

मुंबई आणि पुणे परिसरात सुरू असलेल्या जोरदार पावसाचा मोठा फटका रेल्वे वाहतुकीला बसला आहे. गेल्या 24 तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील सेवा विस्कळीत झाली असून हजारो प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिस्थिती गंभीर बनल्याने रेल्वे प्रशासनाने अनेक गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई आणि पुणे दरम्यान धावणाऱ्या तब्बल 16 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रवाशांची मोठी गर्दी असणाऱ्या इंद्रायणी एक्सप्रेस, सिंहगड एक्सप्रेस, प्रगती एक्सप्रेस आणि इंटरसिटी एक्सप्रेस या गाड्यांचाही समावेश आहे. त्यामुळे दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.
याशिवाय सोलापूरहून मुंबईकडे जाणारी सिद्धेश्वर एक्सप्रेस पुणे स्थानकावरच थांबवण्यात आली आहे. तसेच मुंबईच्या दिशेने धावणाऱ्या 6 गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. त्यामुळे रेल्वे प्रवासाचे संपूर्ण वेळापत्रक बिघडले असून अनेक प्रवाशांना पर्यायी मार्गांचा शोध घ्यावा लागत आहे.
गाड्या रद्द झाल्याने पुणे रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी झाली आहे. अनेक प्रवासी सकाळीच स्टेशनवर पोहोचले होते, मात्र गाड्या रद्द झाल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांचा खोळंबा झाला. काही प्रवासी कामानिमित्त तर काही वैयक्तिक कारणांसाठी मुंबईकडे निघाले होते. मात्र अचानक बदललेल्या परिस्थितीमुळे त्यांना तासन्तास स्टेशनवर थांबावे लागत आहे.
मुंबईत हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला असून काही भागांमध्ये अतिवृष्टीमुळे रेल्वे मार्गांवर धोका निर्माण झाला आहे. काही ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटनाही समोर आल्याने सुरक्षेच्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून गाड्या रद्द केल्या आहेत.
दरम्यान, दूरवरच्या शहरांतून पुण्यात आलेल्या प्रवाशांनाही मोठा फटका बसला आहे. पुढील प्रवास कसा करायचा याबाबत अनेकजण संभ्रमात आहेत. पावसाचा जोर कायम असल्याने उर्वरित गाड्यांच्या वेळापत्रकावरही परिणाम होत असून रेल्वे प्रशासन परिस्थिती सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.