

NEET paper leak case : नीट पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता थेट लातूरमधील प्रसिद्ध ‘आरसीसी क्लासेस’चे सर्वेसर्वा प्रा. शिवराज मोटेगावकर याच्यापर्यंत पोहोचले असून, सीबीआयने त्याला अटक केल्यानंतर राज्यातील शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
विशेष म्हणजे, त्याच्या क्लासमधील एका प्रमोशनल व्हिडिओमुळेच तपास यंत्रणांना संशयाची दिशा मिळाल्याची चर्चा रंगली आहे. विद्यार्थ्यांना विचारलेल्या काही प्रश्नांमुळे संशय बळावला आणि त्यातूनच कथित पेपरफुटी रॅकेटचा धागा मोटेगावकरांपर्यंत पोहोचल्याचे सांगितले जात आहे.
एका सामान्य शेतकरी कुटुंबातून शिक्षण (Education) क्षेत्रातील मोठे नाव बनलेले प्रा. मोटेगावकर आता गंभीर आरोपांमुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. रेणापूर तालुक्यातील हनुमंतवाडी इथं जन्मलेल्या मोटेगावकर याने लातूरमध्ये शिक्षण घेत एमएस्सी (रसायनशास्त्र) मध्ये सुवर्णपदक मिळवले होते. शिक्षक म्हणून उमरगा, अंबाजोगाई, बीड या भागांत काम केल्यानंतर त्याने लातूरमध्ये खासगी क्लासेसच्या माध्यमातून स्वतःचा शैक्षणिक प्रवास सुरू केला.
2003 मध्ये ‘रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस’च्या नावाने एका छोट्या खोलीत सुरू झालेला हा प्रवास पुढे ‘आरसीसी’ या ब्रँडमध्ये परिवर्तित झाला. रसायनशास्त्र विषयावरील प्रभुत्व, शिकवण्याची खास शैली आणि नीट परीक्षेच्या वाढत्या क्रेझमुळे त्याच्या क्लासेसचा दबदबा झपाट्याने वाढत गेला. पुढे केवळ केमिस्ट्रीपुरते मर्यादित न राहता फिजिक्स, बायोलॉजी, मॅथेमॅटिक्ससह सर्व विषयांचे मार्गदर्शन एकाच छताखाली देण्यास सुरवात करण्यात आली.
लातूरसह पुणे (Pune) , नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, सोलापूर, कोल्हापूर आणि अकोला अशा आठ प्रमुख शहरांत ‘आरसीसी क्लासेस’च्या शाखा उभ्या राहिल्या. दरवर्षी हजारो विद्यार्थी नीट, जेईई, एमएचटी-सीईटीसारख्या स्पर्धा परीक्षांसाठी इथं प्रवेश घेत असल्याचा दावा केला जात होता. बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन शिक्षणाची सुविधाही उपलब्ध करण्यात आली होती.
दरम्यान, सीबीआय कारवाईनंतरही ‘आरसीसी’मधील शैक्षणिक हालचाली पूर्णपणे थांबलेल्या नाहीत. आगामी परीक्षांसाठी क्लासचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, काही विद्यार्थी अद्याप प्रवेशासाठी येत असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र, प्रा. मोटेगावकर याच्या अटकेनंतर राज्यातील खासगी कोचिंग उद्योग, स्पर्धा परीक्षा व्यवस्था आणि शिक्षणातील व्यावसायिकरण यावर नव्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मोटेगावकर याची 17 मे रोजी जवळपास 10 तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर 18 मे रोजीही त्याची चौकशी सुरू होती. त्यानंतर त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. या प्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं (CBI) रविवारपर्यंत 9 आरोपींना अटक केली. त्यात आता शिवराज मोटेगावकरांची भर पडल्यानं एकूण अटक झालेल्या आरोपींची संख्या 10 वर पोहोचली आहे. न्यायालयाने CBI ला मोटेगावकर याची 9 दिवसांची कोठडी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.