

Uddhav Thackeray setback in Delhi: राजकारणातील एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील 6 खासदारांनी स्वतंत्र भूमिका घेत वेगळा गट स्थापन केल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित खासदारांनी लोकसभा नियमांनुसार स्वतंत्र गटाची स्थापना करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली आहे. या नव्या गटाच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत विलीन होण्याचा मार्ग खुला झाल्याचे सांगितले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय हालचालींना आता निर्णायक वळण मिळाल्याचे मानले जात आहे.
या घडामोडींमुळे सकाळपासूनच दिल्ली आणि महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले होते. ठाकरे गटाकडून या संभाव्य फुटीला रोखण्यासाठी प्रयत्न करण्यात आल्याची माहिती आहे. याच पार्श्वभूमीवर लोकसभा अध्यक्षांकडे काही आक्षेप आणि निवेदनेही सादर करण्यात आली होती. मात्र त्यानंतरही पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू राहिली आणि स्वतंत्र गटाच्या स्थापनेचा मार्ग मोकळा झाला.
सूत्रांच्या माहितीनुसार, नव्या गटातील सर्व खासदारांनी आपल्या निर्णयाबाबतचे पत्र आणि आवश्यक कागदपत्रे लोकसभा अध्यक्षांकडे जमा केले आहेत. त्यामुळे या प्रक्रियेला अधिकृत स्वरूप मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घडामोडीनंतर संसदेत ठाकरे गटाची ताकद कमी होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ठाकरे गटाच्या ६ खासदारांच्या गटाला गट स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे. यामुळे गटाला पक्षात विलीनकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. ठाकरे गटाचे सहा खासदार शिवसेनेत विलीन होणार आहेत.
दरम्यान, या संपूर्ण राजकीय हालचालींमागे राबविण्यात आलेल्या ‘ऑपरेशन टायगर’चीही जोरदार चर्चा आहे. शिंदे गटासाठी हा मोठा राजकीय यशस्वी डाव मानला जात असून, आगामी काळात त्याचा परिणाम राज्यातील सत्तासमीकरणांवर होण्याची शक्यता आहे.
हे सर्व नवीन खासदार शिवसेनेच्या 60 व्या वर्धापन दिन सोहळ्याच्या दिवशी म्हणजेच 19 जून रोजी मुंबईत होणाऱ्या गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये शिवसेनेचा भव्य वर्धापन दिन सोहळा पार पडणार आहे. याच सोहळ्यामध्ये मोठ्या शक्तीप्रदर्शनासह या खासदारांचा अधिकृत पक्षप्रवेश होणार असल्याचीही माहिती मिळत आहे.
गेल्या काही वर्षांत महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या आहेत. आमदारांनंतर आता खासदारांच्या स्तरावरही मोठी फूट पडल्याची चर्चा रंगू लागल्याने राजकीय समीकरणे पुन्हा एकदा बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसांत या प्रकरणात कोणत्या नव्या घडामोडी घडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.