Chhatrapati Sambhajinagar News : लोकसभेच्या जागा वाटपावरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू असताना शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) एक पाऊल पुढे टाकत आगामी लोकसभा निवडणुकीसाठीच्या प्रचार कार्यालयासाठी स्तंभपूजनाचा निर्णय घेतला आहे. येत्या बुधवारी (ता.13 मार्च) हा कार्यक्रम होणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आठवडाभरात आचारसंहिता लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांची तयारी सुरू असून, महाविकास आघाडीसोबतच महायुतीमध्येदेखील जागा वाटपावरून वाद-विवाद सुरू आहे.
असे असले तरी काही जागांचे गणित ठरलेले आहे. महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) छत्रपती संभाजीनगरची (Chhatrapati Sambhajinagar) जागा शिवसेना ठाकरे गटासाठी पक्की मानली जात आहे. त्यानुसार ठाकरे गटाने तयारी सुरू केली आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची नुकतीच बैठक झाली. त्यानंतर बुधवारी सकाळी प्रचार कार्यालयासाठी स्तंभपूजन केले जाणार आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
गेल्या अनेक लोकसभा निवडणुकीसाठी समर्थनगर येथे शिवसेनेचे (Shivsena) प्रचार कार्यालय थाटले जाते. यावेळीही पक्षाने तीच जागा निवडली आहे. महायुतीमध्ये छत्रपती संभाजीनगरची जागा भाजपच लढणार, हे निश्चित मानले जात असले तरी उमेदवारीबद्दल अद्याप अनिश्चितता आहे. दुसरीकडे मात्र महायुतीमध्ये माजी खासदार चंद्रकांत खैरे हेच उमेदवार असतील, असेच सध्याचे चित्र आहे. पक्षातर्फे घेण्यात येणाऱ्या आढावा बैठकांमध्ये त्यांच्या नावांचा उल्लेख करून विजयाचे आवाहन केले जात आहे.
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील इच्छुक असल्याचे जाहीर केले होते. पण, सध्या त्यांचे नाव चर्चेतही नाही. त्यामुळे एकीकडे महायुतीचा उमेदवार कोण? यावर खल सुरू असताना महाविकास आघाडीतील ठाकरे गटाने मात्र प्रचारात आघाडी घेत थेट प्रचार कार्यालयाच्या उभारणीचाच मुहूर्त ठरवून टाकला. भाजपच्या लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी आज रात्री किंवा उद्या सकाळी जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
त्यात महाराष्ट्रातील बहुतांश उमेदवारांची घोषणा होऊ शकते. संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ भाजप लढवणार, हे स्पष्ट असले तरी दोन दिवसांपासून पुन्हा शिवसेना शिंदे गटाकडून दावेदारीची भाषा सुरू झाली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या समर्थकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मेल पाठवून ही जागा शिवसेनेकडे घेऊन भुमरे यांना उमेदवारी देण्याचा आग्रह धरला आहे.
Edited By : Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.