Uddhav Thackeray : बाळासाहेबांचे 'फोटोग्राफर' ते पक्षाचे 'लीडर'; उद्धव ठाकरेंच्या दोन्ही रूपांचे 'हे' शहर साक्षीदार

Umaraga, Dharashiv Thackeray Meeting : बिनीचे शिलेदार सोडून गेल्यानंतर उमरग्यात उद्धव ठाकरे यांची पहिलीच जाहीर सभा
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Dharashiv Shivsena News : उद्धव ठाकरे यांना फोटोग्राफीचा छंद आहे, हे सर्वश्रुत आहे. त्यांची अनेक छायाचित्रे प्रचंड गाजलेली आहेत. राजकारणात सक्रिय झाल्यानंतरही त्यांनी फोटोग्राफीचा छंद जोपासलेला आहे. दरम्यान, उमरगा (जि. धाराशिव) शहरात 1995 मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची ऐतिहासिक सभा झाली होती. त्या सभेला अर्थातच प्रचंड गर्दी झाली होती. त्यावेळी ती गर्दी उद्धव ठाकरे यांनी आपल्या कॅमेऱ्यात टिपली होती. त्यानंतर 2004 मध्ये ते जाहीर सभेसाठी उमरग्यात आले होते. 20 वर्षांनंतर उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख म्हणून शुक्रवारी, म्हणजे 16 फेब्रुवारीला उमरग्यात येत आहेत.

उमरगा हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. प्रा. रवींद्र गायकवाड (Ravindra Gaikwad) उमरगा-लोहारा मतदारसंघातून दोनदा आमदार झाले. हा मतदारसंघ राखीव झाल्यानंतर सलग तिसरी टर्म आता ज्ञानराज चौगुले आमदार आहेत. हे दोघेही उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गटात दाखल झालेले आहेत. अशा परिस्थितीत 20 वर्षांनंतर उद्धव ठाकरे उमरग्यात येत आहेत. बिनीचे शिलेदार सोडून गेले असले तरी शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते सभेसाठी झटत आहेत. सभेला लोक स्वतःहून येणार आहेत. रोज अनेकांचे सभेच्या चौकशीसाठी फोन येत आहेत, असे तालुकाप्रमुख (ठाकरे गट) बाबूराव शहापुरे, शिवसेनेचे जुन्या पिढीतील कार्यकर्ते अशोक सांगवे यांनी 'सरकारनामा'ला सांगितले.

Uddhav Thackeray
Praful Patel : अपात्रतेच्या भीतीतून राज्यसभेचा अर्ज भरला...; काय म्हणाले प्रफुल्ल पटेल ?

उमरगा विधानसभा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला होता. त्यामुळे प्रा. रवींद्र गायकवाड यांनी 1990 ची निवडणूक भाजपच्या चिन्हावर लढवली होती. दोन मराठा उमेदवार असल्यामुळे मतविभागणी झाली आणि काँग्रेसचे कै. खालिकमियाँ काझी विजयी झाले होते. त्यानंतर हा मतदारसंघ शिवसेनेने आपल्याकडे घ्यावा, असा आग्रह प्रा. गायकवाड यांच्यासह अशोक सांगवे यांनी सुरू केला. 1995 च्या निवडणुकीपूर्वी नाशिक येथे झालेल्या शिवसेनेच्या अधिवेशनात सांगवे यांनी ही मागणी लावून धरली होती. सांगवे, प्रा. गायकवाड यांनी बाळासाहेबांकडे उमरगा येथे जाहीर सभा घेण्याची विनंती केली. सभेला या, गर्दी पाहा, लोकांचा प्रतिसाद पाहा आणि मग ठरवा हा मतदारसंघ शिवसेनेकडे घ्यायचा की नाही, अशी विनंती त्यांनी बाळासाहेब ठाकरे, मनोहर जोशी यांच्याकडे केली होती.

Uddhav Thackeray
Farmer Agitation : दिल्लीतील आंदोलनात माओवाद्यांचा सहभाग; यंत्रणेने दिला ‘अलर्ट’

या स्थानिक नेते, कार्यकर्त्यांच्या विनंतीनुसार अखेर बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी 1995 मध्ये उमरगा येथे जाहीर सभा घेण्यास होकार दिला होता. विधानसभेची उमेदवारी प्रा. गायकवाड यांना मिळाली होती. उमरगा शहराजवळच हैदराबाद रस्त्यावरील मारुती मंदिराजवळ (काळा मारुती) सभेचे ठिकाण निश्चित झाले होते. बाळासाहेब ठाकरे, मनोहर जोशी, दिवाकर रावते आदी उपस्थित होते. उद्धव ठाकरेही उपस्थित होते. मात्र, त्यावेळी ते राजकारणात तितकेसे सक्रिय नव्हते. सभेला प्रचंड गर्दी झाली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मनोहर जोशी भाषणात म्हणाले होते, या सभेला प्रमोद महाजन यांनी उपस्थित राहायला हवे होते, म्हणजे त्यांनी हा मतदारसंघ लगेच शिवसेनेला देऊ केला असता. पुढे हा मतदारसंघ शिवसेनेला सुटला. प्रा. गायकवाड विजयी झाले. त्यानंतर 1999 चा अपवाद वगळता या मतदारसंघात सलग शिवसेनेचा उमेदवार विजयी झालेला आहे. मतदारसंघ शिवसेनेला सुटावा, यासाठी आग्रही भूमिका घेतल्यामुळे दिवाकर रावते यांनी लोकांमध्ये बसलेले अशोक सांगवे यांना व्यासपीठावर बोलावून त्यांचा सत्कार केला होता.

