BJP News : भाजपच्या राष्ट्रीय ‘खजिन्या’ची चावी महाराष्ट्राकडे : मुंबईच्या खासदाराकडे मोठी जबाबदारी; तावडेंचंही वजन कायम, भारती पवारांना ताकद

BJP News : भाजपच्या नव्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या यादीत महाराष्ट्राला तीन महत्त्वाची पदे मिळाली. पियुष गोयल कोषाध्यक्ष, विनोद तावडे सरचिटणीस तर डॉ. भारती पवार उपाध्यक्षपदी नियुक्त झाले.
Piyush Goyal, Vinod Tawde, Bharati Pawar, BJP National Office Bearer
Piyush Goyal, Vinod Tawde, Bharati Pawar, BJP National Office BearerSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : भाजपच्या नव्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या यादीत महाराष्ट्राला ३ महत्त्वाची पदे मिळाली आहेत. उत्तर मुंबईचे खासदार आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल भाजपचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. माजी मंत्री विनोद तावडे यांची राष्ट्रीय सरचिटणीसपदी फेरनियुक्ती तर माजी केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी करण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील या दोन नेत्यांचे राष्ट्रीय संघटनेतील राजकीय वजन पुन्हा अधोरेखित झाले आहे.

गोयलांकडे पुन्हा ‘खजिन्याची चावी’

पियुष गोयल हे भाजपचे ज्येष्ठ नेते असून, ते सध्या मुंबई उत्तरचे खासदार आणि केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री आहेत. यापूर्वीही त्यांनी भाजपचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. पेशाने चार्टर्ड अकाउंटंट असलेल्या गोयल यांना पक्षाच्या आर्थिक व्यवस्थापनाची जबाबदारी पुन्हा देण्यात आली आहे. गोयल यांच्या कुटुंबाचीही भाजपशी दीर्घ राजकीय नाळ आहे. त्यांच्या आई चंद्रकांता गोयल या भाजपच्या माजी आमदार होत्या, तर वडील वेदप्रकाश गोयल यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये केंद्रीय मंत्री तसेच भाजपचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष म्हणून काम केले आहे.

तावडेंचं राष्ट्रीय संघटनेतील वजन कायम

महाराष्ट्रातील भाजपच्या संघटनात्मक राजकारणातील अनुभवी नेते म्हणून विनोद तावडे यांची ओळख आहे. महाराष्ट्रात मंत्री म्हणून काम केल्यानंतर त्यांनी भाजपच्या राष्ट्रीय संघटनेत महत्त्वाची जबाबदारी सांभाळली. राष्ट्रीय पातळीवर चिटणीस आणि त्यानंतर सरचिटणीस म्हणून काम केल्यानंतर आता नव्या टीममध्येही त्यांच्यावर राष्ट्रीय सरचिटणीसपदाची जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे. त्यामुळे सत्तेच्या आणि विधानसभा राजकारणापेक्षा भाजपच्या राष्ट्रीय संघटनात्मक राजकारणात तावडेंचे स्थान आणखी मजबूत झाल्याचे मानले जात आहे.

Piyush Goyal, Vinod Tawde, Bharati Pawar, BJP National Office Bearer
BJP New Team: भाजपच्या नव्या टीममधून दिग्गजांचं कमबॅक : वसुंधराराजे, स्मृती इराणी, अनुराग ठाकूर यांच्यासह 3 माजी मुख्यमंत्री अन् 10 माजी मंत्री मैदानात

भारती पवारांनाही राष्ट्रीय पातळीवर मोठी संधी

डॉ. भारती पवार यांच्याकडेही भाजपने मोठी जबाबदारी सोपवली आहे. माजी केंद्रीय राज्यमंत्री म्हणून काम केलेल्या भारती पवार यांची थेट राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील राजकीय चेहऱ्याला भाजपच्या राष्ट्रीय संघटनेत महत्त्वाचे स्थान मिळाले आहे.

Piyush Goyal, Vinod Tawde, Bharati Pawar, BJP National Office Bearer
Bharti Pawar : लोकसभा पराभवानंतर भारती पवारांना पुन्हा ताकद; आदिवासी पट्ट्यात भाजपची व्होटबँक मजबूत करण्याची जबाबदारी?

महाराष्ट्राचा राष्ट्रीय संघटनेत दबदबा

भाजपच्या नव्या राष्ट्रीय टीममध्ये महाराष्ट्रातील तीन नेत्यांना महत्त्वाची जबाबदारी मिळाल्याने राज्याचा राष्ट्रीय संघटनेतील प्रभाव पुन्हा स्पष्ट झाला आहे. गोयलांकडे पक्षाच्या आर्थिक व्यवस्थापनाची जबाबदारी, तावडेंकडे संघटनात्मक राजकारणातील महत्त्वाची भूमिका, तर भारती पवारांकडे राष्ट्रीय उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आगामी काळात महाराष्ट्रातील संघटनात्मक आणि निवडणूक राजकारणासाठी भाजप या तिन्ही नेत्यांच्या अनुभवाचा आणि राष्ट्रीय पातळीवरील भूमिकेचा कसा वापर करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com