोहोचले होते. कंपनी बंद करू नका. लोकांना रोजगार मिळू द्या, असे सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदारांना सरपंच देशमुख म्हणत होते. त्यावेळी सुदर्शन घुलेने सरपंच देशमुख यांना 'सरपंच, तुला बघून घेऊ. तुला जिवंत सोडणार नाही..' अशी धमकी दिली होती, असा जबाब वॉचमनने दिला आहे.
त्यामुळे येत्या काळात या प्रकरणातील आरोपीच्या अडचणीत वाढ होणार आहे. दरम्यान, या जबाबामुळे आता पोलिसांना वाल्मिक कराडविरोधात आणखी एक सबळ पुरावा सापडला आहे. याच भांडणावेळी देशमुखांसह गावकऱ्यांनी घुले आणि त्याच्या सहकाऱ्यांना मारहाण करून हुसकावले होते. त्यानंतर तीन दिवसांनी देशमुखांची हत्या करण्यात आली होती. त्यामुळे येत्या काळात या प्रकरणी या तीन वॉचमनने दिलेला हा जबाब महत्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे आता सर्वांचे त्याकडे लक्ष लागून राहिले आहे.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.