Uddhav Thackeray
Maratha Reservation : जरांगे-पाटील पोटदुखीने जेरीस; प्रकृतीही खालावली, उपचारास नकार दिल्याने टेन्शन

राजकारणात कोणताही गॉडफादर नसताना प्रा. गायकवाड यांनी अशोक सांगवे, बाबूराव शहापुरे, रणधीर पवार, सुधाकर पाटील, विजयकुमार नागणे, डी. के. माने आदी फाटक्या पण कट्टर कार्यकर्त्यांसह (हे सर्वजण ठाकरे गटात आहेत) हजारो शिवसैनिकांच्या बळावर तालुक्यात शिवसेनेचा विस्तार केला होता. त्या काळात ग्रामीण भागातही बाळासाहेबांची क्रेझ निर्माण झालेली होती. शिवाय प्रा. गायकवाड यांचा सर्व जाती-धर्मांत जनसंपर्क दांडगा होता. त्यामुळे सभेला मोठी गर्दी झाली होती.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackery) त्यावेळी कॅमेरा घेऊनच आले होते. सभेला झालेली गर्दी त्यांनी आपल्या कॅमेऱ्यात टिपली होती. त्यांनी टिपलेले फोटो प्रा. गायकवाड यांच्या घरातील बैठकीच्या खोलीत अद्यापही फ्रेम करून लावलेले आहेत. बाजार समितीचे माजी सभापती जितेंद्र शिंदे (शिंदे गट) यांनी याला दुजोरा दिला.

Uddhav Thackeray
Ahmednagar News : शिवसेनेच्या नगरसेवकावर रोखली गावठी पिस्तूल, खटका दाबणार तेवढ्यात...

राजकारणात सक्रिय झाल्यानंतर 2004 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे उमरग्यात आले होते. त्यावेळी उमेदवारीसाठी प्रा. गायकवाड आणि केशव (बाबा) पाटील यांच्यात रस्सीखेच निर्माण झाली होती. भारत विद्यालयाच्या मैदानात ही सभा बाबा पाटील यांनी आयोजित केली होती. उद्धव ठाकरे यांचा कल बाबा पाटील यांच्याकडे झुकलेला होता. त्यानुसार उमेदवारीही बाबा पाटील यांना मिळाली होती. नंतर बाळासाहेबांच्या हस्तक्षेपानंतर ऐनवेळी उमेदवारी बदलून ती प्रा. गायकवाड यांना देण्यात आली होती.

त्या निवडणुकीत प्रा. गायकवाड विजयी झाले होते. उद्धव ठाकरे यांच्या या दौऱ्यादरम्यानच जळकोट येथे देवानंद रोचकरी आणि गणेश सोनटक्के यांच्यात तुळजापूर मतदारसंघाच्या उमेदवारीवरून उद्धव ठाकरे यांच्यासमोरच हाणामारी झाली होती. त्यानंतर एकदा भगव्या सप्ताहानिमित्त उद्धव ठाकरे उमरग्याला आले होते.

आता 20 वर्षांनंतर उद्धव ठाकरे उमरग्यात येत आहेत. परिस्थिती बदललेली आहे. प्रा. रवींद्र गायकवाड, आमदार ज्ञानराज चौगुले हे शिंदे गटात गेले आहेत. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर (Omraje Nimbalkar), धाराशिवचे आमदार कैलास पाटील, बाबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सभेची तयारी सुरू आहे. प्रा. गायकवाड यांनी ज्या शिलेदारांना सोबत घेऊन तालुक्यात शिवसेना वाढवली, त्यापेकी अनेकजण आता ठाकरे गटात आहेत.

माजी खासदार, विद्यमान आमदार शिंदे गटात असल्याने उद्धव ठाकरे यांच्या सभेला गर्दी होईल का, या प्रश्नाचे उत्तर सांगवे, शहापुरे यांच्याकडे आहे. निष्ठावंत म्हणून सभेसाठी आम्ही कष्ट घेत आहोत. लोक दररोज फोन करून सभेबाबत चौकशी करत आहेत. लोक स्वतःहून सभेला उपस्थित राहतील, त्यामुळे आम्हाला चिंता नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

(Edited by Sunil Dhumal)

R

Uddhav Thackeray
Lok Sabha Election 2024 : प्रफुल्ल पटेलांना राज्यसभा, भाजपची बल्ले बल्ले...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com