Pandharpur News : माढा लोकसभा मतदारसंघ हा बालेकिल्ला पुन्हा मिळविण्यासाठी शरद पवार गटाने जोरदार डावपेच आखायला सुरुवात केली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मतदारसंघात विजय निश्चित मेळावे सुरू केले आहेत. भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना टक्कर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाकडून अभयसिंह जगताप यांचे नावे पुढे आले आहे. त्यांच्या उमेदवारीचे स्पष्ट संकेत जयंत पाटील यांनी टेंभुर्णीतील मेळाव्यात बोलताना दिले आहेत. त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघातून रणजितसिंह यांच्या विरोधात शरद पवार गटाकडून अभयसिंह अशी लढत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (Abhaysinh Jagtap from Madha Constituency from Sharad Pawar's Lok Sabha candidature?)
भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला पक्षातूनच विरोध होत आहे. अकलूज येथील मोहिते पाटील यांनी तर निंबाळकर यांच्याविरोधात रणशिंग फुंकले आहे. माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायचीच, असा चंग बांधला आहे. धैर्यशील मोहिते पाटील यांनी निवडणुकीची तयारी गेल्या वर्षभरापासून केली आहे. मेळावे आणि गाठीभेटी ते घेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटानेही हा बालेकिल्ला पुन्हा कोणत्याही परिस्थिती मिळवायाचा, यासाठी तयारी चालवली आहे. (Madha Loksabha )
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने शरद पवार गटाकडून मतदारसंघात मेळावा आयोजित करण्यात आले आहेत. या गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या मतदारसंघात विजय निश्चित मेळावे घेण्यास सुरुवात केली आहे. जयंत पाटील यांनी पहिल्या टप्प्यात टेंभुर्णी, दहिवडी आणि वेळापूर येथे मेळावे घेतले आहेत. त्या मेळाव्याला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
दरम्यान, टेंभुर्णी येथील मेळाव्यात बोलताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अभयसिंह जगताप यांच्या उमेदवारीचे स्पष्ट संकेत दिले आहेत. अभियसिंह जगताप हे सातारा जिल्ह्याच्या माण तालुक्यातील म्हसवड गावचे आहेत. संगणक अभियंता असलेल्या जगताप यांची पुण्यात कंपनी आहे. शरद पवार यांच्या गटात ते मागील पाच ते सहा वर्षापासून सक्रीयपणे काम करत आहेत. मेळाव्यात बोलताना जयंत पाटील यांनी जगताप यांच्या कामाचे कौतुक केले आहे.
शरद पवार यांच्यासोबत अभयसिंह जगताप यांनाही माढा लोकसभा मतदारसंघात मोठी सहानुभूती असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. ज्या बाजूला शरद पवार असणार, त्याच बाजूने माढा लोकसभा मतदारसंघाचा निकाल लागणार आहे, असा एक सर्वे सांगत आहे. आम्ही जनमताची चाचणी केली आहे, मी कधीही मोकळं बोलत नाही. माढ्यात शरद पवार यांच्याविषयी प्रचंड सहानुभूती आहे, त्यामुळे अभयसिंह जगताप तुमचे भवितव्य उज्वल आहे, असेही जयंत पाटील यांनी मेळाव्यात बोलताना नमूद केले.
अभयसिंह जगताप यांचे माण तालुक्यात राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठे काम आहे. त्यांनी कोरोना काळात कोविड हॉस्पिटलची उभारणी करून शेकडो लोकांचे जीव वाचवले आहेत. तसेच खुद्द जगताप यांनीही माढा लोकसभा मतदारसंघात दौरे सुरू केले आहेत. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्याचे मेळावे, महिला मेळावा घेतले आहेत. जगताप यांचे माढ्यातील वाढते दौरे आणि जयंत पाटील यांनी दिलेले संकेत यामुळे माढ्यातून अभयसिंह जगताप यांची उमेदवारी पक्की समजली जात आहे.
दरम्यान, माढा लोकसभा मतदारसंघातही अभयसिंह जगताप यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाने आम्हाला संधी दिली तर माढ्यातून लोकसभेची निवडणूक लढविण्यासाठी मी तयार आहे, असेही अभयसिंह जगताप यांनी स्पष्ट केले.
Edited By : Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.