Kolhapur News, 03 May : उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना माजी आमदार आणि सध्या ठाकरेंच्या शिवसेनेत असलेल्या के.पी पाटील यांना राजकारणातून निवृत्त होण्याचा सल्ला दिला आहे.
के.पी पाटील हे आता पुन्हा एकदा अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. अशातच अजितदादा चंदगड येथे आले असता पाटील यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी अजित पवारांनी के.पी पाटलांच्या वयाचा उल्लेख करत तुम्ही आता कुठेतरी थांबलं पाहिजे, असं म्हटलं.
अजित पवार म्हणाले, "के.पी पाटील तुम्ही आता कुठेतरी थांबायला पाहिजे, 2029 च्या विधानसभेपर्यंत तुम्ही 84 वर्षाचे होणार आहात. त्यामुळे, आता रिटायरमेंट घ्या आणि नवं नेतृत्व तयार करा.",
तर अजितदादांनी हा सल्ला देताना मेहुण्या-पाहुण्यांमधील वादावर नाराजी व्यक्त केली. तुम्ही दोघंही भांडत बसता याला काही अर्थ नाही. कुणीतरी माघार घेतली असती तर आज चित्र वेगळं दिसलं असतं. मात्र, तसं न करता वाद घालत बसता, अशा शब्दात त्यांनी पाटील यांना सुनावलं.
मात्र, अजितदादांच्या या सल्ल्यानंतर के.पी पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं. ते म्हणाले, हे सगळं इतरांना झेपलं पाहिजे म्हणून मी उभा राहतो. पण मी जिल्हा बँकेमध्ये थांबलो आणि चिरंजिवाला संधी दिली, असं स्पष्टीकरण के.पी पाटलांनी दिलं.
शरद पवारांची राष्ट्रवादी व्हाया ठाकरे गट अजितदादांची राष्ट्रवादी असा प्रवास के.पी पाटील यांनी केला आहे. माजी आमदार असलेले पाटील हे मूळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे. मात्र, राष्ट्रवादीतील फुटीनंतर त्यांनी अजित पवारांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर लगेचंच शरद पवार कोल्हापूर दौऱ्यावर येताच पाटील यांनी त्यांचंही स्वागत केलं.
शिवाय तुम्ही कोणत्या गटाचे? असं विचारतात त्यांनी मी पवार गटाचा आहे, असं उत्तर दिलं होतं. दरम्यान, विधानसभेला राधानगरी भुदरगडची जागा महायुतीत शिंदेंच्या शिवसेनेला जाताच के.पी पाटलांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर आता ते आता पुन्हा एकदा अजितदादांच्या राष्ट्रवादीत जाणार असल्याचं निश्चित झालं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.