Mumbai News : राज्यातील विधानपरिषदेच्या मतदानासाठी पाच दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर सर्वच पक्षात राजकीय घडामोडीना वेग आला आहे. विशेषता येत्या काळात महायुतीचा विजयी रथ रोखण्यासाठी महाविकास आघाडीत वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत. पाचपैकी तीन मतदारसंघात झालेली बंडखोरी मोडून काढण्यासाठी आक्रमक रणनिती आखली जात आहे. महायुतीसमोर एकास एक उमेदवार दिल्यास तगडी लढत होऊ शकते असा कयास नेतेमंडळीने लावला आहे. त्यामुळे वरिष्ठ पातळीवरून त्याबाबत प्लॅनींग सुरु असल्याचे समजते.
राज्यातील विधानपरिषदेच्या पुणे, छत्रपती संभाजीनगर पदवीधर व अमरावती शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची (Shivsena) झालेली बंडखोरी मोडून काढण्याचे आव्हान आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील बडे नेते यासाठी मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत असल्याचे समजते. त्यासाठी राज्य पातळीवर तीनही पक्षाकडून रणनीती आखली जात आहे.
पुणे मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून हर्षदा देशमुख-जाधव या निवडणूक रिंगणात आहेत तर त्यांच्या विरोधात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सुनील मोदी यांनी बंड केले आहे. छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून प्रतापसिंह पाटील यांच्या विरोधात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे दिलीप घुगे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. तर अमरावती शिक्षक मतदारसंघात काँग्रेसचे अदिती पोहरे यांच्या विरोधात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे दत्तात्रय लहाने हे निवडणूक लढवत आहेत. या तीन मतदारसंघात झालेल्या बंडखोरीमुळे महायुतीचा विजयाचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे या बंडखोरीवर मार्ग काढण्याचे आव्हान आघाडीसमोर आहे.
याबाबत प्रसार माध्यमाशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे म्हणाले की, आगामी काळात होत असलेल्या निवडणुकीत महायुतीविरोधात एकास एक उमेदवार देण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे. त्याबाबत वरिष्ठ पातळीवर तीन पक्षात चर्चा सुरू आहे. या निवडणुकीत एकास एक उमेदवार दिला तरच विजय मिळवणे सोपे जाणार आहे. त्यासाठी हालचाली सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
महाविकास आघाडीसमोर (MVA) झालेली बंडखोरी मोडून काढण्याचे आव्हान आहे. मात्र, त्यासाठी आघाडीतील तीन पक्षाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. दसऱ्यानंतर याबाबतचे राजकीय चित्र बदलू शकते, अशी माहिती प्रसार माध्यमाशी बोलताना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.