

Solapur, 07 May : पुण्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून केल्यामुळे जनतेमध्ये संतापाची भावना असतानाच सोलापुरात अल्पवयीन मुलीच्या तपासासाठी संबंधित कुटुंबाला पोलिस ठाण्यासमोर उपोषण करावे लागत आहे. एकीकडे हतबल पालकांना उपोषण करावे लागत असताना या प्रकरणात मंद्रूप (ता. दक्षिण सोलापूर) पोलिसांवर एका आमदारासह जिल्हा परिषद सदस्याचा दबाव आहे, असा गंभीर आरोप संबंधित मुलीच्या कुटुंबीयांनी केला आहे.
मंद्रूप (दक्षिण सोलापूर South Solapur) पोलिस ठाण्याच्या हद्दीतून १६ वर्षे ९ महिने वयाच्या अल्पवयीन मुलीचे १५ एप्रिल रोजी पहाटे अपहरण झाले. कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेऊनही मुलगी सापडली नाही, त्यामुळे त्यांनी दुपारी चारच्या सुमारास मंद्रूप पोलिसांना माहिती दिली. दुसऱ्या दिवशी १६ एप्रिल रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास फिर्याद दिली.
पोलिसांनी गुन्हा नोंदवून संबंधित कुटुंबीयांना सोबत घेऊन अकलूज (Akluj), पुणे जिल्ह्यातील दौंड, तर धाराशिव जिल्ह्यातील कळंब परिसरात तपास केला. मात्र, मुलगी आढळून आली नाही. दरम्यान, या प्रकरणी कुटुंबीयांनी पोलिसांवरही संशय व्यक्त केला आहे.
मंद्रूप पोलिस ठाण्याचे फौजदार विद्यासागर सोनकांबळे, हवालदार सचिन मसलखांब आणि कॉन्स्टेबल माजिद शेख यांची खातेनिहाय चौकशी करून कारवाई करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली होती. त्यानंतरही मुलीचा शोध लागला नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यासमोर उपोषण सुरू केले आहे.
दरम्यान, मंद्रूपचे सहायक पोलिस निरीक्षक शंकर पटवारी यांनी संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांकडून तपास काढून घेण्याचे आश्वासन दिले आहे, असे संबंधित कुटुंबाने सांगितले. तसेच, या प्रकरणाची गंभीर दखल घेत वरिष्ठांनी कडक समज दिली आहे. बेपत्ता मुलींच्या प्रकरणांचा प्राधान्याने तपास करण्याच्या सूचना पोलिस कर्मचाऱ्यांना दिल्याचे समजते.
दबाव आणणारा आमदार कोण?
मुलीचे अपहरण करणारा संशयित हा माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथील असल्याचा कुटुंबीयांचा दावा आहे. अपहरणाच्या प्रकरणात कारवाई होऊ नये; म्हणून एका आमदारासह जिल्हा परिषद सदस्याने पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबीयांनी केला आहे.
आमच्यावर कोणाचाही दबाव नाही : पोलिस निरीक्षक
अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा तपास मी स्वतः करणार आहे. आमच्यावर कोणाचाही दबाव नाही आणि तो आम्ही जुमानत नाही. मुलीचा लवकरच शोध घेऊ, असे पोलिस निरीक्षक शंकर पटवारी यांनी सांगितले. तसेच जानेवारीपासून मुलींच्या अपहरणाच्या सात घटना घडल्या आहेत. त्यापैकी सहा मुलींचा शोध लागला आहे. ही एकच मुलगी अद्याप सापडलेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.